Mumbai News : मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकावर एका तरुणाने डॉक्टरकीचं कसलंही प्रशिक्षण घेतलं नसताना एका महिलेची प्रसुती केली. जो प्रसंग घडला तेच थ्री इडियट्स चित्रपटातील रँचोने केले होते. खऱ्या आयुष्यातील तोच रँचो हिरो ठरला असून त्याचे नाव विकास बेद्रे असे आहे. या तरुणाची जिकडे तिकडे चर्चा होते. आता याच विकासचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तोंडभरुन कौतुक केले.
ADVERTISEMENT
रोहित पवारांची 'x' पोस्ट जशीच्या तशी
रोहित पवारांनी विकासचे कौतुक करून विकास हा तरुण आपल्याच मतदारसंघातील असल्याचं सांगितलं. त्यांनी ट्विट करत लिहिलं की, 'माझ्या मतदारसंघातील सुपे (ता.कर्जत) येथील विकास बेंद्रे या तरुणाने कोणताही अनुभव नसताना एका अडलेल्या गर्भवती महिलेची सुखरुप प्रसूती करून तिची वेदनेतून सुटका केली. मुंबईत लोकलने प्रवास करत असताना राम मंदिर रेल्वे स्टेशन वर एक महिला प्रसूती वेदनेनं विव्हळत असल्याचं त्याला दिसलं. जवळ कुणी डॉक्टर नव्हता आणि संबंधित महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ॲम्बुलन्सही उपलब्ध होत नव्हती'.
'डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन महिलेची प्रसुती केली'
परंतु प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या या महिलेची अवस्था न पहावल्याने विकासने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन तिच्या सूचनेप्रमाणे यशस्वीपणे प्रसूती केली आणि वेदनांमधून त्या आईची सुटका केली. इथं जात-धर्म न पाहता माणुसकी हाच खरा धर्म आहे, हे त्याने दाखवून दिलं. त्याच्या या धाडसाचं आणि त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं मनापासून कौतुक वाटतं. या कामाबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन!', असं ट्विट करत माहिती दिली. दरम्यान, या घटनेची सर्वच प्रसारमाध्यमांवर चर्चा होताना दिसतेय. त्याने केलेल्या मदतीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
राम मंदिर स्टेशनवर गुरुवारी रात्री 12:40 वाजताच्या एका गर्भवती महिलेची प्रसुती झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही प्रसुती दुसरी तिसरी कोणीही केली नाही, तर ती प्रसुती विकास बेद्रे नावाच्या तरुणाने केली. महिला जेव्हा ट्रेनमध्ये होती तेव्हा तिला प्रचंड वेदना होत होत्या. त्याचवेळी तरुणाने ट्रेनची अपत्कालीन परिस्थिती चैन ओढली. तेव्हा राम मंदिर रेल्वे स्थानकावर लोकल थांबली.
तेव्हा तरुणाने आपली मैत्रीण आणि डॉक्टर देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यांनी विकास बेद्रेला व्हिडिओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया दिली. विकासला कोणत्याही वैद्यकीय शिक्षणाचा अनुभव नव्हता डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येच सूचनांचे पालन केले. त्यानंतर त्याच्या प्रयत्नाला यश आले आणि महिलेनं एका गोंडस बाळाला जन्म दिला.
ADVERTISEMENT
