पत्नीची छेड काढणाऱ्या तरुणाची पतीने डोक्यात दगड घालून केली हत्या; बुलढाणा पोलिसांकडून आरोपीला वाशिममधून अटक

Buldhana Crime : मिळालेल्या माहितीनुसार, 3 मार्च रोजी मेहकर शहरापासून काही अंतरावर एका शेतात 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. राहुल भानुदास बाजड (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. राहुलचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच राहुलच्या मामाने मेहकर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

Buldhana Crime

Buldhana Crime

मुंबई तक

05 Mar 2026 (अपडेटेड: 05 Mar 2026, 03:20 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीची छेड काढणाऱ्या तरुणाची पतीने डोक्यात दगड घालून केली हत्या

point

बुलढाणा पोलिसांकडून आरोपीला वाशिममधून अटक

Buldhana Crime , जका खान : पत्नीची छेड काढल्याच्या रागातून एका 38 वर्षीय पतीने एका तरुणाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी मेहकर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी पतीला वाशिम जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या आहेत.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 3 मार्च रोजी मेहकर शहरापासून काही अंतरावर एका शेतात 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. राहुल भानुदास बाजड (वय 28) असे मृत तरुणाचे नाव आहे. राहुलचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच राहुलच्या मामाने मेहकर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. आपल्या भाच्याची हत्या करण्यात आली असून, संशयास्पद व्यक्तीबाबतही त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांचा तपास आणि फॉरेन्सिक टीम पाचारण

घटनेचे गांभीर्य ओळखून मेहकर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेहाची पाहणी केली असता, राहुलचा चेहरा आणि डोके मोठ्या दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकालाही पाचारण केले होते. तांत्रिक पुरावे आणि मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या संशयावरून पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवले.

आरोपीला वाशिममधून ठोकल्या बेड्या

मृताच्या मामाने ज्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता, तो आरोपी ओम शामराव केनवडकर (वय 38) हा घटनेनंतर फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना तो वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील केनवड गावातील आपल्या शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला तिथून ताब्यात घेतले.

हत्येचे कारण: पत्नीची छेड काढणे

सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या आरोपीने 'पोलिसी खाक्या' दाखवताच आपला गुन्हा कबूल केला. आरोपी ओम केनवडकर याने सांगितले की, मृत राहुल बाजड हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या पत्नीची छेड काढत होता. आरोपीने त्याला अनेकवेळा समज दिली होती, परंतु राहुलच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. पत्नीला सतत होणाऱ्या त्रासामुळे आरोपी प्रचंड संतापलेला होता. 3 मार्च रोजी त्याने राहुलला मेहकर शहराबाहेर एका निर्जन ठिकाणी बोलावले आणि रागाच्या भरात त्याच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याची हत्या केली.

पुढील पोलीस कारवाई

मेहकर पोलिसांनी आरोपी ओम केनवडकर विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मृत राहुल बाजड याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मेहकर पोलीस करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ऑनलाईन गेमिंगच्या नादात स्वत:चं आख्खं कुटुंब संपवलं, कोल्ड्रिंकमध्ये विष मिसळून कुटुंबासह प्यायला; हादरवून टाकणारं प्रकरण
 

 

    follow whatsapp