मुंबई: 26 जुलै 2005 मुंबईकरांच्या आयुष्यातील भयंकर दिवस होता तो.. 25 जुलैच्या रात्रीपासून उपनगरामध्ये पडणाऱ्या पावसामुळे पाणी तुंबायला लागलं. उपनगरात कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्यात तिथल्या इमारती आणि तिथली माणसं अडकून पडली होती. या भरलेल्या पाण्यात अनेक माणसं आणि संसार.. मुंबईत आलेल्या महाप्रलयात वाहून जात होते, गटांगळ्या खात होते.
ADVERTISEMENT
घराच्या ओढीने ऑफिस सोडून निघालेले मुंबईकर ट्रेन, बस आणि रिक्षामध्ये भरलेल्या पाण्यात अडकून पडले होते. तर काही जण ऑफिसमध्येच राहिले होते. बीकेसीमध्ये तेव्हा एक डबलडेकर बस संपूर्ण पाण्याखाली गेली.. अशी हृदय हेलावणारी दृश्य मुंबईच्या अनेक भागात, गल्ल्यांमध्ये दिसत होती.
असा महापूर मुंबईने कधीच पाहिला नव्हता...
मुंबईत पाऊस येणं आणि पाणी भरणं ही काही पहिल्यांदाच घडलेली घटना नाही. वर्षानुवर्ष मुंबईमध्ये जेव्हा-जेव्हा खूप पाऊस पडतो. किंवा सलग पाऊस पडतो 4-5 तास.. तेव्हा मुंबईतील कोणत्या ना कोणत्या भागात पाणी भरण्याचे प्रकार होतच असतात. हे अनेक वर्ष.. जेव्हापासून मुंबईची निर्मिती झाली आहे तेव्हापासून मुंबईने या गोष्टी बघितलेल्या आहेत.
2005 मध्ये सुद्धा.. ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि मला अजूनही आठवतंय की, मी ऑफिसकडे निघालेलो असताना दुपारपर्यंत ग्रँटरोड आणि इतर स्टेशनमध्ये पाणी भरण्यास सुरूवात झाली होती. तेव्हा साधारण अंदाज आला होता की, पूरस्थिती आहे.
अनेक वर्ष रिपोर्टिंग करत असल्यामुळे ही देखील कल्पना आली होती की, ज्यावेळेस भरपूर पाऊस पडतो त्याचवेळेस जर समुद्राला भरती असेल तर त्यामुळे देखील पाणी भरतं. ओहोटीची वाट बघितली जात होती की, ओहोटी आली की, त्या पाण्याचा निचरा होईल.
पण त्या दिवशी काही तरी वेगळंच घडत होतं. आम्ही अनेक ठिकाणांहून गोष्टी पाठवत होतो. ट्रेन बंद झालेल्या असल्यामुळे आमचं ऑफिस असलेल्या नरीमन पॉईंटवरून आम्ही रस्त्याने उपनगरांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस लक्षात आलं की, माहिमच्या पलीकडे उपनगरांमध्ये जातच येत नाहीए. त्यामुळे काही तरी वेगळं घडलंय याची साधारण कल्पना आली.
त्यादिवशी रात्री अचानक ज्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणांवरून लोकांचे फोन यायला लागले लँडलाइनवर की, आम्ही या-या ठिकाणी अडकलो आहोत. खासकरून पूर्व उपनगरांमध्ये बऱ्याच ठिकाणांहून फोन ऑफिसमध्ये येत होते.
मला आठवतंय की, दुसऱ्या दिवशी मुंबई महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की, 'आम्ही मदत द्यायला चाललो आहोत हेलिकॉप्टरने.' हे मी कधीच ऐकलं नव्हतं की, मुंबईत कधी हेलिकॉप्टरने लोकांना मदत पुरवली जाईल.
त्यावेळी आम्ही त्यांच्या बरोबर गेलो. त्यावेळेस पहिल्यांदा मला लक्षात आलं की, मुंबईची काय अवस्था झाली आहे. आदल्या दिवशी दुपारच्या सुमारास पाणी भरायला सुरूवात झाली होती आणि आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी 3-4 वाजेच्या सुमारास गेलो होतो. तुम्हाला विश्वास नाही बसणार की, त्याही वेळेस मुंबईमध्ये काहीच दिसत नव्हतं. फक्त पाणी..
मला कुर्ला स्टेशन आठवतंय की, तिथे लोकं टपावर बसले होते. तिथे खाली खाण्याचे फूड पॅकेट टाकत होते. ती मुंबई कधीच बघितली नव्हती.
साहिल जोशी, मॅनेजिंग एडिटर, मुंबई Tak
मुंबईत भरलेलं हे पाणी ओसरायला तब्बल दोन दिवस लागले. सुमारे 1000 लोकांचे प्राण या महाप्रलयाने घेतले अशी माहिती हळूहळू समोर आली. हा महाप्रलय म्हणजे जिच्या अस्तित्वावर मुंबईकर उठले त्या मिठी नदीने मुंबईकरांवर उगवलेला सूड होता.
मिठी ही नदी आहे ही जाणीव तेव्हाने नव्याने राज्यकर्त्यांना आणि मुंबईकरांना झाली.
'सरकारकडून कोणतीही माहिती त्या पद्धतीची मिळत नव्हती. विलासराव देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली तिसऱ्या दिवशी. त्यावेळी आम्ही त्यांना विचारलं की, तुमची आपत्ती निवारणाची व्यवस्था काय होती? तर त्याचं त्यांना उत्तरच देता आलं नव्हतं.'
'कारण कोणत्याही सरकारने विचारच केला नव्हता की, मुंबईची कधी अशी अवस्था होईल.'
साहिल जोशी, मॅनेजिंग एडिटर, मुंबई Tak
'660 मिमी.. म्हणजे 26 इंचापेक्षा जास्त पाऊस हा 24 तासात हा आजपर्यंत कधीही झालेला नाही आजपर्यंतच्या इतिहासात.. हा पहिल्यांदाच एवढा पाऊस झाला आहे. तुम्हाला तर माहिती आहे की, रेल्वे प्रवास बंद झाला आहे. विमान प्रवास बंद आहे. अनेक गाड्या या रस्त्यातच अडकून पडल्या आहेत. अनेक जण गाड्या सोडून आपआपल्या घरी निघून गेले आहेत.'
आम्ही नौदलाकडून मदत मागितली, नौदलाच्या ज्या बोटी आहेत त्या देण्याचं त्यांनी कबूल केलं आहे. मला वाटतं की, दुपारपर्यंत बोटींशी संपर्क करून लोकांना काढून सुरक्षित जागी त्यांना घेऊन येऊ.'
(तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख - जुलै 2005)
'खरं तर ही ढगफुटी झाली होती.. वर्षानुवर्ष जी बांधकामं झाली होती.. अनेक रिपोर्ट्समधून आमच्या ही गोष्ट लक्षात आली की, बांधकामांमुळे अनेक मार्ग बंद झाले होते. मिठी नदी काय भयावह रूप घेऊ शकते याची कल्पना आम्हाला पाचव्या-सहाव्या दिवशी आली. कारण त्या भागामध्ये गेल्यावर तेथील लोकांनी.. म्हणजे कलिना, कुर्ला भागात राहणाऱ्या लोकांनी स्वत:च्या हँडी कॅमेऱ्यामध्ये त्यावेळी मोबाइलमध्ये फोन नव्हते. जे व्हिडिओ फुटेज शूट करून ठेवलं होतं त्यावेळेस लक्षात आलं की, अक्षरश: डबल डेकर बस बुडेल इथपर्यंत पाणी अनेक ठिकाणी भरलं होतं.'
'कारण ज्या मिठी नदीच्या माध्यमातून त्या भागातील पाणी वाहून जायचं ती मिठी नदीच पूर्णपणे भरून गेली होती.'
साहिल जोशी, मॅनेजिंग एडिटर, मुंबई Tak
राज ठाकरेंनी भर सभेत दाखवलेली आजची मिठी नदी
मुंबईला मिठीचं नदी म्हणून अस्तित्व म्हणून मान्य करावं लागलं. तिच्यावर सुरू असलेली केली गेलेली आक्रमणं थांबविण्यासाठी मुंबईचं इथल्या लोकांचं अस्तित्व वाचविण्यासाठी हात-पाय मारायला सुरूवात झाली. आश्चर्य म्हणजे तोवर मुंबईच्या गावीही नव्हतं. की, मिठी ही एक नदी आहे आणि मुंबईतील भररस्त्यातून ती वाहते.
महापुरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी मुंबईतील जीवघेण्या पुराची कारणं शोधण्याच्या सूचना दिल्या. नंतर नदी पात्रातील बांधकामं हटविण्याचे आदेश दिले. अतिक्रमणांवर कारवाई झाली. 2005 ते 2025 दरम्यान, मुंबईतील या नदीला कोणी गांभीर्याने घेतलंच नाही.
राजकीय नेत्यांनी याबाबत अनेक आरोप-प्रत्यारोप केले. एकमेव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या नदीचा आणि तिच्या अस्तित्वाचा मुद्दा पुन्हा काढला. जे राजकारणी बोलणं टाळत होते ते राज ठाकरे बोलले. इतर राजकारण्यांच्या जे गावी नव्हतं. ते राज ठाकरेंनी महाराष्ट्रासमोर, मुंबईच्या जनतेसमोर ते आणलं.
'मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, पाच नद्या.. कदाचित अनेकांना माहिती पण नसेल. त्यातल्या 4 मेल्या. मेल्या म्हणजे मारल्या.. सांडपाणी, झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टींमधून त्या 4 नद्या मेल्या आणि पाचवी ही आता मरायला आली आहे. ती म्हणजे मिठी नदी.. आताची मिठी नदी.. काल मी शूट करायला सांगितलंय काल.. म्हणजे अगोदरचं पण दाखवत नाहीए.. कालचं दाखवतोय. मुंबईतील पाचवी एकमेव राहिलेली नदी.. तिची काय अवस्था आहे ते बघा..'
(मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर भाषणातील अंश)
20 वर्षांपूर्वी मुंबईत आलेल्या पुरामुळे मिठी नदी आणि मुंबईचं भवितव्य बदलेल असं वाटलं होतं. पण 20 वर्षानंतरही त्यात बदल झालेला नाही. खरं तर मिठी नदी अशी पूर्वीपासून प्रदूषित नव्हती. मिठी नदीच्या तीरावर लोकवस्ती वाढत गेली आणि मिठी तिच्या 18 किलोमीटरच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यात प्रदूषित होत राहिली.
संजय गांधी नॅशनल पार्कच्या दक्षिणेला असलेल्या विहार तलावातील पाण्यातून या नदीचा उगम होतो असं म्हणायला हवं. 1856 मध्ये विहार तलावाला बंधारा बांधला. पावसात विहार तलाव भरला की त्याच्या बंधाऱ्यातून बाहेर पडणारं पाणी हेच मिठी नदीचं उगमस्थान..
तिथून पुढे अवघ्या 2 किमीवर अंतरावर असलेल्या पवई तलावातूनही मिठीच्या पाण्यात भर पडत राहते. पावसात तलाव भरला की, मिठीचा अरबी समुद्राच्या भेटीच्या प्रवासाला वेग येतो. त्याआधी मिठी पवई फिल्टर पाडा, रहेजा कॉम्प्लेक्स, साकीनाका, असल्फा, क्रांतीनगर, कुर्ला, कलिना, एअर इंडिया कॉलनी.. असा प्रवास करत माहीमच्या खाडीतून अरबी समुद्रात सामावते.
मिठी तिच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यात दूषित होत जाते. मिठी नदीच्या वाटेवर लागणाऱ्या नाल्यांमुळे नदीच्या काठावर वसलेल्या लोकवस्ती छोटे उद्योगधंदे, कारखाने यातून निघणारं सांडपाणी यामुळे मिठीचा प्रवाह दूषित होत जातो.
माहीमच्या मच्छिमारांनी काय सांगितलं?
'मागील दीड वर्षांपासून येथे (मिठी नदी) सफाई झालेली नाही. आणि जेव्हा सफाई होते तेव्हा तेथील गाळ काढून दुसऱ्या जागी टाकली जाते. खरं तर गाळ काढून हा दुसऱ्या जागी न्यायला हवा. पण तसं केलं जात नाही. अशी माहिती येथील स्थानिकांनीच दिली आहे.'
लतिफ शेख, प्रतिनिधी (कुर्ला)
हा कचरा आहे ना.. हा काही बीएमसीवाले काढत नाही. पावसाच्या वेळेस तो वर जातो ना.. तोच बीएमसीवाले काढतात.
प्रल्हाद, मच्छिमार (माहीम)
ही किनारपट्टी आहे इथे गुडघ्याएवढा कचरा जमा होतो पावसात. माणूस आतमध्ये मेलेला असेल तर तो दिसत नाही.. एवढा कचरा असतो. सकाळी जेव्हा मतलाई येतं.. म्हणजे गार वारे येतात तेव्हा हे पाणी पूर्ण ब्रीजच्या पलिकडे जातं. बघायला मिळतं की, काळं आणि निळं पाणी मिक्स होताना दिसतं. आम्हाला या मिठी नदीचं काही बदल दिसलाच नाही. तो गाळ आहे तसाच राहणार.. पूर्ण प्लॅस्टिक..
सचिन, मच्छिमार (माहीम)
'सचिन आणि प्रल्हादचा अनुभव या चिखलाचा आपण पाहिलेला आहे. मला वाटतं की, मी यामध्ये उतरून पाहायला हवं.. सचिन आणि प्रल्हाद म्हणतायेत त्याप्रमाणे.. चिकट आहे हा गाळ असं त्यांचं म्हणणं आहे.. जो समुद्रातील गाळ असतो तो चिकट नसतो. सगळी बुरशी आहे.. आणि खाली काही तरी लागतंय..
म्हणजे प्लॅस्टिकच आहे हे सगळं. प्लॅस्टिकच्या पिशव्या आहे. गा सगळा गाळ माझ्या पायाला चिकटला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, 10 मिनिटं या चिखलात राहिलं तर पायाला खाज येते. 10 मिनिटांचा प्रयोग मी करणार नाही. मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहे.
हर्षदा परब (प्रतिनिधी, मुंबई Tak)
आतापर्यंत 25 हजार हत्तींच्या वजनाएवढा गाळ मिठी नदीतून काढलाय
मिठी नदीचं खोलीकरण, रुंदीकरण आणि मिठी नदीमधील गाळ काढणं यावर मुंबई महापालिकेने 2005 ते 2017 या वर्षांमध्ये 659 कोटी रूपये खर्च केलेत.
2005 पासून मिठी नदीमधील गाळ काढला जातोय. दरवर्षी गाळ उपसा करण्यावर कोट्यवधी रूपये खर्च करूनही मिठीवर मोठ्या प्रमाणावर गाळ निघतोच आहे.
यावर्षी मिठी नदीच्या पात्रातून तब्बल 1 लाख 13 हजार एवढा मेट्रिक टन एवढा गाळ काढण्यात आला आहे. ग्रोककडून या गाळाचं विश्लेषण समजून घेतल्यावर समजलं की, मिठी नदीतून काढलेला हा गाळ एवढा आहे की, जो दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरही ठेवणं अशक्य आहे. या गाळाचं वजन 25 हजार हत्ती किंवा 1000 पूर्ण भरलेल्या कार्गो कंटनेर्सच्या वजनाएवढं भरेल.
पूर्वी पावसाळ्यात भरपूर मासे हे यायचे पवईतून. मासे देखील मोठेमोठे यायचे.. 5 किलो, 10 किलो.. असे मासे पकडायचो. पण आता मासे जे येतात ते मेलेले असतात. येथील दूषित पाणी आणि येथील जे लोकं आहेत ते खराब करत आहेत.
पण आता नाला पाहून निराशा होते. पूर्वी मी नदीत उतरून जाळं लावायचो आणि मासे पकडायचो. पावसाळा आला की, तर आम्हाला रोज 1500 रुपये कमवायचो.
जेव्हा मी 16-17 वर्षांचो होतो तेव्हाची ही गोष्ट आहे.. आज 50 वर्षांचा आहे.. पवई तलावातून आजही मासे येतात.. पण 20 दिवस पाऊस थांबला की, हे मासे मिठी नदीतच मरून जातात. मी असं नव्हतं. पूर्वी नदीत मासे असायचे आणि आम्ही मासेमारी करायचो.
(नागरिक, कुर्ला)
मिठी नदीसाठी किती STP प्लांट?
युनेस्कोनो मान्यता दिलेल्या.. अर्थ 5 आर या आंतरराष्ट्रीय संस्थेनुसार, मिठी नदीच्या तीरावर सुमारे 20 लाख लोकं राहतात. ज्यांच्या वापराचं सांडपाणी मिठीत सोडलं जातं. ज्यापैकी काहीच भागात पाण्यावर प्रक्रिया करून ते मिठी नदी पात्रात सोडलं जातं. मिठीमध्ये 93 टक्के प्रदूषण करणारे घटक हे घर कचरा आहेत. नदी काठावर राहणाऱ्या लोकांचं सांडपाणी, कारखान्यांमधील सांडपाणी हे एसटीपी म्हणजेच सीवेज ट्रिटमेंट प्लांटमध्ये प्रक्रिया करून मिठी नदीत सोडणं अपेक्षित आहे.
तशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत. पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. पवई आणि L&T या परिसरात एक एसटीपी प्लँट 2020 साली बसविण्यात आला आहे. जो प्लँट मिठी नदीच्या सुरूवातीच्या टप्प्यात फिल्टर पाडा इथे पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी नदीपात्रात सोडतो.
मी मिठी नदीच्या पात्रात आहे.. फिल्टर पाड्याच्या इकडचंच हे पात्र आहे. हे एसटीपीमधील पाणी सोडणारा हा पाईप आपल्याला पाहायला मिळतो आहे. फुलेनगर, आंबेडकर नगर, जयभीम नगर आणि फिल्टर पाडा येथील जे सीवेज आहे ते नंतर एसटीपीमधून प्रक्रिया करून ते पाणी या मिठी नदीमध्ये सोडलं जातं.
पण मिठी नदीच्याच पात्रात उभं असताना मला पाहायला मिळतं ते म्हणजे अशा अनेक सीवेजच्या लाइन आहेत ज्या मिठी नदीच्या पात्रात येतात.
म्हणजे हा जो एसटीपीचा प्लँट आहे आहे तो पुरेसा नाही. त्यामुळे याची क्षमता वाढविण्याची आवश्यकता बीएमसीला वाटू शकते जर बीएमसीला मिठी नदी स्वच्छ करायची असेल तर. 4 वस्त्यांमधून पाणी येतं इथे आपल्याला ते प्रक्रिया केलेलं पाणी मिठीमध्ये सोडत असल्याचं दिसून येतं.
यामध्ये घाण तर पाहायला मिळत नाही. पण पाण्याचा दर्जा कसा आहे हे आपण सांगू शकत नाही.
हर्षदा परब (प्रतिनिधी, मुंबई Tak)
धारावीतील एसटीपी प्लँट हा 2027 साली सुरू होईल. जो कुर्ला एअरपोर्ट, सफेद पूल आणि बापट नाला या भागातनं येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करेल. 168 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करेल. त्यानंतर ते पाणी मिठी नदीमध्ये सोडलं जाईल.
मिठी नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी मिठीच्या प्रत्येक टप्प्यात काही अंतरावर असे एसटीपी बसविण्याची आवश्यकता आहे.
एमपीसीबी आणि आयआयटी बॉम्बे यांनी 2006 मध्ये प्रदूषण रोखण्यासाठी सीवेज ट्रिटमेंट प्लँट उभारण्याची सूचना दिली होती. तसंच नीरीनं सुद्धा 2015 साली दिलेल्या अहवालातून नदीच्या तटावर 14 लाख लोकं राहतात त्यामुळे सीवेज ट्रिटमेंट प्लँटची आवश्यकता आहे असं नमूद केलं होतं.
त्यानुसार, हे सीवेज ट्रिटमेंट प्लँट उभारले गेले असले तरी सुद्धा नदी तीरावर राहणाऱ्या लोक लोकवस्तीच्या तुलनेत या सीवेज ट्रिटमेंट प्लँटची संख्या कमी आहे. ती वाढविण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं जात आहे.
पाणी शुद्धीकरणासाठी फारसा खर्च नाही, फक्त...
प्रत्येक किलोमीटरला इन सीटू ट्रिटमेंट प्लँट असला पाहिजे. बंधाऱ्यासारखं थोडं बांधायचं किंवा गेटसारखं बनवायचं तिथेच पाणी थांबवायचं तिथेच पाण्यावर प्रक्रिया करायची आणि नंतर पुढे पाणी सोडायचं. तुम्हाला 17-18 छोटे प्लँट लागतील. त्यासाठी फार पैसाही खर्च करावा लागणार नाही आणि त्यासाठी देखभाल खर्च देखील खूप कमी आहे.
स्टॅलिन दयानंद, पर्यावरण कार्यकर्ते (वनशक्ती)
20 वर्षातही ती गोष्ट जमलीच नाही!
मिठी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी आणि मिठी नदीला पूर येऊ नये यासाठी मिठी नदीमधील कचरा आणि गाळ काढण्याच्या सूचना दिल्या जातात. कोणे एकेकाळी मिठी नदी प्राधिकरणाची जबाबदारी असलेल्या एमएमआरडीएचं ऑफिस होतं तिथे BKC सारखं अत्यंत उच्चभ्रू सरकारी आणि खासगी ऑफिसेस असणाऱ्या परिसरातून वाहणाऱ्या मिठी नदीतील दुर्गंधी ही प्रदूषणावर अद्यापही मात करता आलेली नाही याची साक्ष दोते.
यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे उच्चभ्रू परिसरातील विकासाचा फसलेला चेहराही दाखवतो. मिठीचं प्रदूषण दूर करणं हे मागच्या 20 वर्षातही जमलेलं नाही. त्याचं कारण सांगितलं जाते ते मुंबई महापालिका आणि एमएमआरडीए या दोन यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव.
मिठी नदीवर दोन यंत्रणा काम करायच्या.. यापैकी मुंबई महापालिका नदीच्या 12 किलोमीटर परिसरातील गाळ काढायची आणि 7 किलोमीटर परिसरातील गाळ काढायची जबाबदारी ही एमएमआरडीएवर होती.
2005 नंतर नदीच्या विकासाठी जाहीर करण्यात आलेल्या प्राधिकरणाची जबाबदारी ही एमएमआरडीएकडे आली पण ती जबाबदारी 2024 मध्ये एमएमआरडीएने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेकडे सोपवून दिली.
पुरानंतर मिठी नदीचं प्रदूषण, नदी पात्रातील अतिक्रमणं.. या सर्व समस्या समोर आल्या.
'आरेमध्येही मेट्रो डेपो बनवलं, यामुळे तर...'
आता नदीचं जे पात्र आहे त्याला तुम्ही सिमेंट-काँक्रिटने मर्यादित केलं तर नदी वाहणार तरी कशी? मिठी नदी ही आरेच्या जंगलातून येते नंतर ती अंधेर, कुर्ला, बीकेसी आणि नंतर ती माहीम खाडीला मिळते. पण जिथेही तुम्ही पाहाल की, नदी ज्याठिकाणी नदी पात्राबाहेर येते तेव्हा त्याचं नैसर्गिक पाणी हे सखल भागात आधी भरतं.
मुंबई हे वेगळंच शहर आहे. जे मिठी नदीला वेटोळं घालून बसलं आहे. जी थोडीफार जागा शिल्लक राहिली होती. त्या आरेमध्ये देखील आता मेट्रो डेपो बनविण्यात आलं आहे.
या सगळ्यामुळे जी नैसर्गिक नदी आहे तिला तिच्या क्षमतेने वाहण्यास जागाच शिल्लक राहिलेली नाही. अशावेळी नैसर्गिक बंधारे असणं आवश्यक आहे, सिमेंटचे बंधारे नाही.. सिमेंटचे बंधारे बांधले तर ते गटार होऊन जातं.
मिठी नदी पुनर्जीवित करण्यासाठी आपल्या ड्रेनेज सिस्टम काढून रिव्हर सिस्टम आणावी लागेल.
झोरू बथेना, पर्यावरण कार्यकर्ते
'यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनजमेंट, स्ट्रॉम वॉटर ड्रेन आहे, मिठी नदी प्राधिकरण अशी अनेक खाती आहेत आणि वॉर्ड ऑफिसर असतो. हे सगळे एकत्र बसत नाहीत. त्यामुळे कामं रखडून जातात. आता मिठी नदी प्राधिकरण आहे. त्यांना अधिकार द्या.. केवळ त्यांनी बीएमसीला निर्देश द्यावेत. पण हे काही होत नाही.
दरवर्षी गाळ काढला म्हणून हजारो कोटी खर्च करतात. पण सगळ्या मेंबर्सच्या घरात सगळं आनंदाने चाललं आहे. असं माझं वैयक्तिक मत आहे.
स्टॅलिन दयानंद, पर्यावरण कार्यकर्ते (वनशक्ती)
मिठी नदीसाठी तयार करण्यात आलेल्या अॅक्शन कमिटीतील आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक पी. के. दास सांगतात की, 'मिठी नदी काय हे समजून घेतलंच नाही. तिचा विचार एक नदी म्हणून न करता जलवाहिनी म्हणून केला जातोय. ज्या क्षणी नदीच्या पर्यावरण शास्त्राचा विचार करणं आपण थांबवतो त्या क्षणी आपण नदीचा ऱ्हास करू लागतो.'
'थेट भिंत बांधून त्यांनी नदीला नाला बनवलं. आता नाला बनवल्यावर नदीने नाल्याचंच स्वरूप घेतलं आहे. यामध्ये जे पाणी दिसतंय त्यातील बरंच पाणी हे सांडपाणी आहे.
स्टॅलिन दयानंद, पर्यावरण कार्यकर्ते (वनशक्ती)
मिठी नदीतील गाळ उपसामध्ये भ्रष्टाचार
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या नदी-नाल्यातून गाळ काढला जातो. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून नदी नाले स्वच्छ केले जातात. 2005 ते 2021 या कालावधीत नदी नाल्यातून गाळ काढण्यासाठी सुमारे अकराशे कोटी खर्च झाले. मिठी नदीत एवढा गाळ येतो कुठून? या सततच्या प्रश्नामुळे गाळ उपसा करण्यावर संशय व्यक्त करण्यात आला. गाळ उपश्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला.
'2005 मध्ये जेव्हा हा महापूर आला तेव्हा काही वर्ष मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या, निर्देश दिले. गेल्या 23 वर्षात जेवढी साफसफाई झाली, जेवढे पैसे खर्च झाले ते पाण्यात का गेले? कारण संपूर्ण घाण पाणी जे केमिकलचं पाणी काही ठिकाणी रेडीमेक्स कंपनीचं पाणी हे मिठी नदीत प्रवाहित होत होतं. त्यामुळे आपण जेवढे पैसे खर्च केलेत ते सर्व पाण्यात गेले.
अनिल गलगली (आरटीआय कार्येकर्ते)
मिठी नदी भ्रष्टाचाराव भाजप आमदार आक्रमक
मिठी नदी गाळ उपश्यात 2005 पासून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कंत्रासाठी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केरळमधील कंपनी केतन कदम आणि जय जोशी यांच्याशी हात मिळवणी केल्याचा आरोप आहे. भाजपचे विधानपरिषदेतील आमदार प्रसाद लाड यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.
'मिठी नदी उपशाबाबत जी चौकशी चालू आहे ही चौकशी 2022-2023 ची चौकशी सुरू आहे. त्या मिठी नदीची चौकशी 2012 किंवा 2024 पर्यंत करावी. या मिठी नदीच्या भ्रष्टाचारात दोन वर्षात फक्त 68 कोटी भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचा गुन्हा नोंदवला गेल्यामुळे पोलीस आयुक्तांनी आणि ईडी संचालकांना मी 530 पानांचे कागदपत्र आणि पेन ड्राइव्ह दिले.
ज्यामध्ये जवळजवळ हा जो भ्रष्टाचार आहे तो 1000 ते 1200 कोटींच्या वरचा आहे. मिठी नदीला प्रत्येक वर्षी आम्ही कंत्राट काढतो ते 250 ते 300 कोटींचं. ज्यामध्ये आम्ही गाळ काढलेला दाखवतो 2 लाख मेट्रिक टनचा.. त्यामध्ये खरं तर गाळ काढला जातो ते 1 लाख मेट्रिक टनहून कमी. हे तुम्ही उत्तरात दिलं आहे.
आतापर्यंत 10 वर्षात जर 10 लाख मेट्रिक टन गाळ काढला असेल तर तो जवळजवळ 20 लाख मेट्रिक टन गाळ होतो. मला वाटतं की, आपण एक नवीन मुंबई उभी करू शकलो असतो एवढा गाळ काढला. हे यामध्ये दाखवलं गेलं आहे.
प्रसाद लाड, (भाजप आमदार)
मिठी अजूनही प्रदूषणाच्या मगरमिठीत का आहे?
ऑगस्ट 2024 मध्ये सरकारने या प्रकरणात SIT चौकशीचे आदेश दिले. फेब्रुवारी 2025 पासून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (EOW) SIT कडून कंत्राटदार, महापालिका अधिकारी आणि मध्यस्थांची चौकशी केली. यानंतर या प्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांसह 13 जणांवर गुन्हा दाखल झाला.
हा घोटाळा काय असा प्रश्न विचारला तर.. 2005 ते 2021 या काळात मिठी नदीतून गाळ काढण्यासाठी 1100 कोटींचं कंत्राट देण्यात आलं होतं. पालिकेच्या गाळ काढण्याच्या कंत्राटात अनियममता झाल्याचं चौकशीत समोर आलं आहे.
तसंच गाळ काढण्याच्या मशीन्स या जास्त किंमत देऊन भाड्याने घेतल्याने पालिकेवर अधिक खर्चाचा भार पडल्याने त्यात भ्रष्टाचार झाल्याचं चौकशीत म्हटलं आहे.
मिठी नदी गाळ उपसाप्रकरणी 65 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं SIT मध्ये तपास झाल्याचं अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. मिठी नदीतून गाळ काढल्याची माहिती कंत्राटदारांनी चौकशीत दिली पण हा गाळ नेमका कुठे टाकला याचा पुरावा कंत्राटदारांकडे नाही.
म्हणजेच मिठी नदीतून न काढलेल्या गाळाचे पैसे कंत्राटदारांना वितरीत झाल्यामुळे मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचं म्हटलं जातंय.
या प्रकरणाची चौकशी अद्यापाही सुरूच आहे. सरकारने 2025 च्या पावसाळी अधिवेशनात दिलेल्या माहितीनुसार, SIT आता 2006 पासून काढलेल्या गाळाची माहिती घेणार आहे.
मिठी नदीसाठी 2005 पासून सुमारे 10 वेगवेगळ्या समित्यांनी काही उपाय आणि सुधारणा सुचवल्या. 2005 च्या पुराव्यानंतर मिठी नदीचा अभ्यास करून जे काही अहवाल तयार करण्यात आले. त्यापैकी माधवराव चितळे यांच्या सत्यशोधन समितीने मिठी नदीसह इतर नदी, नाल्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याची आवश्यकता असल्याचं सुचवलं होतं.
पण MPCB ने 2014 च्या सर्व्हेनुसार, मिठी नदीचं प्रदूषण हे धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलं असं आवर्जून नमूद केलं होतं. 2015 मध्ये निरीने त्यांच्या अहवालात म्हटलं होतं की, मिठी नदीतून दर महिन्याला तळाशी बसलेला कचरा, वस्तू उपसून काढल्या पाहिजे.
या समित्यांनी सुचवल्यानुसार, पुराशी निगडीत समस्येवर मात करण्यासाठी खोलीकरण, रूंदीकरण करणं आवश्यक आहे. प्रदूषणासाठी निगडीत समस्येवर मात करण्यासाठी नदी काठावरच्या वस्त्या, उद्योगधंदे यातील पाणी प्रक्रिया करून नदी पात्रात सोडणं गरजेचं आहे.
मिठी नदी पात्र पूर्वीसारखं करण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी मिठी नदीच्या तीरावरची अतिक्रमणं हटवणं हे देखील सुचविण्यात आलं आहे. यासाठी नागरिकांचं स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संस्थात्मक, सामाजिक समस्यांसाठी समन्वय हे वेगवेगळ्या संस्थांमध्ये नाही आणि तो प्रस्थापित करणं आवश्यक आहे याचाही उल्लेख करण्यात आला आहे. पण या सगळ्यांचा ताळमेळ आजही बसलेला पाहायला मिळत नाही.
चला मिठीला नदी बनूया..
माझ्या मागे बघत आहात हा नाला नाही तर ही एक नदी आहे. मुंबईतील मिठी नदी.. 20 वर्षांपूर्वी मुंबईत मिठी नावाची नदी वाहते हे आपण स्वीकारलं आणि तिच्याशी नदी म्हणून वागायचं आपलं ठरलं सुद्धा. पण त्यासाठी तिला नदी म्हणून तिच्या मूळ रुपात आणण्यासाठी मागच्या 20 वर्षात हजारो कोटी रूपये खर्च झाले. पण प्रशासकीय गलथान कारभार, प्रशासकीय अनास्था म्हणा.. किंवा या नदीच्या तीरावर राहणाऱ्या लोकांचा हलगर्जीपणा म्हणा.. मिठी ही पुन्हा आपल्याला नदी म्हणून पाहायला मिळालीच नाही किंवा ती नदीच्या मूळ रूपात आलीच नाही.
आता राजकारण म्हणून का होईना आपण सगळ्यां मिळून मिठीला नदी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत एवढीच अपेक्षा...
हर्षदा परब, मुंबई Tak
ADVERTISEMENT
