Pune Crime News : पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये रोज नव्या गोष्टी समोर येत आहेत. यामध्ये अनेकदा राजकारण्यांचाही समावेश दिसून आला आहे. अशातच आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाचा एक प्रताप समोर आला आहे. युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख नीलेश घारे यांनी पिस्तूल परवाना आणि पोलीस संरक्षण मिळवण्यासाठी एक वेगळाच प्रताप केला. नीलेश घारेने स्वतःच्या गाडीवर गोळीबाराचा बनाव रचल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>कोयत्याचे 17 वार, सूर्यकांतने तडफडत जीव सोडला, बाप-लेकानं कुणाचंच ऐकलं नाही, वाद नेमका काय?
नीलेश घारे याला याप्रकरणी बुधवारी (28 मे) रात्री उशिरा वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली. यापूर्वी या प्रकरणात सचिन गोळे (वय 22), शुभम खेमनार (वय 24) आणि अजय ऊर्फ बगली सकपाळ (वय 21) या वारजेतील तरूणांना अटक करण्यात आली आहे. गोळीबार करणारा संकेत मातले हा अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
19 मे रोजी झाला होता गोळीबार
घारे हे युवासेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष असून, वारजे माळवाडी परिसरातील रामनगर येथे त्यांचे पक्षाचे कार्यालय आहे. 19 मे रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घारे पक्षाच्या बैठकीसाठी कार्यालयात आले होते. त्यांनी आपली कार कार्यालयाबाहेर पार्क केली आणि आत गेले. त्यानंतर काही मिनिटांतच दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी घारे यांच्या गाडीवर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून घारे धावत बाहेर आले, मात्र तोपर्यंत गोळीबार करणारे पसार झाले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
पोलीस तपासात बनाव उघड
घटनेनंतर वारजे माळवाडी पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून तपासाला सुरुवात केली. पाच दिवसांच्या सखोल तपासानंतर पोलिसांनी सचिन गोळे, शुभम खेमनार आणि अजय सकपाळ या तिघांना अटक केली. तपासादरम्यान हा गोळीबार खरा नसून, तो एक बनाव होता, हे समोर आलं. नीलेश घारे यांनी पिस्तूल परवाना मिळवण्यासाठी आणि पोलिस संरक्षण मिळावे यासाठी हा कट रचला होता, असं तपासात उघड झालं. यासाठी त्यांनी आपल्या जवळच्या लोकांना हा बनाव रचण्यास सांगितले होतं.
हे ही वाचा >>मामाच्या मुलावर प्रेम पण कुटुंबाचा विरोध, 16 वर्षाच्या मुलीने थेट... ठाण्यातील धक्कादायक घटना
पोलीस तपासात असं समोर आलं की, संकेत मातले याने प्रत्यक्ष गोळीबार केला. मात्र, तो सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं रवाना केली आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात घारे यांच्याशी असलेले संबंध आणि या बनावातील त्यांचा सहभाग उघड केला. घारे यांनी स्वतःच्या जीवाला धोका असल्याचा कांगावा करून पोलीस संरक्षण आणि पिस्तूल परवाना मिळवण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा बारकाईने तपास केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि तांत्रिक पुराव्यांचा आधार घेऊन हा बनाव उघडकीस आणला. नीलेश घारे यांना बुधवारी रात्री अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर फसवणूक, कट रचणे आणि कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणे यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
