'मोदींना भेटून मी सांगितलेलं की राजीनामा घ्या किंवा...', पवारांनी आता सांगितलं 'त्या' बैठकीत काय घडलं!

मुंबई तक

• 05:03 PM • 25 Jul 2026

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाचा खुलासा केला. पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीत संवाद सुरू ठेवण्याचा आणि राजीनामा किंवा चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा सल्ला दिल्याचे त्यांनी सांगितले.

sharad pawar makes a major revelation following dharmendrad pradhan resignation i had told modi either accept resignation or engage in dialogue

शरद पवार आणि मोदींची भेट

Google CTA

पुणे: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली. देशातील युवा शक्तीच्या एकजुटीमुळे हा विजय मिळाल्याचे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेचाही त्यांनी प्रथमच खुलासा केला.

हे वाचलं का?

पवार म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा देशातील युवकांच्या शांततापूर्ण आणि संयमी आंदोलनाचा मोठा विजय आहे. विविध विरोधी पक्षांनी विद्यार्थ्यांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिले. त्याबद्दल त्यांनी सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांचे आभार मानले.

'मोदींना संवाद सुरू ठेवण्याचा दिला होता सल्ला'

शरद पवार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान त्यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्या भेटीत लोकशाहीमध्ये संवाद कायम ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

"लोकशाहीमध्ये संवाद थांबवण्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे संवाद सुरू ठेवावा. एकतर राजीनामा द्यावा किंवा आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांची बाजू ऐकून घ्यावी. त्यासाठी केंद्र सरकारने ज्येष्ठ मंत्र्यांची समिती नियुक्त करावी," असा सल्ला आपण मोदींना दिल्याचा दावा पवारांनी केला आहे.

'अभिजीत दिपके यांनाही चर्चेसाठी तयार राहण्यास सांगितले'

पवारांनी सांगितले की, आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली होती. सरकार संवादासाठी पुढे आले तर चर्चेला नकार देऊ नका, असा सल्ला त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिला होता. सुदैवाने त्यांनीही सकारात्मक भूमिका घेतल्याचे पवार म्हणाले.

'मोदींसोबतच्या चर्चेचा परिणाम दिसला'

शरद पवारांच्या मते, पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेनंतर केंद्र सरकारने आपल्या वरिष्ठ सहकारी मंत्र्यांना विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी नियुक्त केले. त्यानंतर दोन फेऱ्यांत चर्चा झाली.

पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या नाहीत. मात्र दुसऱ्या फेरीत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी वगळता इतर बहुतांश मागण्या स्वीकारण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शवली. तरीही विद्यार्थ्यांनी राजीनाम्याच्या मागणीवर ठाम भूमिका कायम ठेवली आणि अखेरीस धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, असे पवार म्हणाले.

युवा शक्तीचे कौतुक

पवारांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, संयम आणि शांततेच्या मार्गाने युवकांनी आपले म्हणणे देशाच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवले आणि त्यातून सकारात्मक निर्णय झाला. हा लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचा संदेश असल्याचे त्यांनी नमूद केले.

लाठीचार्ज आणि अश्रुधूरावर नाराजी

विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या पोलिसी कारवाईवरही शरद पवार यांनी टीका केली. नव्या पिढीशी संवाद साधण्याऐवजी लाठीचार्ज आणि अश्रुधूराचा वापर टाळला असता, तर सरकारची भूमिका अधिक सकारात्मक दिसली असती, असे ते म्हणाले.

दिल्ली मेट्रोची 18 स्थानके बंद ठेवण्याच्या निर्णयावर टीका

जंतर-मंतरकडे जाणाऱ्या दिल्ली मेट्रोच्या 18 स्थानकांना बंद ठेवण्याच्या निर्णयावरही पवारांनी आक्षेप घेतला. हा निर्णय केवळ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर परिणाम करणारा नव्हता, तर रोज मेट्रोने प्रवास करणाऱ्या लाखो सामान्य नागरिकांनाही त्याचा फटका बसला. त्यामुळे अशी भूमिका योग्य किंवा शहाणपणाची नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.