शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का, राज ठाकरेंनी ज्यांचं घेतलेलं भरसभेत नाव त्यांचीच थेट शिवसेनेत एंट्री!

डोंबिवलीमधील भाजप, ठाकरे गट, मनसे आणि इतर पक्षांतील अनेक नेते आणि माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

major blow to bjp from shinde shiv sena former bjp corporators from dombivli join shiv sena a political earthquake in dombivli

डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपला शह

मिथिलेश गुप्ता

• 08:46 PM • 04 Jun 2026

follow google news

डोंबिवली: डोंबिवलीच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून भारतीय जनता पक्षाच्या चार माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरात पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यामुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

हे वाचलं का?

भाजप, मनसे आणि आता शिंदेंच्या शिवसेनेत धात्रकांचा प्रवेश!

या सोहळ्यात भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, माजी नगरसेविका मनीषा धात्रक, माजी नगरसेवक श्रीकर चौधरी आणि माजी नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख, केडीएमसीच्या निवृत्त सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर तसेच विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटावर विश्वास व्यक्त करत पक्षप्रवेश केला.

हे ही वाचा>> महायुती 6 जागांवर बिनविरोध! तनपुरेंच्या जागेवर मात्र ड्रामा, विधानपरिषदेच्या 17 लढती एका क्लिकवर

काही महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने त्यांचे विद्यमान नगरसेवक शैलेश धात्रक आणि मनिषा धात्रक यांना तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे याच नाराजीतून त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मनसेने धात्रक पती-पत्नीसह त्यांच्या मुलीला देखील नगरसेवक पदाचं तिकीट दिलं होतं. दरम्यान, याच निवडणुकीवेळी राज ठाकरे यांनी मुंबई Tak ला दिलेल्या विशेष मुलाखतीत धात्रक कुटुंबीयांचं नाव घेत भाजपवर गंभीर आरोप केले होते. 'निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मनसेत आलेल्या धात्रक कुटुंबीयांना भाजपने 15 कोटींची ऑफर दिली होती.' असा आरोप राज ठाकरेंनी त्यावेळी केला होता.

दरम्यान, आता त्याच धात्रक कुटुंबीयांनी मनसेचेही साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

शिवसेनेकडून भाजपला शह

काही दिवसांपूर्वी मनसे, ठाकरे गटाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर शिवसेनेकडून मोठा शक्तिप्रदर्शन करत भाजपचे चार माजी नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश देऊन एक प्रकारे भाजपला शह देण्याचे काम शिवसेनेकडून करण्यात आले आहे. नुकतेच राज्य सरकारने डोंबिवलीतील प्रसिद्ध पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी 4 एकर 25 गुंठे जागा मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीही भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू आहे.

हे ही वाचा>> मोठी बातमी : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा धमाका, किती जागा बिनविरोध? संपूर्ण यादी

यावेळी प्रवेश करणाऱ्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त केला. डोंबिवलीच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, यापूर्वी केडीएमसी निवडणुकीत भाजप कडून उमेदवारी न मिळाल्यामुळे शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, तर श्रीकर चौधरी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरून आपले राजकीय अस्तित्व दाखवले होते. आता या प्रमुख चेहऱ्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे डोंबिवलीतील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान, हा पक्षप्रवेश सोहळा पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरात आयोजित करण्यामागेही विशेष कारण होते. नुकतेच राज्य सरकारने पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी 4 एकर 25 गुंठे जागा मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तब्बल 14 वर्षांच्या संघर्षानंतर मंदिराच्या भूमीचा प्रश्न मार्गी लागल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंदिरात जाऊन भगवान शंकराचा जलाभिषेक केला आणि दर्शन घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यामुळे डोंबिवलीतील आगामी राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शिवसेनेच्या वाढत्या ताकदीची ही महत्त्वाची नांदी मानली जात आहे.