
Sexual abuse allegations against Brijbhushan Singh : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर-प्रदेश दौऱ्याला विरोध केल्यामुळे चर्चेत आलेल्या भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. यासह कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाविरुद्धही खेळाडूंनी आवाज उठवला आहे. याविरोधात कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्यासह अनेक खेळाडू बुधवारी (१८ जानेवारी) पासून जंतरमंतरवर आंदोलनासाठी बसले आहेत.
दरम्यान, या खेळाडूंच्या समर्थनार्थ द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगट हे देखील आता मैदानात उतरले आहेत. महावीर फोगट म्हणाले, ब्रृजभूषण सिंह हुकुमशाह आहेत. त्यांचं इथून जाणं गरजेचं आहे. माझं संपूर्ण आयुष्य संघर्ष करण्यात गेलं. माझ्या मुलीही आता कुस्तीमध्ये येणाऱ्या पिढ्यांसाठी संघर्ष करत आहेत. ना चांगलं जेवण मिळतं ना चांगले प्रशिक्षक आहेत. कुस्तीला वाचावायचं असेल तर पूर्ण फेडरेशन बदलणं गरजेचं आहे. महावीर फोटग हे गीता फोगटचे वडील आहेत, तर बबिता फोगट आणि विनेश फोगटचे चुलते आहेत.
याशिवाय या खेळाडूंना हरियाणाच्या खाप पंचायतींचेही समर्थन मिळाले आहे. खाप पंचायतींनी सरकारला आव्हान देत कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांना तात्काळ हटविण्याची मागणी केली आहे, तसंच महासंघालाही बरखास्त करण्याची मागणी केली आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून या प्रकरणाचा तपास होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी उचलून धरली आहे. जर सरकारने या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर हरियाणातील खाप पंचायती खेळाडूंच्या मागण्या मान्य होईपर्यंत त्यांच्यासोबत उभी राहिलं.
तत्पूर्वी आज दुपारी कुस्तीपटूंच्या शिष्टमंडळाने क्रीडा मंत्रालयातील क्रीडा सचिव आणि स्पोर्ट्स ऑथेरिटी ऑफ इंडियाच्या संचालकांची भेट घेतली. यावेळी कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघ आणि अध्यक्ष ब्रृजभूषण सिंग यांच्याकडे तक्रार केली.आपल्याला योग्य वागणूक दिली जात नसल्याची तक्रार पैलवानांनी केली. कुस्तीपटूंसोबत सातत्याने गैरवर्तन होतं. त्यामुळे बृजभूषण सिंग यांना पदावरुन हटवावं, त्यामुळे नवीन कुस्तीपटूंचं भवितव्य सुरक्षित करता येईल.
अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर कुस्टीपटू पुन्हा आंदोलनस्थळी परतले. ब्रृजभूषण सिंह यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलनस्थळ सोडणार नसल्याची भूमिका कुस्तीपटूंनी घेतली आहे.
यावेळी पत्रकार परिषद घेत खेळाडूंनी सांगितलं की, क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आमच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि आश्वासनं दिली. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. पण आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही आंदोलनस्थळ सोडणार नाही. बजरंग पुनिया म्हणाला की, आज कुस्तीचा प्रत्येक सदस्य येथे धरणेला बसला आहे. जर आरोप खरे ठरले तर आपण फाशी जाऊ असं ब्रृजभूषण म्हणाले होते. आज आमच्यासोबत ६ अशा मुली आहेत, ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले आहेत.
खेळाडूंच्या गदारोळानंतर कुस्ती महासंघ बॅकफूटवर जाताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कुस्ती महासंघाने २२ जानेवारीला तातडीची बैठक बोलावली आहे. याच बैठकीत ब्रृजभूषण सिंह आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, असं बोलले जात आहे. तत्पूर्वी आज त्यांनी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी फोनवर चर्चा करून आपली बाजू मांडली. आपल्याला एका षडयंत्रात गोवलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच एकाही आरोपात तथ्य नाही, असा दावा त्यांनी केला.