Mumbai News: बहुप्रतिक्षित नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज म्हणजेच मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सेवेला ग्रीन सिग्नल देतील. दक्षिण मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 28 ऑगस्टपासून ही ट्रेन दररोज सकाळी 5 वाजता हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून निघेल आणि दुपारी 2:25 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबईला पोहोचेल. वंदे भारत एक्स्प्रेसमधून नांदेड ते मुंबई प्रवासाचा वेळ 9 तास 25 मिनिटे असेल.
ADVERTISEMENT
नांदेड ते मुंबई- किती तासांचा प्रवास?
वंदे भारत एक्सप्रेस पूर्वी मुंबई ते जालना अशी धावत होती. प्रवाशांकडून नांदेड येथूनही वंदे भारत ट्रेन चालवण्याची मागणी होत होती. अखेर मुंबई ते जालना ही ट्रेन नांदेडपर्यंत वाढवण्यात आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस नांदेड ते मुंबई हे 610 किमी अंतर 9 तास 25 मिनिटांत पूर्ण करेल. या ट्रेनमध्ये 20 कोच असतील (एक्झिक्युटिव्ह-02, चेअर कार 18). तिची एकत्रित आसन क्षमता 1440 असेल.
ट्रेनमध्ये असतील ‘या’ सुविधा
याशिवाय, त्यात ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, जीपीएस-आधारित प्रवासी माहिती प्रणाली, आलिशान इंटीरियर, स्पर्श-मुक्त सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट, डिफ्यूज्ड एलईडी लाइटिंग, प्रत्येक सीटखाली चार्जिंग पॉइंट्स, वैयक्तिक टच-बेस्ड रीडिंग लॅम्प आणि लपलेले रोलर ब्लाइंड्स, चांगल्या उष्णता वायुवीजनासाठी यूव्ही लॅम्पसह एअर कंडिशनिंग सिस्टम आणि जंतूमुक्त हवेचा पुरवठा यासारख्या प्रवाशांच्या अत्याधुनिक सुविधा आहेत.
हे ही वाचा: आता WhatsApp वर मिळतील सर्व सरकारी सुविधा... राज्य सरकारचा मोठा निर्णय!
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही ट्रेन बुधवार वगळता आठवड्यातून 6 दिवस नांदेडहून आणि गुरुवारी मुंबईहून धावेल. दरम्यान, मंगळवारी लाँच झाल्यानंतर, वंदे भारत ट्रेन सकाळी 11:20 वाजता मुंबईला रवाना होईल.
तीर्थयात्रा आणि पर्यटनाला चालना
वंदे भारत ट्रेन अनेक शहरांना जलद रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान करेल तसेच तीर्थयात्रा आणि पर्यटनाला चालना देईल. नांदेडमधील जगप्रसिद्ध सचखंड साहिब गुरुद्वारा, जालन्यातील राजूर गणपती मंदिर, तसेच भगवान शंकराची महत्त्वाची तीर्थक्षेत्रे, छत्रपती संभाजी नगराजवळील घरेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, अजिंठा आणि वेरूळ लेणी, यासोबतच मनमाडजवळील शिर्डी हे सेमी-हायस्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटीने जोडले जाईल. यामुळे प्रवाशांना आरामदायी सुविधा मिळणार असल्याचं रेल्वे विभागाने व्यक्त केलं आहे.
हे ही वाचा: नवी नवरी फासावर लटकलेल्या अवस्थेत... माहेरचे म्हणाले, “सासू पती आणि पत्नीच्या मध्ये झोपायची...”
ही गाडी नांदेडहून सकाळी 5 वाजता निघेल, परभणीला सकाळी 5.40 वाजता, जालना 7.20 वाजता, छत्रपती संभाजी नगरला सकाळी 8.13 वाजता, मनमाड जंक्शनला सकाळी 9.58 वाजता, नाशिक रोडला सकाळी 11 वाजता, कल्याणला दुपारी 1.20 वाजता, ठाण्याला दुपारी 1.40 वाजता, दादरला दुपारी 2.08 वाजता आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुपारी 2.25 वाजता पोहोचेल.
ADVERTISEMENT
