Mumbai Crime: मुंबईतील वरळी परिसरातून एक खळबळजनक घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. येथे एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधित घटना ही बुधवारी संध्याकाळच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. सुदैवाने, मुलाची आई सतर्क होती आणि तिने वेळीच आरडाओरडा केल्यामुळे आरोपींचा अपहरणाचा प्रयत्न उधळला गेला. घटनेची माहिती मिळताच, आरोपीला जागीच अटक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
मुलाचे वडील सचिन ठोंबरे हे मुंबई पोलिसात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असून ते सध्या कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलाची आई संध्याकाळच्या सुमारास घरी जेवण बनवत होती आणि त्यावेळी तिचा 5 वर्षीय मुलगा शेजारी राहणाऱ्या मुलीसोबत दुकानावर सामान आणण्यासाठी गेला होता. काही वेळाने ती मुलगी धावत घरी आली आणि एक माणूस त्या मुलाला जबरदस्तीने सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं तिने सांगितलं.
हे ही वाचा: मुंबईची खबर: ठाणे ते CSMT प्रवास अधिक सुखकर होणार... 'या' नवीन पुलामुळे मुंबईकरांना मिळणार दिलासा!
आईच्या सतर्कतेमुळे घटना टळली...
मुलाची आई लगेच तिथे पोहोचली आणि एका मध्यमवयीन माणसाला तिने आपल्या मुलाला समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना पाहिलं. त्यावेळी तिने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली आणि तिचा आवाज ऐकून परिसरातील आसपासचे लोक तिथे गोळा झाले. स्थानिकांच्या मदतीने आरोपीला जागीच पकडण्यात आलं आणि मुलाला सुद्धा सुरक्षितपणे आरोपीच्या तावडीतून सोडवण्यात आलं. त्यानंतर, लगेच मुंबई पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
हे ही वाचा: फलटण हत्याकांड: पत्नीने पती आणि प्रियकरासोबत मिळून रचला कट अन् दुसऱ्या प्रियकराची निर्घृण हत्या! मृतदेहाचे तुकडे नदी-तलावात...
संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच, वरळी पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि तिथून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. 55 वर्षीय लक्ष्मण चौधरी अशी आरोपीची ओळख समोर आली असून तो साकीनाका परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरणाचा प्रयत्न केल्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून त्याची कारवाई सुरू केली आहे. मुलाचं अपहरण केल्यानंतर आरोपीचा मुलाला नेमकं कुठे नेण्याचा हेतू होता आणि त्याचा हेतू काय होता? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ADVERTISEMENT











