IPL 2022 : RCB चा संघर्षपूर्ण विजय, KKR वर ३ विकेटने मात
नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडीयमवर झालेल्या सामन्यात RCB ने कोलकाता नाईट रायडर्सवर ३ विकेट राखून मात करत यंदाच्या हंगामातला पहिला विजय मिळवला आहे. कोलकात्याने विजयासाठी दिलेलं १२९ धावांचं आव्हान पूर्ण करताना एका क्षणाला बंगळुरुची अवस्थाही खराब झाली होती. परंतू दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेल यांनी शेवटपर्यंत मैदानात तग धरुन राहत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. कोलकात्याच्या बॉलर्सनीही […]

नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडीयमवर झालेल्या सामन्यात RCB ने कोलकाता नाईट रायडर्सवर ३ विकेट राखून मात करत यंदाच्या हंगामातला पहिला विजय मिळवला आहे. कोलकात्याने विजयासाठी दिलेलं १२९ धावांचं आव्हान पूर्ण करताना एका क्षणाला बंगळुरुची अवस्थाही खराब झाली होती. परंतू दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेल यांनी शेवटपर्यंत मैदानात तग धरुन राहत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. कोलकात्याच्या बॉलर्सनीही या सामन्यात चांगला मारा केला, परंतू अखेरीस त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले.
टॉस जिंकून RCB चा कर्णधार डु-प्लेसिसने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराने घेतलेला निर्णय RCB च्या गोलंदाजांनीही सार्थ ठरवला. अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर ही कोलकात्याची सलामीची जोडी फोडल्यानंतर इतर फलंदाज मैदानावर स्थिरावूच शकले नाही. आकाशदीप आणि हसरंगा जोडीने ठराविक अंतराने कोलकात्याच्या फलंदाजांना माघारी धाडणं सुरु ठेवलं. अखेरच्या फळीत आंद्रे रसेल, उमेश यादवने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकात्याने सामन्यात शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला.
RCB कडून हसरंगाने ४, आकाशदीपने ३, हर्षल पटेलने २ तर मोहम्मद सिराजने १ विकेट घेत कोलकात्याला १२८ धावांवर रोखलं.
IPL 2022 : दुसऱ्या सामन्यात मुंबईला सापडेला का विजयी सूर?
प्रत्युत्तरादाखल RCB च्या डावाची सुरुवातही अडखळती झाली. सलामीवीर अनुज रावतला शून्यावर माघारी धाडण्यात उमेश यादवला यश आलं. यानंतर कर्णधार फाफ डु-प्लेसिसही अजिंक्य रहाणेच्या हातात सोपा कॅच देऊन माघारी परतला. या दोन धक्क्यांमधून संघ सावरतो न सावरतो तोच उमेश यादवने विराट कोहलीलाही आपल्या जाळ्यात फसवलं. संघ संकटात सापडलेला असताना डेव्हीड विली आणि शेर्फन रुदरफोर्ड यांनी छोटेखानी भागीदारी करुन संघाचा डाव सावरला.
सुनील नारायणने विलीला माघारी धाडत RCB ची जोडी फोडली. यानंतर मैदानात आलेल्या शाहबाज अहमदनेही फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण केली. परंतू कोलकात्याने मोक्याच्या क्षणी विकेट घेत सामना हातातून निसटणार नाही याची काळजी घेतली. परंतू हर्षल पटेल आणि दिनेश कार्तिक यांनीही मैदानात तग धरुन अखेरच्या ओव्हरमध्ये संघाला विजयासाठी ७ धावांचं आव्हान आणून ठेवलं. दिनेश कार्तिकने आंद्रे रसेलच्या पहिल्याच बॉलवर सिक्स लगावत कोलकात्याच्या आव्हानातली हवाच काढून घेतली. यानंतर दुसऱ्याच बॉलवर चौकार लगावत RCB ने सामन्यात ३ विकेटने बाजी मारली.
कोलकात्याकडून टीम साऊदीने ३, उमेश यादवने २ तर नारायण आणि चक्रवर्तीने १-१ विकेट घेतली. परंतू कडवी झुंज दिल्यानंतरही ते RCB ला विजयापासून रोखू शकले नाहीत.