Dharashiv Crime News : धाराशिव, गणेश जाधव : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाशी फाट्याजवळील पेट्रोल पंपावर पिस्तूलचा धाक दाखवत पेट्रोलचे पैसे न देता पळ काढणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे. ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यावरून पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना जेरबंद केले.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास दोन युवक विना क्रमांकाच्या होंडा शाईन दुचाकीवर पेट्रोल पंपावर आले. त्यांनी दुचाकीत पेट्रोल भरून घेतले. पैसे मागितल्यावर त्यांनी पिस्तूलसदृश एअर गनचा धाक दाखवत तेथून पळ काढला. या घटनेमुळे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच वाशी पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढत येरमाळा पोलिसांच्या मदतीने वाशी पोलिसांनी दोघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे लखन शाहू मोहिते (रा. कळमनुरी, जि. हिंगोली) आणि दिनेश भगवान चव्हाण (रा. आंबेजोगाई, जि. बीड) अशी आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 10 हजार रुपये किमतीची Hawk-Series एअर गन, 85 हजार रुपये किमतीची विना क्रमांकाची होंडा शाईन दुचाकी तसेच धारदार चाकू जप्त केला आहे. या प्रकरणी वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींकडून पुढील चौकशी सुरू आहे. पोलिस अधीक्षक रितू खोकर तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तसेच या दोघांचा इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याबाबतही पोलिसांकडून तपास सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











