Rahul Gandhi Press Conference use of pellet gun against student : विद्यार्थ्यांवर चालवण्यात आलेल्या पॅलेट गनचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारने कोणतीही पॅलेट गन वापरण्यात आली नसल्याचा दावा केला असला तरी, जखमी विद्यार्थ्याला माध्यमांसमोर उभे करून राहुल गांधी यांनी त्याच्या डोळ्याला झालेली दुखापत दाखवत सरकारचा दावा फेटाळला. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पॅलेट गन आणि लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. "हे भारताचे भविष्य आहे आणि अशा हजारो विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्यात आली," असे ते म्हणाले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Jantar Mantar वर CJP चं विद्यार्थी आंदोलन कव्हर करणाऱ्या मंबई Tak प्रतिनिधीसोबत काय घडलं?
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यावर पॅलेट गनचा वापर?
राहुल गांधी यांनी सांगितले की, हे विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विद्यार्थ्यांनी पोलीस भरती परीक्षेसाठी अनेक वर्षे मेहनत घेतली होती. मात्र नंतर त्यांना पेपर फुटल्याची माहिती देण्यात आली. "ज्यांच्याकडे 60 ते 70 लाख रुपये होते त्यांनी पेपर विकत घेतला आणि इतर विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले," असा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या पालकांनी कष्टाने पैसा खर्च करून त्यांना संधी दिली, पण सरकारने त्यांच्या भविष्यावरच आघात केल्याचे राहुल गांधी म्हणाले. सरकारने या प्रकरणात खोटे बोलणे थांबवावे, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा : Jantar Mantar वर CJP चं विद्यार्थी आंदोलन कव्हर करणाऱ्या मंबई Tak प्रतिनिधीसोबत काय घडलं?
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, मोदींनी माफी मागावी
पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या तीन प्रमुख मागण्या मांडल्या. पहिली मागणी म्हणजे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवण्यात यावे, कारण पेपरफुटीच्या घटनांसाठी ते जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरी मागणी म्हणजे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पॅलेट गन आणि लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तिसरी मागणी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी. जखमी विद्यार्थ्याच्या डोळ्याचे नुकसान किती गंभीर आहे हे अद्याप स्पष्ट नसल्याचे सांगत राहुल गांधी यांनी, विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसताना त्यांच्यावर अशी कारवाई झाल्याचा आरोप केला. "विद्यार्थ्यांना मारणे आणि धमकावणे थांबवा, त्यांच्या मागण्या मान्य करा," असे आवाहन त्यांनी केले.
राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की, सरकारच्या मंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत दोन मागण्यांवर तत्त्वतः सहमती झाल्याचे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याबाबत आणि संबंधितांवर कारवाई करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुख्य मागणीवर पुढील दिवशी चर्चा होणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. "विद्यार्थ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि आम्ही त्यांचीच भूमिका पुन्हा मांडत आहोत. धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण व्यवस्थेच्या अपयशाचे प्रतीक आहेत आणि त्यांना हटवलेच पाहिजे," असे राहुल गांधी म्हणाले. पत्रकार परिषदेच्या शेवटी जखमी विद्यार्थी साहिल याने स्वतःची ओळख करून देत, "मी फक्त माझ्यासाठी न्याय मागतो," असे सांगितले.
ADVERTISEMENT












