Personal Finance: सोनं विकत घेण्याऐवजी सोन्यावर कर्ज देणाऱ्या कंपन्यांमध्ये लावा पैसे!

रोहित गोळे

• 06:11 AM • 24 Nov 2026

प्रत्यक्ष सोनं खरेदी न करताही गोल्ड लोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध आहे. या कंपन्यांचा व्यवसाय, कमाईचे स्रोत आणि गुंतवणुकीतील जोखीम जाणून घ्या.

personal finance invest in gold loan companies india stocks

Personal Finance Gold Loan (प्रातिनिधिक फोटो)

Google CTA

Personal Finance Gold Loan Companies: सोन्याचे भाव वाढले की अनेकजण सोने खरेदी करण्याचा किंवा गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात. मात्र, सोन्याच्या वाढत्या बाजारपेठेत कमाई करण्याचा आणखी एक वेगळा मार्ग आहे. तो म्हणजे सोनं तारण ठेवून कर्ज देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे. या कंपन्या ग्राहकांकडून सोन्याचे दागिने तारण म्हणून स्वीकारतात आणि त्याबदल्यात कर्ज देतात. ग्राहकांकडून मिळणाऱ्या व्याजातून या कंपन्यांचे उत्पन्न तयार होते. त्यामुळे प्रत्यक्ष सोने खरेदी न करताही या व्यवसायाच्या वाढीत सहभागी होण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळू शकते.

हे वाचलं का?

1. गोल्ड लोन कंपन्यांचा व्यवसाय नेमका कसा चालतो?

समजा, एखाद्या व्यक्तीला पैशांची गरज आहे. ती व्यक्ती आपले सोन्याचे दागिने गोल्ड लोन कंपनीकडे तारण ठेवते. कंपनी सोन्याची शुद्धता आणि वजन तपासून त्याच्या मूल्याच्या आधारे कर्ज देते. ग्राहकाने ठरलेल्या मुदतीत व्याज आणि मुद्दलाची परतफेड केल्यानंतर त्याला सोने परत मिळते. या व्यवहारातून मिळणारे व्याज हे कंपनीच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन असते. ग्राहकांची संख्या, कर्जवाटप आणि कर्जाची वसुली यावर कंपनीची आर्थिक कामगिरी अवलंबून असते.

2. कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा अभ्यास करता येईल?

भारतीय शेअर बाजारात या क्षेत्रातील काही प्रसिद्ध कंपन्या आहेत. ज्या प्रामुख्याने गोल्ड लोन व्यवसायासाठी ओळखल्या जातात. याशिवाय काही बँकाही गोल्ड लोन व्यवसाय करतात. या कंपन्यांचे शेअर्स NSE आणि BSE वर उपलब्ध आहेत. मात्र, प्रत्येक कंपनीच्या एकूण व्यवसायात गोल्ड लोनचा वाटा वेगवेगळा आहे.

3. सोन्याच्या वाढत्या किमतींचा कंपन्यांना फायदा होतो का?

सोन्याचे भाव वाढल्यास तारण ठेवलेल्या सोन्याचे बाजारमूल्य वाढू शकते. त्यामुळे ग्राहकाला मिळू शकणाऱ्या कर्जाची रक्कमही वाढण्याची शक्यता असते. परिणामी गोल्ड लोनची मागणी आणि कंपन्यांचा कर्जवाटप व्यवसाय वाढू शकतो. मात्र, सोन्याचे भाव वाढले म्हणजे कंपन्यांचा नफा आपोआप वाढेल असे नाही. कर्जाचा खर्च, व्याजदर, स्पर्धा आणि थकीत कर्जांचाही परिणाम होतो.

4. गुंतवणुकीपूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्यात?

कंपनीचे गोल्ड लोन AUM, ग्राहकसंख्या, थकीत कर्जाचे प्रमाण, व्याजातून मिळणारे उत्पन्न, कर्ज उभारण्याचा खर्च आणि नफ्याचे प्रमाण तपासणे आवश्यक आहे. RBI ने गोल्ड आणि सिल्व्हर लोनसाठी नियम अधिक स्पष्ट केले आहेत. कर्जाच्या रकमेप्रमाणे तारणाच्या मूल्याच्या 75 ते 85 टक्क्यांपर्यंत LTV मर्यादा लागू आहे.

5. या गुंतवणुकीत जोखीम किती?

सोन्याचे भाव घसरल्यास तारणाच्या मूल्यावर परिणाम होऊ शकतो. ग्राहकांनी कर्जाची परतफेड न केल्यास कंपन्यांना तारण ठेवलेले सोने लिलावात विकावे लागू शकते. याशिवाय वाढती स्पर्धा आणि RBI चे नियम यांचाही व्यवसायावर परिणाम होतो.

त्यामुळे केवळ सोन्याचे भाव वाढत आहेत म्हणून गोल्ड लोन कंपन्यांचे शेअर्स खरेदी करू नयेत. कंपनीचे आर्थिक निकाल, मूल्यांकन आणि जोखीम तपासूनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. प्रत्यक्ष सोने न खरेदी करता सोन्याशी संबंधित व्यवसायात सहभागी होण्याचा हा एक वेगळा पर्याय ठरू शकतो.

टिप: कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करण्याआधी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.