मुंबई: देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (X) एक भावनिक आणि संवेदना व्यक्त करणारं पत्र पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही राजकीय भूमिकेपासून दूर राहून सचिनने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याची गरज व्यक्त केली आहे. याशिवाय पत्रातून त्याने मेहनत, प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेवर आधारित व्यवस्था उभी करण्याचं आवाहनही केलं आहे.
ADVERTISEMENT
विद्यार्थी आंदोलनावर सचिन तेंडुलकरची पहिली प्रतिक्रिया
सचिनने आपल्या पत्राची सुरुवात आपल्या वडिलांच्या आठवणीने केली आहे.
"माझे वडील प्राध्यापक होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मला लहानपणी एक महत्त्वाचा धडा दिला होता 'अपयश स्वीकारता येते, पण फसवणूक कधीच स्वीकारता येत नाही. शॉर्टकट कधीही निवडू नका."
यानंतर सचिनने समाज म्हणून आपली सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. त्याने म्हटले की,
''ज्या समाजात मेहनतीपेक्षा निकालाला अधिक महत्त्व दिले जाते, तिथे गुणवत्तेपेक्षा शॉर्टकटची संस्कृती वाढते. त्यामुळे मेहनतीला न्याय मिळेल अशी व्यवस्था निर्माण करणे ही समाजाची जबाबदारी आहे.''
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा अप्रत्यक्ष उल्लेख करत सचिन म्हणाला की,
''आज विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळाले नाही, अशी भावना वाटत असेल, तर ती भावना समजून घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे.''
याच पत्रात सचिनने भारतातील तरुणाईबद्दलही आशावाद व्यक्त केला. त्यांच्या मते, भारताची युवा पिढी ही स्वप्ने, ऊर्जा आणि देशाच्या भविष्याची खरी ताकद आहे. पालक, शिक्षक, मित्र, नातेवाईक, शैक्षणिक संस्था आणि प्रशासन या सर्वांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण करण्याची मोठी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
पत्राच्या शेवटी त्याने स्पष्ट संदेश दिला की,
"मेहनतीला सन्मान, प्रामाणिकपणाला प्रोत्साहन आणि गुणवत्तेला न्याय मिळेल अशी संस्कृती आपण सर्वांनी मिळून निर्माण केली पाहिजे."
तसेच देशातील मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या आकांक्षांना बळ देण्यासाठी समाज निश्चितपणे योग्य मार्ग शोधेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सचिन तेंडुलकरच्या या पोस्टकडे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आलेली एक संयमी आणि मूल्याधिष्ठित प्रतिक्रिया म्हणून पाहिले जात आहे. आंदोलनाला थेट समर्थन किंवा विरोध न करता त्याने मेहनत, प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेच्या मूल्यांवर भर देत समाजाने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याचे आवाहन केले आहे.
ADVERTISEMENT












