पैसा-पाणी: AI चा खोटेपणा पकडला गेला!

AI चा सरार्स वापर केला जात आहे. पण आता यातील एक खोटं पकडलं गेल्याची घटना समोर आली आहे. जाणून घ्या AI च्या एका घटनेमुळे नेमकं काय घडू शकतं. जाणून घेऊया याचविषयी पैसा-पाणी या विशेष ब्लॉगमधून.

paisa pani blog milind khandekar artificial intelligence falsehood caught know what ai can really do

पैसा-पाणी ब्लॉग

गेल्या आठवड्यात दिल्ली उच्च न्यायालयात एक मनोरंजक घटना घडली. गुरुग्रामच्या Greenopolis Welfare Association (GWA) ने खरेदीदारांना बिल्डरकडून फ्लॅट मिळत नसल्याचा आरोप करणारी याचिका दाखल केली. याचिकेत नमूद केलेले जे निकाल होते ते खरं तर कधीही लिहिले गेले नव्हते, जसे की राज नारायण विरुद्ध इंदिरा गांधी खटल्यातील निकालाचा परिच्छेद 73 चा हवाला देण्यात आला होता. पण हा निकाल फक्त 27 परिच्छेदांचा आहे. हीच गोष्ट दुसऱ्या पक्षकारांनी पकडली. त्यांनी यावेळी सांगितलं की, ही याचिका ChatGPT ने लिहिली आहे. AI hallucinate करत आहे. म्हणजेच खोटं बोलत आहे. याचिका मागे घेण्यात आली.

हे वाचलं का?

आता, विचार करा की अमेरिकन कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) वर 328 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. परिणामी याचिकेत खोटे निकाल पकडले जात आहेत. या खर्चाचा विचार केला तर तुम्हाला समजेल की, एवढ्या पैशात दिल्ली मेट्रोसारखे तब्बल 40 नेटवर्क बांधता येतील. आता, AI मध्ये केलेल्या या गुंतवणुकीतून परतावा मिळेल की तो अपयशी ठरेल याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत?

AI ची जोरदार चर्चा, पण...

Open AI ने ChatGPT लाँच केल्यापासून तीन वर्षे झाली आहेत. यानंतर, सर्व प्रमुख तंत्रज्ञान कंपन्या AI मध्ये आघाडी मिळविण्यासाठी स्पर्धा करू लागल्या. या शर्यतीत, प्रत्येकजण AI मध्ये गुंतवणूक करत आहे, परंतु आता दोन वेगवेगळ्या अहवालांनी त्याच्या परताव्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. MIT च्या एका अहवालात म्हटले आहे की, 95% Generative AI पायलट प्रकल्प अयशस्वी झाले आहेत, म्हणजेच कंपन्या ते पुढे सुरू ठेवू शकलं नाही. फायनान्शियल टाइम्सला असे आढळून आले की, अमेरिकेतील 500 मोठ्या कंपन्यांमध्ये AI ची चर्चा तर बरीच होत आहे. पण जेव्हा गोष्ट AI लागू करण्याची येते तेव्हा कंपन्या मात्र अडखळत आहेत.

AI मुळे नोकऱ्या जाण्याची भीती?

AI मुळे नोकऱ्या जाण्याची भीती कायम आहे. दोन क्षेत्रांमध्ये कंपन्या याचा वापर करत आहेत. ग्राहक सेवा आणि कोडिंग. AI chatbot किंवा कॉलद्वारे ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहे. सॉफ्टवेअर कोडिंगमध्ये देखील AI मदत करत आहे. यामुळे भारतीय आयटी कंपन्यांकडून नवीन भरती होण्याचे प्रमाण जवळजवळ थांबले आहे. Open AI चे संस्थापक सॅम ऑल्टमन म्हणतात की, सॉफ्टवेअर अभियंत्यांची गरज कायम राहील. कारण AI सॉफ्टवेअरची मागणी वाढत आहे. इतर क्षेत्रांमध्ये, त्याची भूमिका सहाय्यक असू शकते, म्हणजेच जे लोकं काम करत आहेत त्यामध्ये AI मदत करेल.

AI आल्यापासून असे अनुमान लावले जात आहेत की, ते लोकांना अनावश्यक बनवेल. वकील, डॉक्टर, पत्रकार आणि शिक्षक या सगळ्याची जागा AI घेऊ शकते. कामासाठी कंटेंट तयार करणाऱ्या किंवा सेवा देण्यासाठी ज्ञानाचा वापर करणाऱ्या लोकांवर त्याचा परिणाम होईल. AI कोणते बदल घडवून आणेल हे सांगणे अजूनही कठीण आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या घटनेतून मिळालेला धडा म्हणजे AI चा आंधळेपणाने वापर टाळा; ते काय म्हणतंय ते पडताळून पाहा, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता.

    follow whatsapp