Thane Crime: ठाण्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका महिलेला आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याची माहिती आहे. महिलेने तिचा प्रियकर आणि त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून आपल्या पतीचं अपहरण केलं आणि त्याला ठाण्यातील खरेगाव खाडीत फेकून दिलं. सुदैवाने, नदीत फेकून दिल्यानंतर पीडित तरुणाने नदीच्या पुलाच्या खांबाला धरून ठेवलं आणि रात्रभर तो त्याच अवस्थेत होता. सकाळी स्थानिकांनी ही धक्कादायक घटना पाहिली आणि त्यांनी त्या तरुणाचा जीव वाचवला.
ADVERTISEMENT
प्रकरणातील पीडित तरुण हा ठाण्यातील वांगणी शहरात चामड्याच्या बॅग्स विकून स्वत:चं घर चालवतो. 2008 मध्ये तरुणाची एका महिलेसोबत ओळख झाली आणि त्यावेळी संबंधित महिला विवाहित होती, अशी माहिती पीडित तरुणाने दिली. ती नेहमी आपल्या मित्राला म्हणजेच पीडित तरुणाला पतीकडून होणाऱ्या जाचाबद्दल सांगायची. कालांतराने, त्याला महिलेविषयी सहानुभूती वाटू लागली आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
लिव्ह इन मध्ये राहिले आणि नंतर लग्न...
काही काळानंतर, त्या महिलेला तिच्या पतीने सोडून दिलं आणि त्यानंतर ती तरुणासोबत राहू लागली. त्या दोघांमध्ये चांगलं नातं निर्माण झालं आणि त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, 2012 मध्ये दोघांनी एकमेकांसोबत लग्न केलं आणि 2016 मध्ये या जोडप्याला एक मुलगा सुद्धा झाला.
शेजारच्या तरुणासोबत झाले प्रेमसंबंध...
काही काळानंतर, त्या महिलेचे तिच्या शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत संबंध निर्माण झाले. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल कळताच, पती आणि पत्नीमध्ये मोठं भांडण झालं. त्यानंतर, महिलेनं आपल्या पतीला शेजारच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असून त्याच्यासोबत राहणार असल्याचं उघडपणे सांगितलं. पत्नीच्या अशा वागण्यामुळे पती रागाच्या भरात घर सोडून निघून गेला. मात्र, कौटुंबिक वादामुळे एक जीवघेणा कट रचण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
घरात बेदम मारहाण अन्...
रविवारी आरोपी महिलेनं पतीला आपल्या घरी बोलवलं. ठाण्यातील त्याच्या घरात पोहचताच पीडित तरुणावर पत्नीचा प्रियकर आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून हल्ला केला. त्यावेळी त्याला आरोपींकडून बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याला ओढून ऑटोरिक्षामध्ये बसवलं. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तरुणाला मुंब्रा येथे नेण्यात आलं आणि तिथे त्याला मारहाण करण्यात आली.
हे ही वाचा: बुलढाण्यात खळबळ! हॉटेलच्या खोलीत सापडले प्रेमी युगुलांचे मृतदेह, प्रेयसीची हत्या अन् प्रियकराने... नेमकं काय घडलं?
नदीत फेकून दिलं...
महिलेच्या प्रियकराने चाकू बाहेर काढून तरुणाला जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचा पीडित तरुणाने आरोप केला. त्याला मारहाण करत असताना आरोपींना एक फोन आला आणि तो फोन स्पीकरवर ठेवताच, पत्नीचा आवाज ऐकू येत होता. 'मारून टाक, एकदाचं संपव त्याला, तो परत आला नाही पाहिजे', असं पत्नी तिच्या प्रियकराला फोनवर सांगत असल्याचं तरुणाने ऐकलं. हल्लेखोर पीडित तरुणाला खरेगावच्या क्रीक पूलापर्यंत गेऊन गेले आणि तिथून त्यांनी त्याला पाण्यात फेकून दिलं.
पण, सुदैवाने पीडित तरुणाने काशेली पूलाच्या एका खांबाला पकडलं आणि नंतर, तो मदतीसाठी ओरडू लागला. त्यान रात्रभर त्या खांबाला धरून ठेवलं होतं. सकाळी काही स्थानिक लोक घटनास्थळी पोहचले आणि पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यावेळी पोलिसांनी दोऱ्यांच्या मदतीने तरुणाला सुखरूपपणे बाहेर काढलं. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तरुणावर उपचार करण्यात आले. पोलिसांनी या घटनेबाबत सांगितलं की, तरुणाने आपल्या पत्नीला जाब विचारला असता तिने पतीला विचारलं की, "तू कसा वाचलास? तुला तर पोहता सुद्धा येत नाही."
हे ही वाचा: गरोदर पत्नीसोबत पतीने केलं निर्घृण कृत्य! आधी बेदम मारहाण अन् नंतर गळा चिरून... अखेर छतावरून मारली उडी
पतीला जिवंत पाहताच पत्नीला मोठा धक्का...
तक्रारीनंतर, पोलिसांनी आरोपी महिला, तिचा प्रियकर आणि दोन अज्ञात साथीदारांविरुद्ध हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि गुन्हेगारी कट याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता तीन इतर आरोपींचा शोध घेत असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
