HDFC बँकेत 12 कोटी लोकांची खाती असून, त्यात 28 लाख कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे. एवढ्या मोठ्या बँकेचे पार्ट टाइम अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांच्या अचानक राजीनाम्याने खळबळ उडाली आहे. आपल्या राजीनाम्यात त्यांनी बँकेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शेअरच्या किमती 52 आठवड्यांतील नीचांकी पातळीवर आहेत. पैसा-पाणी सदरातून जाणून घेऊया याबाबतचं नेमकं सत्य.
ADVERTISEMENT
सर्वप्रथम जाणून घेऊया HDFC ची कहाणी
Housing Development Finance Corporation (HDFC) ची स्थापना 1977 मध्ये एच. टी. पारेख यांनी केली. व्यक्तींना गृहकर्ज उपलब्ध करून देणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. पारेख यांचा हिस्सा नाममात्र होता. सुरुवातीला ICICI ने गुंतवणूक केली होती आणि इतर संस्थांचाही त्यात हिस्सा होता. 1991 मध्ये खुली अर्थव्यवस्था सुरू झाल्यानंतर, खाजगी बँकांना आणखी एक संधी दिसली. 1994 मध्ये HDFC बँक सुरू झाली. HDFC आणि HDFC बँक या दोन्हींनी आपापल्या क्षेत्रात प्रसिद्धी आणि पैसे मिळवले. HDFC बँक ही आपली प्रमोटर कंपनी, HDFC पेक्षाही मोठी झाली. 2023 मध्ये या दोन्ही कंपनींचे विलीनीकरण झाले. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणतेही प्रमोटर नाहीत. तर ही कंपनी व्यावसायिक चालवतात.
अतनु चक्रवर्ती हे गुजरात केडरचे माजी आयएएस अधिकारी असून ते अर्थ मंत्रालयातून सेवानिवृत्त झाले आणि 2021 मध्ये HDFC बँकेचे पार्ट टाइम अध्यक्ष बनले होते. सध्या त्यांची दुसरी टर्म सुरू होती, त्यांची ही टर्म पुढच्या वर्षापर्यंत कायम असणार होती, परंतु त्यांनी अचानक राजीनामा दिला. त्यांच्या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की, बँकेच्या कार्यपद्धती हा आपल्या नीतिमत्ता आणि मूल्यांशी सुसंगत नव्हत्या. पण याचे परिणाम अद्याप अस्पष्ट आहेत.
त्यानंतर, शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर, बँकेने ब्रँच बँकिंगच्या ग्रुप हेडसह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं. दुबई आणि बहरीन शाखांमधील अनिवासी भारतीय (NRI) ग्राहकांना मुदत ठेवींइतकेच (FD)सुरक्षित असल्याचा दावा करून AT1 बॉण्ड्स विकण्यात आले होते. Credit Suisse बँकेच्या दिवाळखोरीमुळे त्यांचे मूल्य शून्य झाले, परिणामी ग्राहकांचे नुकसान झाले. एक वर्षापासून चौकशी सुरू होती. आता कारवाई करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेने HDFC ला एका विशेष श्रेणीत ठेवले आहे. Too big to fail याचा अर्थ असा की बँकेत कोणतीही अनियमितता नसावी, अन्यथा त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) HDFC बँकेत सर्व काही ठीक असल्याचे सांगितले असले तरी, शेअर बाजाराचा मूड मात्र सुधारलेला नाही. बँकेत सर्व काही ठीक आहे यावर बाजाराचा विश्वास बसलेला नाही. पण, आकडेवारीवरून असे दिसून येते की HDFC बँक सुरक्षित आहे.
- ही बँक वार्षिक 60,000 ते 70,000 कोटी रुपयांचा नफा कमावते.
- Capital Adequacy Ratio 20% आहे, तर RBI चे मानक 12% आहे. याचा अर्थ असा की, कर्ज थकल्यास, बँकेकडे प्रत्येक 100 रुपयांच्या कर्जामागे 20 रुपयांचा राखीव निधी (बफर) असतो. हा बँकेचा स्वतःचा निधी आहे, सार्वजनिक ठेवी नाहीत.
- Non Performing Assets (NPA) 0.4% आहे, म्हणजेच प्रत्येक 100 रुपयांच्या कर्जामागे केवळ 40 पैसे थकले आहेत.
बाजाराला या आकडेवारीची जाणीव आहे. HDFC बँकेचे शेअर्स गेल्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा स्वस्तात विकले जात आहेत. गेल्या पाच वर्षांत त्याची सरासरी किंमत नफ्याच्या 25 ते 27 पट राहिली आहे. आता ती 17 ते 18 पटींपर्यंत घसरली आहे. तरीही, लोक खरेदी करण्यास कचरत असतील, तर ते अध्यक्षांच्या राजीनामा पत्रात उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आहे का? बाजार या प्रश्नांच्या उत्तरांची वाट पाहत आहे.
ADVERTISEMENT











