Mumbai Crime: मुंबईतील परळ परिसरात सायबर भामट्यांनी एका 75 वर्षीय वृद्ध नागरिकाला 70 लाख रुपयांना गंडा घातल्याची बातमी समोर आली आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत त्याचं नाव समोर आल्याचा दावा करून आरोपीने त्या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली. फसवणूक झाल्यानंतर, पीडित व्यक्तीने 28 सप्टेंबर रोजी आरएके मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
आरएके मार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर रोजी दुपारी 3:57 वाजता संबंधित वृद्धाला एका महिलेचा फोन आला. त्यावेळी, त्या महिलेने स्वतःची ओळख विनिता शर्मा अशी करून दिली असून ती नवी दिल्लीतील एटीएस नियंत्रण कक्षात अधिकारी असल्याचं तिने सांगितलं. फोनवर त्या महिलेने पीडित व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड संशयास्पद कृत्यांसाठी वापरलं जात होतं, असा दावा केला.
व्हिडीओ कॉलवर धमकी
त्यानंतर लगेचच, पीडित वृद्धाला एक व्हिडिओ कॉल आला. कॉलवर असलेल्या एका व्यक्तीने स्वतःची ओळख आयजी प्रेमकुमार गौतम अशी करून दिली आणि ती व्यक्ती आयपीएस गणवेशात असल्याची तक्रारदाराने माहिती दिली. संबंधित तरुणाने पीडित व्यक्तीला अटक करण्याची, बँक खाती जप्त करण्याची आणि पासपोर्ट ब्लॉक करण्याची धमकी दिली. या डिजिटल अरेस्टच्या भितीमुळे पीडित वृद्ध मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला.
धमकी दिल्यानंतर, आरोपींनी वृद्धाकडून त्याची राजकीय विचारसरणी, उत्पन्न, बँक खाती, मुदत ठेवी, स्टॉक होल्डिंग्ज आणि त्याच्या पत्नीची माहिती अशी वैयक्तिक माहिती मागितली. अशाप्रकारे, आरोपींनी पीडित वृद्धाला आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी रिझर्व्ह बँकेच्या बनावट नियमांचा आधारे, दावा केला की पीडित व्यक्तीचे पैसे आधी व्हाइट मनी म्हणून प्रमाणित केले जातील. या फसवणुकीला बळी पडून, पीडित व्यक्तीने त्याच्या कष्टाच्या कमाईतील एकूण 70 लाख रुपये तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. इतकेच नव्हे तर, पैसे मिळाल्यानंतर, ही फसवणूक करणाऱ्यांनी व्हॉट्सअॅपद्वारे पीडितेला बनावट आरबीआय पावती देखील पाठवली.
हे ही वाचा: सरकारी नोकरी जाण्याची भिती, तीन दिवसांच्या नवजात बाळाला जंगलात सोडलं अन् दगडाखाली... नेमकं काय कारण?
कोणाशीही संपर्क न करण्याचे आदेश
तक्रारदाराने पोलिसांना सांगितलं की, आरोपींनी त्याचा मोबाईल फोन, त्याच्या पत्नीचे मोबाईल फोन आणि घरातील कंप्यूटर तात्पुरते बंद केले. तसेच, पीडित व्यक्तीला कोणाशीही संपर्क न करण्याचं सांगण्यात आलं होतं आणि यामुळे तो मानसिकदृष्ट्या अत्यंत अस्वस्थ झाला.
28 सप्टेंबर रोजी, जेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी त्याच्यावर 1 कोटी रुपयांचं फिक्स्ड डिपॉजिट ट्रान्सफर करण्यासाठी दबाव आणण्यास सुरूवात केली, तेव्हा पीडित व्यक्तीला संशय आला आणि त्याने ताबडतोब आरएके मार्ग पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली आहे.
हे ही वाचा: आई झाल्यानंतर वजन खूप वाढलं! पतीला खटकलं अन् रागाच्या भरात पत्नीसोबत केलं भयानक कृत्य...
पोलिसांचा तपास
पोलिसांनी प्रकरणातील आरोपींचे सर्व व्हॉट्सअॅप मॅसेजेस, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि बँक ट्रान्सफर जप्त केले आहेत. पोलीस आता सायबर ट्रेल आणि बँक खात्यांद्वारे आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि अटक करण्यासाठी काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
