ADVERTISEMENT
MP Vishal Pati On Delhi Protest : नीट (NEET) परीक्षा आणि पेपर लीक प्रकरणावरून देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले असून, या मुद्द्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. सांगलीचे अपक्ष तथा काँग्रेस समर्थक खासदार विशाल पाटील यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा 'गनिमी कावा' आत्मसात केला असून, त्याच रणनीतीचा वापर करून विद्यार्थी हित आणि अन्यायाविरोधात हा लढा दिला जात असल्याचे पाटील यांनी सांगितले.
प्रधानांचा राजीनामा घेतला पाहिजे
30 जानेवारी मार्ग येथे जाऊन खासदारांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले आणि सरकारला सद्बुद्धी देण्याची प्रार्थना केली. या प्रसंगी बोलताना विशाल पाटील म्हणाले की, रस्त्यावर उतरलेली मुले ही आतंकवादी किंवा पाकिस्तानहून आलेली नसून देशातील सामान्य व गरीब कुटुंबांतील आहेत. शिक्षण व्यवस्थेतील गोंधळामुळे त्रस्त होऊन ती रस्त्यावर उतरली आहेत. केंद्र सरकारने तत्काळ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
हे ही वाचा : 'भात टाकलाय शिजायला...' CJP च्या आंदोलनात पुणेकरांच्या काय प्रतिक्रिया?
क्रेडिट लाटण्याचा काँग्रेसचा हेतू नाही
खासदार पाटील यांनी सांगितले की, आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी काँग्रेस पूर्ण ताकदीने उभी आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सूचनेनुसार खासदारांना विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहे. या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा किंवा क्रेडिट लाटण्याचा काँग्रेसचा कोणताही हेतू नाही, म्हणूनच पक्षाने आंदोलनाचे नेतृत्व न करता विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे पसंत केले आहे.
हे ही वाचा : 'नड्डा भेटू नाही तर...' जंतर-मंतरवर जरांगेंची रोखठोक मुलाखत
सरकारचे पाऊल चुकत आहे
संसदेतील वातावरणावर भाष्य करताना त्यांनी दावा केला की, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांमध्येही सध्या चाललेल्या प्रकारांबद्दल असंतोष आहे. अनेक भाजप खासदारांच्या मुलांनी सोनम वांगचुक यांचे स्टेटस ठेवून या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी खासदार आणि मंत्री आपल्या मनावर दगड ठेवून वागत असून, खासगीत अनेक जण सरकारचे पाऊल चुकत असल्याचे मान्य करत आहेत.
हे ही वाचा : Personal Finance: महिन्याला अगदी कमी पैशात सुरू होणाऱ्या ‘या’ 7 गुंतवणुका
गनिमी कावा
शिक्षण व्यवस्थेवर पूर्ण ताबा मिळवण्यासाठी सरकारने आणलेले 'विकसित भारत शिक्षण अधिष्ठान' विधेयक सध्याच्या वाढत्या विरोधामुळे आणि वातावरणामुळे मागे घ्यावे लागले आहे, असेही त्यांनी नमूद केले. जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होत नाही आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत गनिमी काव्याच्या रणनीतीने हे आंदोलन आणि लढा सुरूच राहील, असा इशारा खासदार विशाल पाटील यांनी दिला.
ADVERTISEMENT












