Inside Story: CM फडणवीसांना तडकाफडकी बोलावलं दिल्लीला, पण या मीटिंगची आतली कहाणी भलतीच!

ऋत्विक भालेकर

• 11:18 PM • 25 Jul 2026

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीला का बोलावण्यात आलं? जाणून घ्या फडणवीसांच्या दिल्लीवारीमागची आतली कहाणी.

Devendra Fadnavis, Devendra Fadnavis Delhi Visit, Fadnavis Delhi News, Amit Shah Meeting, Narendra Modi, BJP Strategy, BJP News, Union Cabinet Reshuffle, Cabinet Expansion,

Devendra Fadnavis

Google CTA

नवी दिल्ली: मोदी सरकारमधील केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना अचानक वेग आला आणि त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलं.

हे वाचलं का?

बस्स... इथूनच चर्चांना उधाण आलं. काहींनी दावा केला की, फडणवीसांची आता दिल्लीतच वर्णी लागणार तर काहींनी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा सुरू केलीय. पण या सगळ्या चर्चांमागची खरी कहाणी आता आम्ही आपल्याला सांगणार आहोत. कारण दिल्लीत जसं दिसतं तसंच कधीच नसतं!

फडणवीसांच्या दिल्लीवारीची आतली कहाणी

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मोदी सरकारला मोठा राजकीय धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून तातडीने डॅमेज कंट्रोलची रणनीती आखली जात असल्याची माहिती अत्यंत खात्रीलायक सूत्रांकडून समोर येत आहे.

याच पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या असून, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याचा अर्थ फडणवीसांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाणार आहे, असा निष्कर्ष काढणं सध्या तरी घाईचं ठरेल.

हे ही वाचा>> Gen Z चं आंदोलन BJP ला न सुटलेलं कोडं... सरकारचे 'चाणक्य' चुकले तरी कुठे?

कारण, सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीचा केंद्रबिंदू महाराष्ट्रातील बदललेलं राजकीय गणित असू शकतं. अवघ्या काही आठवड्यांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार शिंदे गटात दाखल झाले. त्यामुळे लोकसभेतील शिंदे गटाची ताकद वाढली आहे.

राजकीय समतोल राखण्यासाठी शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी एक मंत्रिपद देण्याचा विचार भाजप नेतृत्व करत असल्याची चर्चा दिल्लीत सुरू आहे. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिल्लीला बोलावण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आता या चर्चेत सर्वाधिक नाव घेतलं जात आहे ते म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांचं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. इतकंच नाही, तर त्यांना एखादं महत्त्वाचं खातेही दिलं जाऊ शकतं, अशीही चर्चा आहे.

हे ही वाचा>> 'मोदींना भेटून मी सांगितलेलं की राजीनामा घ्या किंवा...', पवारांनी आता सांगितलं 'त्या' बैठकीत काय घडलं!

मात्र, दिल्लीतील राजकारण हे अनेकदा शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवण्यात येतं. मोदी आणि अमित शाह यांच्या राजकीय रणनीतीचा अंदाज बांधणं अनेकदा कठीण ठरतं. त्यामुळे फडणवीसांना केवळ सल्लामसलतीसाठी बोलावलं आहे की, त्यांच्या भूमिकेतही काही मोठा बदल होणार आहे, याचं उत्तर पुढील काही दिवसांतच स्पष्ट होईल.

आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर नेमकं काय ठरतं, केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागते आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

अशावेळी फडणवीसांची दिल्लीवारी, श्रीकांत शिंदेंची संभाव्य एंट्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदल या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत का? याचं उत्तरही लवकरच मिळेल.