Ahilyanagar Crime: अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे 11 लोकांच्या समूहाने एका 22 वर्षांच्या तरुणाचं अपहरण केलं. त्यानंतर, आरोपींकडून तरुणाला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली आणि त्याच्यावर लघुशंका करण्यात आल्याचा किळसवाणा प्रकार समोर आलाय. संबंधित आरोपींनी पीडित तरुणावर जातीवाचक तसेच अपमानास्पद कमेंट्स देखील केल्याचा आरोप आहे. ही घटना 19 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सोनाई गावात घडली. त्यावेळी, पीडित तरुण त्याच्या मित्रासोबत एका रुग्णालयाजवळ उभा होता. पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात 11 आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केली असून त्यापैकी मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
अज्ञात ठिकाणी तरुणाला निर्दयीपणे मारहाण
यासंबंधीत पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव संभाजी लांडे असून त्याचा पीडित तरुणासोबत जुना वाद होता. आरोपी त्याच्या साथीदारांसोबत घटनास्थळी पोहोचला आणि त्या सर्वांनी तरुणाला लाथा-बुक्क्यांनी आणि दांडक्याने बेदम मारहाण केली. दरम्यान, पीडिच तरुणाचा मित्र त्याला वाचवण्यासाठी मध्ये आल्यानंतर त्याला सुद्धा मारहाण करण्यात आली. त्यानंतर, आरोपी त्या तरुणाला बळजबरीने एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पियो गाडीत बसवून अज्ञात ठिकाणी घेऊन गेले आणि तिथे सुद्धा त्याला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली.
हे ही वाचा: विधवा महिलेशी लग्न केलं अन् नंतर पत्नीला 'ते' टोमणे... वाद विकोपाला गेला अन् रागाच्या भरात इस्त्रीने जाळलं!
लघुशंका करत जातीवाचक कमेंट्स...
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणावर लघुशंका करत जातीवाचक कमेंट्स देखील केल्याचं सांगितलं जात आहे. जवळपास तासभर पीडित तरुणाला मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्याला एका कॉलेजजवळ फेकून दिलं. घटनेनंतर, पीडित तरुणाच्या आई-वडिलांनी त्याला स्थानिक रुग्णालयात नेलं आणि तिथून त्याला जिल्ह्याच्या सिव्हिल रुग्णालयात भरती केलं गेलं.
हे ही वाचा: विकृती म्हणावं सूड? कर्ज काढून द्राक्ष बाग फुलवली, अज्ञात व्यक्तीने विषारी औषध फवारुन उद्धवस्त केली
पोलिसांचा तपास
पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात बोलताना सांगितलं की, घटनेतील आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील 11 आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच, इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. उर्वरित आरोपींना लवकरच ताब्यात घेतलं जाणार असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
ADVERTISEMENT











