Personal Finance Tips for Commercial Shop Documents: आजकाल अनेकजण व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने इमारतीमधील दुकान (Commercial Shop) खरेदी करतात. मात्र दुकान खरेदी करताना केवळ जागेचे लोकेशन, किंमत किंवा भविष्यातील नफा पाहून निर्णय घेणे धोकादायक ठरू शकते. बिल्डरकडे आवश्यक कायदेशीर कागदपत्रे आहेत की नाहीत, याची खात्री करणे तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा भविष्यात मालकी हक्क, बँक कर्ज, बांधकाम परवानगी किंवा पुनर्विकासासंदर्भात गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात.
ADVERTISEMENT
दुकान खरेदीपूर्वी कोणती कागदपत्रे तपासावीत?
1. जमीन मालकीची कागदपत्रे (Title Documents)
सर्वप्रथम ज्या जमिनीवर इमारत उभारली आहे त्या जमिनीचा मालकी हक्क बिल्डरकडे किंवा प्रकल्प विकसित करण्याचा अधिकार बिल्डरकडे आहे का, हे तपासणे आवश्यक आहे.
- 7/12 उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड
- विक्रीखत (Sale Deed)
- विकास करार (Development Agreement)
- पॉवर ऑफ अॅटर्नी यांची तपासणी करावी.
2. बांधकाम परवानगी (Building Approval)
महापालिका किंवा संबंधित नियोजन प्राधिकरणाने बांधकामास मंजुरी दिलेली असणे आवश्यक आहे.
- मंजूर बांधकाम नकाशा (Sanctioned Plan)
- Commencement Certificate (CC)
- बांधकाम परवानगी आदेश पाहणे गरजेचे आहे.
3. रेरा नोंदणी (RERA Registration)
जर प्रकल्प रेरा कायद्याच्या कक्षेत येत असेल तर तो प्रकल्प रेरा नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे.
- रेरा वेबसाइटवर प्रकल्प क्रमांक
- बांधकामाची सद्यस्थिती
- मंजूर आराखडा
- पूर्णत्वाची तारीख यांची पडताळणी करता येते.
4. ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (Occupancy Certificate - OC)
इमारतीचे बांधकाम मंजूर आराखड्यानुसार पूर्ण झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून ऑक्युपन्सी सर्टिफिकेट दिले जाते.
- OC नसेल तर वीज आणि पाणी जोडणीच्या समस्या
- बँक कर्जातील अडचणी
- भविष्यातील कायदेशीर वाद उद्भवू शकतात.
5. Completion Certificate (CC)
बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र बिल्डरकडे असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र इमारत नियमांनुसार पूर्ण झाल्याची खात्री देते.
6. एनओसी (No Objection Certificates)
दुकान खरेदीपूर्वी विविध विभागांच्या एनओसी तपासाव्यात.
- अग्निशमन विभाग (Fire NOC)
- पर्यावरण विभाग
- विमानतळ प्राधिकरण (लागू असल्यास)
- प्रदूषण नियंत्रण मंडळ
7. एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट (Encumbrance Certificate)
मालमत्तेवर कोणतेही कर्ज, तारण, न्यायालयीन वाद किंवा इतर आर्थिक बोजा नाही याची खात्री करण्यासाठी हे प्रमाणपत्र महत्त्वाचे असते.
8. विक्री करार (Agreement for Sale)
दुकान खरेदीचा करार स्पष्ट आणि तपशीलवार असावा.
- दुकानाचे क्षेत्रफळ
- कार्पेट एरिया
- किंमत
- पार्किंग हक्क
- ताबा देण्याची तारीख
- दंडाची तरतूद स्पष्ट नमूद असणे आवश्यक आहे.
9. सोसायटीची माहिती
- सोसायटी स्थापन झाली आहे का?
- कन्व्हेयन्स झाले आहे का?
- देखभाल खर्च किती आहे? याची माहिती घ्यावी.
10. मालमत्ता कर आणि इतर देणी
- मालमत्ता कर थकबाकी
- पाणीपट्टी
- वीज बिल
- इतर शासकीय देणी नाहीत याची खात्री करावी.
मालमत्ता खरेदीपूर्वी स्वतंत्र वकिलामार्फत सर्व कागदपत्रांची तपासणी करून "टायटल सर्च रिपोर्ट" घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा खरेदीदार केवळ बिल्डरच्या आश्वासनांवर विश्वास ठेवतात आणि नंतर फसवणूक किंवा न्यायालयीन वादात अडकतात.
ADVERTISEMENT











