Mumbai News: बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अॅण्ड ट्रान्सपोर्ट (BEST) कडून बसच्या काही मार्गांमध्ये मोठे बदल करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. हे नवे बदल आज म्हणजेच 1 नोव्हेंबर पासून लागू होणार असल्याची माहिती आहे. काही मार्गांवर एसी बसेस सुरू करण्याचं तर काही मार्गांचा विस्तार केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. प्रवाशांच्या सोयी वाढवणे आणि बेस्ट बस सेवा अधिक कार्यक्षम करणे हाच या बदलांचा मुख्य उद्देश आहे.
ADVERTISEMENT
कोणत्या मार्गांमध्ये बदल?
बॅकबे डेपोवरून चालणाऱ्या A45 आणि मुंबई सेंट्रल डेपोवरून चालणाऱ्या A49 बसेस आता एमएमआरडीए कॉलनी, माहुलऐवजी माहुल गावात जातील. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौक ते शिवडी बस स्टँड पर्यंत चालणाऱ्या बस नं 69 चा मार्ग आता वडाळा डेपो पर्यंत वाढवण्यात आला आहे. बस रूट 6 लिमिटेडला आता वातानुकूलित (एसी) A6 म्हटलं जाणार आहे. ही बस कुलाबा डेपोऐवजी टाटा पॉवर सेंटर ते बॅकबे डेपोपर्यंत धावेल.
'या' मार्गांचा विस्तार
वैशाली नगर मुलुंड ते मरोळ डेपो पर्यंत धावणाऱ्या बस नं 307 चा मार्ग आता A307 म्हणून होली स्पिरिट हॉस्पिटल मार्गे मजास डेपो पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच, घाटकोपर डेपो आणि अंधेरी पूर्वेकडील आगरकर चौक दरम्यान धावणाऱ्या बस नं A533 चा मार्ग आता गोखले पुलावरून अंधेरी स्टेशन पश्चिमेपर्यंत वाढवण्यात आला आहे. यासोबतच, देवनार डेपो आणि बोरिवली स्टेशन पूर्वेकडील दरम्यान धावणारी एसी बस नं 60 आता A458 या नवीन नंबरने धावेल.
हे ही वाचा: Govt Job: देशाच्या खनिज महामंडळात नोकरीची संधी... 'या' पदांसाठी निघाली भरती! परीक्षा नाही अन्...
'या' मार्गांवर धावणार एसी बसेस...
याव्यतिरिक्त, काही बस मार्गांवर वातानुकूलित (एसी) बस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये, मालवणी डेपो ते दहिसर बस स्टँड (A207), वांद्रे रिक्लेमेशन बस स्थानक ते टाटा कॉलोनी (A295), ट्रॉम्बे ते मुलुंड महाराणा प्रताप चौक (A399), विक्रोळी डिपो ते महाकाली गुफा (A410), कांजुरमार्ग बस स्टँड पश्चिम ते भांडुप पश्चिम (A604), भांडुप स्टेशन पश्चिम ते टेंभीपाडा नाका (A605) आणि भांडुप स्टेशन पश्चिम ते अशोक केदारे चौक (A606) यांचा समावेश आहे. या सर्व मार्गांवर आता वातानुकूलित (एसी) बसेस धावतील.
हे ही वाचा: ठाकरे बंधू आणि मविआच्या निवडणूक आयोगाविरोधातील 'सत्याचा मोर्चा'ला सुरुवात; पण मागण्या कोणत्या?
प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर
बेस्ट बस मार्गांच्या या बदलांविषयी सांगताना बेस्ट बसचे अधिकारी म्हणाले की, हे बदल प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यासाठी केले गेले आहेत. या बदलांमुळे बेस्ट बसेस अधिक चांगल्यारितीने धावतील. या बदलांमुळे प्रवाशांसाठी प्रवास अधिक आरामदायी आणि सोयीस्कर होणार असल्याची अपेक्षा आहे. तसेच, बेस्ट बसच्या या सुधारणांमुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत होईल आणि प्रवाशांचा वेळ वाचेल.
ADVERTISEMENT











