Mumbai Crime: प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्याने मुंबईतील एका 24 वर्षीय तरुणाने भयानक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. आरोपी तरुणाने आपल्या प्रेयसीवर चाकूने बरेच वार करून तिचा गळा चिरला आणि इतकेच नव्हे तर, त्या तरुणाने त्याच्या प्रेयसीवर हल्ला केल्यानंतर आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आली आहे. भर रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून परिसरात पोलीस पथक तैनात करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
संबंधित घटना शुक्रवारी सकाळी लालबागच्या चिंचपोकळी परिसरात घडली. आरोपी तरुणाने आपल्या प्रेयसीवर चाकूने हल्ला करण्यासाठी तिचा बराच वेळ पाठलाग केला. त्यानंतर, एका प्रसूती रुग्णालयासमोर तरुणाने पीडितेला पकडलं आणि तिच्यावर चाकूने अनेक वार केले. त्यावेळी, पीडित तरुणी कशीबशी रुग्णालयात पळून गेली.
भर रस्त्यात पीडितेवर चाकूने हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी आणि आरोपी तरुण काळाचौकी पोलीस स्टेशनच्या दिशेने चिंचपोकळी स्टेशनकडे जात होते. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, त्या तरुणाने अचानक भर रस्त्यात पीडित महिलेवर चाकूने हल्ला करायला सुरुवात केली. तिचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात, ती महिला जवळच्या नर्सिंग होममध्ये पळून गेली. त्यानंतर, हल्लेखोर तिच्या मागे नर्सिंग होमच्या आत गेला आणि चाकूने अनेक वार केले. स्थानिक आणि नर्सिंग होम कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी तरुणाने स्वतःवर चाकू चालवला आणि गळा चिरून आत्महत्या केली.
हे ही वाचा: 'त्या' मोठ्या पक्षाच्या WhatsApp ग्रुपमध्ये आल्या अश्लील Video, घाणेरड्या ऑडिओ अन्...
पोलिसांनी दिली माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, सोनू बरई या आरोपी तरुणाला गंभीर जखमा झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला, तसेच प्रकरणातील 24 वर्षीय मनीषा यादव नावाची पीडिता उपचारांसाठी एका खाजगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल आहे. कालाचौकी पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित घटना ही सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास चिंचपोकळीजवळील दत्ताराम लाड मार्गावर घडली. घटनेनंतर दोघांना तातडीने उपचारासाठी परळमधील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर, कालाचौकी पोलीस आणि पोलीस उपायुक्त (झोन-4) आर. रामसुधा घटनास्थळी पोहोचले. तसेच, केईएम रुग्णालयात सुद्धा एक पोलीस पथक तैनात करण्यात आलं आहे.
हे ही वाचा: मुंबईची खबर: वांद्रे-वर्सोवा सी लिंकचं काम सुरू होणार... 'या' मार्गावरील प्रवास आता काही मिनिटांतच पूर्ण होणार!
बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध
प्राथमिक चौकशीतून असं समोर आलं की, आरोपी आणि पीडिता एकमेकांच्या शेजारी राहत असून ते काही काळापासून प्रेमसंबंधात होते, मात्र आरोपी तरुणाला आपली प्रेयसी दुसऱ्याच तरुणासोबत प्रेमसंबंधात असल्याचा संशय असल्याने त्यांचं ब्रेकअप झालं होतं. शुक्रवारी आरोपी तरुणाने पीडितेला जवळच्या परिसरात भेटण्यासाठी बोलवलं होतं. परंतु, त्या दोघांमध्ये अचानक वाद सुरू झाला आणि त्या वादातून ही भयंकर घटना घडली.
ADVERTISEMENT











