Tokyo Olympic 2020 : ४१ वर्षांनी भारतीय हॉकी संघ पदकाच्या शर्यतीत, इंग्लंडवर ३-१ ने मात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. तब्बल 49 वर्षांनी भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. इंग्लंडवर ३-१ ने मात करत भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपली पदकाची आशा कायम ठेवली आहे. 1972 साली भारतीय संघाने म्युनिच (जर्मनी) येथे झालेल्या खेळांमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करत आपलं शेवटचं पदक जिंकलं होतं. यानंतर भारतीय हॉकीचा पडता काळ सुरु झाला. परंतू टोकियोत मनप्रीत सिंगच्या भारतीय संघाने आज इतिहासाची नोंद करत पुन्हा एकदा पदकाच्या आशा जागवल्या आहेत.

भारतीय संघाने सामन्यात आक्रमक सुरुवात केली. स्पर्धेत आव्हान कायम राखण्यासाठी भारताला या सामन्यात विजय आवश्यक होता. सातव्या मिनीटाला भारतीय खेळाडूंनी इंग्लंडचा बचाव भेदत इंग्लंडवर दडपण आणलं. याचा फायदा घेत दिलप्रीत सिंगने सुरेख मैदानी गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्याच सत्रात गोल झाल्यामुळे इंग्लंडचा संघ काहीसा भांबावला. यानंतर इंग्लंडने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतू गोलकिपर पी.आर.श्रीजेश आणि बचावफळीने इंग्लंडचे सर्व हल्ले परतवून लावले.

पहिल्या सत्राच्या अखेरीस भारताने आपल्याकडे १-० अशी आघाडी कायम ठेवली. ही आघाडी कमी होती की काय तोच दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच भारताने इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. इंग्लंडचा बचाव भेदून पेनल्टी एरियात प्रवेश करत भारताच्या गुरजंत सिंहने आणखी एक गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. सुदैवाने मध्यांतरापर्यंत भारताने आपली २-० ची आघाडी कायम ठेवत इंग्लंडवर दडपण कायम ठेवलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तिसऱ्या सत्रातही इंग्लंडने गोलपोस्टवरची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतू भारतीय बचावपटूंसमोर त्यांचा निभाव लागला नाही. तिसरं सत्र संपायला दीड मिनीट बाकी असताना इंग्लंडला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी मिळाली होती. परंतू ती संधीदेखील त्यांनी वाया घालवली. परंतू इंग्लंडने यावेळेत बॉलचा ताबा आपल्याकडे ठेवत अखेरच्या ३० सेकंदात आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळवला. अखेरच्या क्षणांमध्ये मिळालेल्या तीन संधीपैकी एका संधीचं सोनं करत इंग्लंडच्या सॅम्युअल वार्डने एक गोल झळकावत भारताची आघाडी २-१ ने कमी केली.

चौथ्या सत्राच्या सुरुवातीला श्रीजेशकडून झालेल्या एका चुकीमुळे इंग्लंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतू भारताच्या बचावफळीने हा प्रयत्न हाणून पाडला. तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात इंग्लंडच्या संघाने आपल्या रणनितीत बदल करुन बॉलचा ताबा जास्तीत जास्त वेळ आपल्याकडे राहिल याची काळजी घेतली. दुर्दैवाने भारतीय खेळाडू अखेरच्या सत्रात बॉलचा ताबा आपल्याकडे घेण्यात अपयशी ठरत होते. यादरम्यान श्रीजेशने इंग्लंडचा आणखी एक पेनल्टी कॉर्नर वाया घालवला. सामना संपायला शेवटची सहा मिनीटं बाकी असताना इंग्लंडच्या खेळाडूला चुकीच्या पद्धतीने थांबल्यामुळे भारतीय कर्णधार मनप्रीत सिंगला येलो कार्ड दाखवून सामन्याबाहेर करण्यात आलं. याबदल्यात इंग्लंडला पेनल्टी कॉर्नरही मिळाला परंतू यावेळीही श्रीजेशच वरचढ ठरला.

ADVERTISEMENT

सामना संपायला अखेरची पाच मिनीटं बाकी असताना इंग्लंडने आपल्या आक्रमणाची धार आणखीन वाढवली. इंग्लंडच्या आघाडीच्या खेळाडूंनी भारतीय गोलपोस्टवर वारंवार हल्ले करायला सुरुवात केली. दुर्दैवाने इंग्लंडच्या खेळाडूंवर नियंत्रण ठेवण्यात भारतीय खेळाडूंच्या चांगलेच नाकीनऊ येत होते. अखेरीस इंग्लंडच्या खेळाडूंकडून बॉलचा ताबा मिळवण्यात भारतीयांना यश आलं. हार्दिक सिंगने निलकांत शर्माच्या सहाय्याने इंग्लंडचा बचाव भेदत ५७ व्या मिनीटाला गोल करत भारताची आघाडी ३-१ अशी आणखी मजबूत केली. यानंतर सामना संपायला अवघं दीड मिनीट शिल्लक असताना भारतीय खेळाडूंनी बॉल इंग्लंडच्या हाफमध्ये राहिल याची काळजी घेतली. सामना संपायला अखेरची ५० सेकंद बाकी असताना इंग्लंडला आणखी एक संधी मिळाली, परंतू त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. ३-१ च्या फरकाने भारताने सामन्यात बाजी मारत भारतीय हॉकीने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतासमोर बलाढ्य बेल्जिअमचं आव्हान असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT