Navi Mumbai: नवी मुंबईत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाचं नाटक करून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला जाळ्यात अडकवल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. खरं कर, पीडित तरुणाचं अपहरण करून त्याच्या नातेवाईकांकडे तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. प्रकरणातील 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ऑनलाइन मैत्रीपासून थेट खंडणीपर्यंत पोहोचली.
ADVERTISEMENT
भेटण्याचं आमिष दाखवून अपहरण केलं अन्...
घटनेतील 15 वर्षीय पीडित मुलगा दहावीत शिक्षण घेत असून आरोपींनी खोटं इन्स्टाग्राम प्रोफाइल तयार करून स्वतःला मुलगी असल्याचं भासवलं आणि मुलाशी सतत मॅसेजद्वारे संवाद साधला. नंतर, आरोपीने पीडित तरुणासोबत प्रेमाचं नाटक करून त्याचा विश्वास संपादन केला. नंतर त्याला भेटण्याचं आमिष दाखवून त्याला कल्याण (पूर्व) भागातील नांदिवली परिसरात बोलवलं. मुलगा ॲपद्वारे बुक केलेल्या कारमधून त्या ठिकाणी पोहोचला तेव्हा तिथे थांबलेल्या चार संशयितांनी त्याला बळजबरीने पकडलं आणि जवळच्या इमारतीतील एका खोलीत कैद करून ठेवलं.
हे ही वाचा: यवतमाळ: लेकरू झाल्याचा आनंद क्षणार्धात दु:खात बदलला; बाळाला भेटण्यासाठी जाताना वाटेतच वडिलांचा अपघाती मृत्यू...
व्हॉट्सॲपवरून तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी
अपहरणानंतर, संशयितांनी पीडिताच्या कुटुंबीयांना व्हॉट्सॲपवरून व्हॉइस मॅसेज पाठवून 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर, कुटुंबियांनी तातडीने रबाळे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-1 च्या टीमने त्वरित कारवाई सुरू केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली आणि टेक्निकल तपासातून मुलाला नेणाऱ्या कारचा नंबर शोधला. त्यानंतर वाहनचालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने नांदिवली येथे मुलाला सोडल्याची माहिती दिली.
हे ही वाचा: नांदेड : विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा राग, महिलेच्या पतीला पेट्रोल टाकून पेटवलं
या माहितीच्या आधारे पोलिसांनी नांदिवलीतील राजाराम नगर भागातील साई आराधना अपार्टमेंटमधील खोली नंबर 1 वर छापा टाकला. तिथे पीडित मुलगा चारही आरोपींसोबत आढळला. पोलिसांनी मुलाची सुरक्षित सुटका केली आणि आरोपी प्रदीपकुमार जयस्वाल (24), विशाल पासी (19), चंदन मौर्या (19) आणि सत्यम यादव (19) यांना अटक केली. ही कारवाई अपहरणाच्या तक्रारीनंतर अवघ्या 24 तासांत पूर्ण झाली. न्यायालयाने आरोपींना 31 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT











