Tokyo Olympic 2020 : भारताची पदकाची आशा संपुष्टात, दिपीका कुमारीची निराशाजनक कामगिरी
टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला तिरंदाजीत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारतीय खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या दिपीका कुमारीला दक्षिण कोरियाच्या अॅन सानकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. २० वर्षीय सानने संपूर्ण सामन्यावर आपलं वर्चस्व राखत ६-० च्या फरकाने बाजी मारत उपांत्य फेरीत प्रवेश केला. रशियाच्या खेळाडूवर मात करुन उपांत्यपूर्व फेरीत दाखल झालेल्या दिपीका कुमारीमुळे […]
ADVERTISEMENT

टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला तिरंदाजीत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारतीय खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या दिपीका कुमारीला दक्षिण कोरियाच्या अॅन सानकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. २० वर्षीय सानने संपूर्ण सामन्यावर आपलं वर्चस्व राखत ६-० च्या फरकाने बाजी मारत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
रशियाच्या खेळाडूवर मात करुन उपांत्यपूर्व फेरीत दाखल झालेल्या दिपीका कुमारीमुळे भारतीयांना या खेळात पदकाची आशा होती. परंतू कोरियन खेळाडूने दिपीका कुमारीला संधीच दिली नाही. पहिल्या सेटमध्ये सात गुण घेत दिपीकाची सुरुवातच निराशाजनक झाली. यानंतरच्या दोन प्रयत्नांमध्ये दिपीकाने दोन १०-१० गुण मिळवत कमबॅक केलं. परंतू दुसरीकडे अॅन सानने तिन्ही संधींमध्ये १०-१० गुणांची कमाई करत पहिला सेट खिशात घातला.
संपूर्ण सामन्यात दिपीका कुमारी दडपणाखाली खेळताना जाणवत होती. याआधीही अॅन सानने दिपीकाला हरवलं होतं. दुसऱ्या सेटच्या पहिल्या प्रयत्नात दिपीकाने १० गुणांची कमाई करत चांगली सुरुवात केली. कोरियाच्या सानने ९ गुण मिळवल्यामुळे दिपीकाकडे एका गुणाची आघाडी होती. परंतू नंतरच्या दोन संधींमध्ये ७-७ अशी निराशाजनक कामगिरी करत दिपीकाने सेट गमावला.
Tokyo Olympic Explainer : तिरंदाजीत दक्षिण कोरिया कसं गाजवतं एकहाती सत्ता? काय आहे त्यांच्या यशामागचं रहस्य?
तिसऱ्या आणि अखेरच्या सेटमध्ये मैदानावरील वाऱ्यामुळे एकही तिरंदाज १० गुणांची कमाई करु शकली नाही. परंतू या परिस्थितीतही कोरियाच्या अॅन सानने सेट जिंकत दिपीकाचं आव्हान संपुष्टात आणलं. आता तिरंदाजी प्रकारात अतानू दासच्या रुपाने भारताला पदकाची एकमेव आशा आहे.
Tokyo Olympic 2020 : अतानू दासचा मोठा विजय ! अटीतटीच्या लढतीत दिग्गज कोरिअन खेळाडूवर मात