डोंबिवली: डोंबिवली जवळच्या हायप्रोफाईल समजल्या जाणाऱ्या लोढा-पलावा सिटीतल्या कासा बेला गोल्ड सोसायटीमध्ये बुधवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खेळता खेळता बॉल शेजारच्या इमारतीत गेल्याने काही लहान मुलांनी तो आणण्यासाठी आत प्रवेश केला, मात्र या छोट्याशा कारणावरून सुरक्षा रक्षकाने मुलांवर अमानुष वर्तन करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर येथील परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. लहान मुलांसोबतचं असं वर्तन हे विकृत असल्याचं म्हणत नागरिकांनी आपला राग व्यक्त केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
सदर घटनेत सहभागी असलेला सुरक्षा रक्षक राजेंद्र खंदारे याने संतापाच्या भरात दोन मुलांना पकडले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मुलांचे हात बांधून त्यांना निर्दयपणे मारहाण केली. तुमच्यामुळे गाड्यांचं नुकसान होतं. असं म्हणत त्याने सुरुवातीला ओरडा केला. त्यानंतर मुलांशी अत्यंत उद्धट आणि आक्रमक पद्धतीने तो वागू लागला. या सगळ्या नंतर त्याने थेट मुलांचे हात बांधून त्यांना शिवीगाळ देखील केली.
हे ही वाचा>> 55 वर्षाची वासनांध महिला अल्पवयीन मुलाला न्यायची घरी अन् शारीरिक संबंध... नंतर जबरदस्तीने केली 'ती' गोष्ट
जेव्हा मुलांच्या पालकांना ही बाब समजली, त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सुरक्षा रक्षकाला जाब विचारला. मात्र, त्याने आणखी संतप्त होत पालकांनाही अरेरावीची भाषा केली. 'मी कोणाला घाबरत नाही, जे करायचं ते करा!' असे म्हणत त्याने पालकांना देखील सोसायटीच्या परिसरातून बाहेर काढले. या प्रकारानंतर संतप्त पालकांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आरोपी सुरक्षा रक्षक राजेंद्र खंदारे याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
या अमानुष घटनेनंतर पलावा परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, उच्चभ्रू आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायटींमध्ये अशा प्रकारचे वर्तन कसे घडते? याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत.
हे ही वाचा>> झोपलेल्या पतीच्या अंगावर पत्नीनं ओतलं उकळतं तेल, नंतर टाकली चटणी.. मध्यरात्री नुसता राडा!
नागरिकांचा आरोप आहे की, सोसायटी प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा अशा घटकांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण होतात. पोलिसांनी या प्रकरणी मुलांच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करून पुढील तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
