सरकारी नोकरी जाण्याची भिती, तीन दिवसांच्या नवजात बाळाला जंगलात सोडलं अन् दगडाखाली... नेमकं काय कारण?
एका जोडप्याने नोकरी वाचवण्यासाठी त्यांच्या तीन दिवसांच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

तीन दिवसांच्या नवजात बाळाला जंगलात सोडलं

नेमकं काय कारण?
Crime News: मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका जोडप्याने नोकरी वाचवण्यासाठी त्यांच्या तीन दिवसांच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. आरोपींनी त्यांच्या नवजात बाळाला एका जंगलात नेलं आणि नंतर त्याला दगडाखाली चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे. परंतु, सुदैवाने गावकऱ्यांनी त्या बाळाला पाहिलं आणि त्याचे प्राण वाचवले.
नवजात बाळाला जंगलात सोडलं
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपी जोडप्याविरुद्ध कारवाई केली असल्याचं सांगण्यात येत आहे. सरकारी नोकरी वाचवण्यासाठी या जोडप्याने त्यांच्या तीन दिवसांच्या बाळाला जंगलात मरण्यासाठी सोडून दिले होतं, असं तपासात दिसून आलं. आरोपी जोडप्याचं हे चौथं मूल असल्याची माहिती समोर आली आहे. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून रस्त्याने जाणाऱ्या स्थानिकांनी त्याला वाचवलं. त्यानंतर, पीडित बाळाला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथे त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
हे प्रकरण धनोरा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नांदनवाडी गावातील असल्याची माहिती आहे. पोलिसांनी पीडित बाळाचे आरोपी वडील बबलू दंडोलिया आणि आई राजकुमारी दंडोलिया यांना अटक केली असून ते तामिया पोलिस ठाण्याच्या सिधौली गावातील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सरकारी नोकरी जाण्याची भिती
मिळालेल्या माहितीनुसार, बाळाचे वडील बबलू दंडोलिया हे नंदनवाडी प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीचे शिक्षक आहेत. त्यांना आधीच दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांना नुकतंच चौथं मूल म्हणजे एक मुलगा झाला. नोकरी जाण्याच्या भीतीने, आरोपींनी या बाळाला एक ओझं मानून त्याला जंगलात नेलं आणि दगडाखाली दाबून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर दोन्ही आरोपी त्या जंगलात मुलाला टाकून पळून गेले.