लातूर: बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेश तुकाराम देशमुख उर्फ आर. टी. देशमुख (जीजा) यांचे लातूर जिल्ह्यातील औसा रोडवर बेलकुंडी गावाजवळ आज (26 मे) दुपारी साडेपाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले.
ADVERTISEMENT
प्राथमिक माहितीनुसार, आर. टी. देशमुख हे चारचाकी वाहनातून औसाकडे जात असताना त्यांच्या गाडीवरील चालकाचे उड्डाणपुलावर नियंत्रण सुटले, त्यामुळे गाडीने दुभाजकाचे कठडे तोडत काठावर उलट्या घेतल्या. अपघात इतका गंभीर होता की, गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
हे ही वाचा>> दहावीत 96 टक्के पडलेल्या विद्यार्थीनीने स्वत:ला संपवलं, परीक्षा सुरू असताना वसतिगृहात स्कार्फने...
अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ मदत केली आणि जखमींना बाहेर काढले. मात्र रुग्णालयात नेण्याआधीच देशमुख यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या गाडीचा क्रमांक MH 44 AD 2797 असून गाडीतील चालकही गंभीर जखमी झाला आहे. अपघातामुळे बीड आणि लातूर जिल्ह्यात तसेच राज्याच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोण होते आर. टी. देशमुख?
रमेश तुकाराम देशमुख यांना आर. टी. देशमुख म्हणून ओळखलं जात होतं. माजलगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या (BJP) तिकिटावर निवडणूक देखील लढवलेली. ज्यामध्ये त्यांनी तब्बल 37 हजारांहून अधिकच्या मतांनी विजय मिळवलेला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रकाश सोळंके यांचा पराभव केला होता.
हे ही वाचा>> राजेंद्र हगवणेला अटक, पोलिसांना कसा आणि कुठे सापडला? सोबत सुशील हगवणेही...
आर. टी. देशमुख हे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्ती आणि विश्वासू सहकारी मानले जायचे. ते माजलगाव मतदारसंघाचे 2014 ते 2019 विधानसभा आमदार होते. या काळात त्यांनी स्थानिक विकासासाठी आणि शेतकरी तसेच युवकांच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न केले. त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा होता.
भाजपाच्या संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राजकीय वर्तुळात आणि भाजपमध्ये शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
