मुंबई फायनल! मनोज जरांगेंची मोठी घोषणा, आझाद मैदानावर कधी येणार?

मुंबई तक

12 Sep 2026 (अपडेटेड: 12 Sep 2026, 01:15 PM)

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. अंतरवाली सराटीत त्यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांना भावनिक सादही घातली.

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबई फायनल!

point

मनोज जरांगेंची मोठी घोषणा

point

आझाद मैदानावर कधी येणार?

Manoj Jarange, गौरव साळी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून उपोषण करत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता ते मराठा आंदोलकांसह मुंबईला जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. 'आंदोलन अंतरवाली सराटीतच चालू ठेवायचे की मुंबईला जायचे?' असा सवाल त्यांनी समाज बांधवांना केला होता. त्यावर उपस्थित बांधवांनी 'मुंबईला जायचे' असा कौल दिल्यानंतर जरांगे यांनी 'मुंबई फायनल' अशी घोषणा केली. त्यानुसार आता हे आंदोलन थेट मुंबईतील आझाद मैदानावर होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

हे वाचलं का?

'असा' असेल प्रवास

मुंबईकडे जाण्याची घोषणा करताना जरांगे यांनी आंदोलनाची शांततापूर्ण भूमिका स्पष्ट केली. "आपला मार्ग कोणालाही खुन्नस देण्याचा नाही. मराठा समाज सर्वात मोठा असून आपल्याला आता मुंबईत जायचे आहे आणि हक्क मिळवून विजयी होऊनच परतायचे आहे," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, आजच्या आज लगेचच मुंबईला पोहोचणे शक्य नसून, संपूर्ण तयारीनीशी जाण्यासाठी या प्रवासाला किमान दोन ते चार दिवसांचा कालावधी लागणार असल्याचेही त्यांनी समाज बांधवांना सांगितले.

हे ही वाचा : मुंबई उच्च न्यायालयात याचिका, मनोज जरांगेंच्या आंदोलनावर कोर्टाने काय सांगितलं?

आझाद मैदानावर आमरण उपोषण

मुंबईला जाण्याचा सविस्तर मार्ग आणि मुक्कामाचे ठिकाणही जरांगे यांनी जाहीर केले आहे. या यात्रेचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे, दुसरा मुक्काम अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे, तर तिसरा मुक्काम पुणे जिल्ह्यातील हडपसर येथे असणार आहे. चौथा मुक्काम खोपोली किंवा कोपरखैरणे येथे प्रस्तावित असला तरी, सध्यातरी खोपोली अंतिम धरून चालण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. पाचव्या दिवशी सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असून, पाटोदा, श्रीगोंदा आणि पुणे परिसरातील मराठा बांधवांना त्यांनी जोरदार तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचा : 'ठेकेदारांना बाहेर काढा' NUHM आणि BMC महिला कर्मचाऱ्यांचं आंदोलन, काय आहेत मागण्या?

मराठा समाजाला आवाहन

या निर्णायक आंदोलनासाठी जरांगे पाटील यांनी समाजाला एक भावनिक सादही घातली आहे. जे मराठा बांधव काही कारणास्तव प्रत्यक्ष मुंबईला येऊ शकणार नाहीत, त्यांनी या यात्रेच्या मार्गावर किमान एक दिवस तरी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. "ज्या रस्त्यावरून आम्ही मुंबईकडे चाललो आहोत, त्या मार्गावर येऊन आम्हाला मुंबईकडे वाटे लावण्यासाठी आणि आपला आशीर्वाद देण्यासाठी समाज बांधवांनी उपस्थित राहावे," अशी विनंती त्यांनी केली आहे.