"जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव...
अंग झाडुनी निघ बाहेरी, घे बिनीवरती धाव"
ADVERTISEMENT
शाहीर अण्णा भाऊ साठेंच्या या ओळी केवळ कविता नाहीत, तर अन्यायाविरोधात उभं राहण्याची घोषणाए. अण्णा भाऊ म्हणतात, समाजात बदल हवा असेल तर अन्यायाला प्रश्न विचारावा लागतो, संघर्ष करावा लागतो.. कारण शांत बसून परिवर्तन घडत नाही.
आता सध्याच्या नव्या पिढीला आपण काय-काय नावं ठेवली? तर रील्सवाली पिढी, मोबाइलमध्ये हरवलेली पोरं, यांना संघर्ष काय असतो, हे काय कळणार?
पण... दिल्लीच्या जंतर-मंतरवर गेल्या काही दिवसांत जे घडतंय.. ते पाहिल्यानंतर एक गोष्ट डोक्यात घट्ट रुतून बसली आहे. ती म्हणजे Gen Z चा विषयच लय हार्डए! कारण ही पिढी ना कुणाच्या आदेशावर चालते, ना कुणाच्या भीतीने मागे हटते, ना लाठी खाल्ल्यानंतर घरी बसते. याउलट लाठी मारणाऱ्या पोलिसांनाच जेवण आणि फुलंही देते! हा विरोध आहे की आंदोलनाचा नवीन चेहरा? हेच आपण आज समजून घेऊया.
जंतर-मंतरवरवरील आंदोलनाकडे पाहिलं तर पहिली गोष्ट लक्षात येते की, हे काही पारंपरिक आंदोलन नाही. इथे एकही मोठा नेता नाही, एकही सर्वमान्य चेहरा नाही. कोणी स्टेजवरून आदेशही देत नाही. कधी वाटतं ही पूर्णपणे स्वयंस्फूर्तीने उभी राहिलेली चळवळ आहे. तर कधी वाटतं यामागे जबरदस्त प्लॅनिंग आहे. पण आंदोलनाकडे बारकाईनं पाहिलंवर कळतं ही गर्दी कोणाच्याच कंट्रोलमध्ये नाही. ना पोलिसांच्या, ना आयोजकांच्या.. म्हणूनच ही पिढी समजून घेणं कठीण आहे.
Gen Z ही व्यक्तीची भक्त नाही...
पूर्वी आंदोलन म्हणजे एक नेता, एक भाषण, एक घोषणा. पण Gen Z ची बातच वेगळी आहे. Gen Z ही व्यक्तीची भक्त नाही, ती विचाराशी जोडली जाते. मंचावरून आवाहन होतं पण प्रत्येक गट स्वतःचा निर्णय घेतो.
प्रत्येकाचा स्वतःचा अजेंडा, स्वतःची भूमिका आणि स्वतःचा आवाज. कदाचित याच कारणामुळे ही पिढी कोणाच्याही हाती सहज सापडत नाही. या आंदोलनात पोस्टर म्हणजे फक्त घोषणा नाही, ती प्रत्येकाची वैयक्तिक स्टोरी होती. कोणाचं पोस्टर राग व्यक्त करतं तर कोणाचं उपरोध, कोणाचा संविधानावर विश्वास तर कोणाचं भविष्याबद्दलचं स्वप्न.
सोशल मीडियावर वाढलेली ही पिढी लांबलचक भाषण करत नाही. ती एका ओळीत, एका पोस्टरमध्ये किंवा एका रीलमध्येच हार्ड विषय एंड करते!
20 जुलैला जेव्हा 'संसद चलो' आंदोलन सुरू झालं तेव्हा अमानुष लाठीचार्ज झाला. अश्रूधूर, गोंधळ, महिलांशी गैरवर्तनाचे आरोप आणि संतप्त विद्यार्थी.. हे सारं काही त्याच दिवशी पाहायला मिळालं. दुसरीकडे एका व्हिडिओमध्ये एक तरुण पोलिसांसमोर छाती ताणून उभा, लाठ्या खातोय आणि म्हणतो "आणखी मारा!" त्याच्या मनात प्रचंड संताप तरीही असामान्य धैर्य...
या सगळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी ज्या पोरांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या त्यांनाच फुलं दिली. आता हे विरोधाचं की माणुसकीचं नवीन समीकरण ते ही Gen झीच जाणो.
व्यवस्थेविरोधात ओरडणारी नाही तर स्वत: व्यवस्था उभी करणारी Gen Z
खरं तर आंदोलन सुरू झालं तेव्हा नेटवर्क बंद झालं. व्हिडिओ अपलोड होत नव्हते की कॅबही मिळत नव्हत्या. पण थांबेल ती Gen Z कसली. या पोरांनी झटक्यात वाय-फायशिवाय मेसेज पाठवणारे Apps शोधले, ऑफलाइन ट्रिक्स क्षणात शेअर झाल्या. ज्यांना मैदानात जाता आलं नाही त्यांनी ऑनलाइन जेवण पाठवलं. कोणी Zomato वरून कोणी Swiggy वरून तर कोणी Blinkit वरून. पण ते पाठवणारा कोण? हे कुणालाच माहिती नव्हतं. हाच आंदोलनाचा एक नवा डिजिटल चेहरा आहे.
ही पिढी फक्त व्यवस्थेविरोधात ओरडणारी नाही तर गरज पडल्यास स्वत: व्यवस्था उभी करणारी आहे. कारण त्यांना एका नेत्यावर विश्वास नाही किंवा एका पक्षावर विश्वास नाही. त्यांना विश्वास आहे तो स्वतःवर.
खरं तर प्रत्येक आंदोलनात काही असामाजिक घटक घुसू शकतात. हिंसाचाराचा धोका असतो आणि तो टाळणं हे आंदोलनकर्त्यांसमोरचं मोठं आव्हान असतं. पण या आंदोलनाकडे फक्त गोंधळ घालणारी पोरं असं म्हणून पाहिलं तर आपण देशात घडत असलेला मोठा सामाजिक बदलच समजू शकणार नाही. कारण जंतर-मंतरवर बसलेली ही Gen Z फक्त आंदोलन करत नाहीए. तर ती लिहतीय एका नवा भारताची नवी पटकथा..
ADVERTISEMENT












