Mundhwa land scam, पुणे : पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या व्यवहारात पार्थ पवार यांचा थेट सहभाग नसल्याचे खारगे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. संबंधित व्यवहारात पार्थ पवार यांचे नाव, स्वाक्षरी अथवा थेट भूमिका कुठेही आढळून न आल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.
ADVERTISEMENT
खारगे समितीने आपल्या प्राथमिक अहवालात या जमीन व्यवहारात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या ‘अमेडिया’ कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील, कंपनीला जमीन विकणारी शीतल तेजवानी तसेच संबंधित नोंदणी अधिकाऱ्यांना दोषी ठरवले आहे. तसेच अमेडिया कंपनीकडून सुमारे 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क वसूल करण्याची स्पष्ट शिफारसही अहवालात करण्यात आली आहे.
समितीची मुदत येत्या 6 तारखेला संपत असून, अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आणखी एका आठवड्याची मुदतवाढ मागण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. निवडणुका आणि महापौर निवडणुकीमुळे समितीचे सदस्य व्यस्त असल्याने अंतिम चर्चा आणि निर्णयासाठी शेवटची बैठक आवश्यक असल्याचे कारण यामागे देण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील मुंढवा-कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे 40 एकर जमिनीच्या विक्रीवरून हे संपूर्ण प्रकरण उभे राहिले आहे. बाजारभावानुसार जवळपास 1800 कोटी रुपयांचे मूल्य असलेली ही जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांना विकली गेल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. ही जमीन काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या ‘अमेडिया’ कंपनीने खरेदी केली होती. मात्र नंतर झालेल्या या व्यवहारावर संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी त्या एफआयआरमध्ये पार्थ पवार यांचे नाव नमूद करण्यात आलेले नव्हते.
संवेदनशील मुद्दा कोणता?
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर आणि संवेदनशील मुद्दा म्हणजे संबंधित जमीन ही ‘महार वतन’ची असल्याचा दावा करण्यात आला होता महार वतनाची जमीन ही मूळतः सरकारच्या मालकीची मानली जाते. अशा स्थितीत ही जमीन खासगी व्यवहारातून विक्रीस कशी काय आली, हा मोठा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. सरकारच्या मालकीची असलेली जमीन नियमबाह्य पद्धतीने खासगी व्यक्ती किंवा कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आल्याचा संशय व्यक्त झाला. त् त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले होते.
ADVERTISEMENT











