Mumbai local first non ac automatic door train : मुंबईची लोकल म्हणजे लाखो मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासाचा आधार. मात्र, गर्दीमुळे अनेक प्रवाशांना लोकलच्या दरवाजात लटकून किंवा फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करावा लागतो. हा प्रवास अनेकदा जीवघेणा ठरतो. आता प्रवाशांचा हा धोकादायक प्रवास थांबवण्यासाठी रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबईत पहिली नॉन एसी ऑटोमॅटिक डोअर लोकल ट्रेन दाखल झाली आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे ही 12 डब्यांची लोकल तयार करण्यात आली आहे. या लोकलचे वैशिष्ट्य म्हणजे धावताना तिचे दरवाजे बंद राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दरवाजात लटकून किंवा फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करता येणार नाही. मात्र, ही ट्रेन मुंबईत दाखल झाली असली तरी प्रवाशांसाठी तिची सेवा लगेच सुरू होणार नाही. त्यापूर्वी रेल्वेकडून या लोकलच्या सुरक्षिततेसह तांत्रिक आणि परिचालनाशी संबंधित चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या चाचण्यांचे निष्कर्ष तपासल्यानंतरच नियमित सेवेत समावेश करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Personal Finance: जुन्या गाड्यांमध्येही दडलाय पैशांचा खजिना! गुंतवणुकीची संधी
टप्प्याटप्प्याने ऑटोमॅटिक दरवाजांच्या एसी ट्रेन सुरू करण्याची घोषणा
मुंबई लोकलमध्ये ऑटोमॅटिक दरवाजांची गरज अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. 9 जून 2025 रोजी मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर हा विषय अधिक गंभीर झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन गर्दीच्या लोकलमधील दरवाजांवर उभे असलेले प्रवासी तोल जाऊन रुळांवर पडले होते. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक प्रवासी जखमी झाले होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई लोकलमध्ये टप्प्याटप्प्याने ऑटोमॅटिक दरवाजांच्या एसी ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रवाशांवर तिकिटाच्या दराचा अतिरिक्त भार न टाकता मेट्रोप्रमाणे सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले होते. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर दररोज सुमारे 70 ते 80 लाख प्रवासी प्रवास करतात. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, 2025 मध्ये या नेटवर्कवर विविध कारणांमुळे 2,287 जणांचा मृत्यू झाला. 2024 मध्ये ही संख्या 2,468 होती. 2025 मध्ये धावत्या ट्रेनमधून पडल्यामुळे 525 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर रेल्वे रुळ ओलांडताना 1,063 जणांना जीव गमवावा लागला.
हेही वाचा : Maharashtra weather : वातावरणात बदल, रात्री गारवा अन् दिवसा उष्णता; हवामान खात्याचा अंदाज
ट्रेनच्या छतावरही हवा खेळती राहण्यासाठी व्हेंटिलेटर
या नव्या लोकलमध्ये सुरक्षिततेसोबतच प्रवाशांच्या सोयींचाही विचार करण्यात आला आहे. पारंपरिक नॉन एसी लोकलमध्ये दरवाजे उघडे असल्यामुळे डब्यांमध्ये नैसर्गिक हवा येते. मात्र, ऑटोमॅटिक दरवाजे बंद झाल्यानंतर डब्यांमध्ये उष्णता आणि कोंडी होण्याची शक्यता आहे. ही अडचण लक्षात घेऊन नव्या ट्रेनच्या दरवाजांमध्ये लूव्हर्ड सेक्शन तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे दरवाजे बंद असतानाही बाहेरील हवा डब्यांमध्ये येऊ शकेल. याशिवाय ट्रेनच्या छतावरही हवा खेळती राहण्यासाठी व्हेंटिलेटर बसवण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये वेस्टिब्यूल कनेक्शनची सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येणार आहे. यामुळे गर्दी वेगवेगळ्या डब्यांमध्ये विभागण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. मुंबईत दाखल होण्यापूर्वी या 12 डब्यांच्या ट्रेनची 63 किलोमीटर लांबीच्या खजुराहो-महोबा मार्गावर चाचणी घेण्यात आली आहे. आता मध्य रेल्वेकडून मुंबईच्या उपनगरीय मार्गांवर तिच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. दरवाजांची कार्यप्रणाली, सुरक्षितता आणि प्रत्यक्ष प्रवासातील अडचणी तपासल्या जातील.
दरम्यान, मुंबई लोकलमध्ये ऑटोमॅटिक दरवाजांचा प्रयोग यापूर्वीही करण्यात आला आहे. 2019 मध्ये पश्चिम रेल्वेने महालक्ष्मी वर्कशॉपमध्ये 15 डब्यांच्या लोकलमधील काही डब्यांमध्ये बदल केले होते. या प्रकल्पावर सुमारे 75 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, डब्यांमधील हवा खेळती राहण्याच्या समस्येमुळे हा प्रयोग नियमित सेवेत येऊ शकला नाही. त्याआधी 2016-17 मध्येही अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, गर्दीमुळे दरवाजांवरील ऑब्स्ट्रक्शन सेन्सर वारंवार सक्रिय होत होते. त्यामुळे दरवाजे बंद होण्यास अडथळे येत होते आणि ट्रेनच्या वेळापत्रकावर परिणाम होत होता. 2025 मध्ये मध्य रेल्वेच्या प्रयोगादरम्यानही दरवाजांच्या मोटर गरम होणे आणि सेन्सरमध्ये बिघाड होण्याच्या समस्या समोर आल्या होत्या. त्यामुळे नव्या ट्रेनमध्ये या तांत्रिक अडचणी दूर करणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रत्येक स्थानकावर दरवाजे उघडणे आणि बंद होण्यासाठी लागणारा वेळ हादेखील चाचण्यांमधील महत्त्वाचा मुद्दा असेल. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांची चढ-उतार प्रक्रिया किती सुरळीत होते, हे तपासले जाणार आहे. सर्व चाचण्या आणि आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतरच ही लोकल नियमित प्रवासी सेवेत दाखल होईल.
ADVERTISEMENT












