देवा झाले अवघे जन । दोष गुण हारपले
बरवे झाले बरवे झाले । चित्त धाले महालाभे
ADVERTISEMENT
संत तुकाराम महाराजांच्या या अभंगात एक अत्यंत गूढ पण तितकाच सुंदर विचारए. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर माणसाला कोणाच्याही गुण-दोषांचा भेद उरत नाही. त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसतो.
आता या ओवीचा आणि राजकारणाचा काय संबंध? असं तुम्ही म्हणाल.. पण तशीच अवस्था आता देशातील एका ज्येष्ठ नेत्याची झालीए का? असा प्रश्न अनेकांना सतावू लागलाय. ज्यांनी गेली अनेक दशकं आपल्या राजकारणाचा कुणालाही ठाव लागू दिला नाही त्याच शरद पवारांच्या सध्याच्या काही राजकीय चाली या प्रत्येकाला गुंगावून टाकणारेएत.
पवारांच्या प्रत्येक भेटीमागे प्रश्न असतो. प्रत्येक हालचालीमागे चर्चा असते आणि प्रत्येक शांततेमागे एक मोठं राजकारण दडलेलं असतं, अशी अनेकांची धारणा आहे. आता आठवड्याभरापूर्वीचीच गोष्ट पाहा ना... शरद पवारांनी सगळ्यात आधी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर काल दिल्लीत आंदोलनस्थळी जाऊन CJP च्या अभिजीत दिपकेंना पाठिंबा दिला. तर आज पवार साहेब थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले. आता आठवडाभरातील या तीन घटनांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
या सगळ्या चर्चांमधून प्रश्न एकच विचारला जातोय... तो म्हणजे.. शरद पवारांच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय?
पवारांचा पहिला डाव: पवार स्वत: गेले शिंदेंच्या दालनात!
पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच शरद पवारांनी आपले राजकीय विरोधक असलेल्या एकनाथ शिंदेंच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली.
हे ही वाचा>> 'काँग्रेसविरुध्द लढले ही चूक वाटते... काँग्रेस खरंच चांगली!' अंजली दमानियांची स्फोटक चावडी
राजकारणात भेटी-गाठी काही नवीन नसतात. पण पवारांच्या भेटीचं टायमिंगच प्रचंड परफेक्ट होतं. कारण याच काळात राज्यातील राजकीय समीकरणांबाबत विविध चर्चा सुरू झालेल्या.
त्यामुळे या भेटीचे अनेक अर्थ लावले गेले. काहींनी ती केवळ शिष्टाचार भेट म्हटली. तर काहींनी ती भविष्यातील राजकीय संवादाची सुरुवात असल्याचा अंदाज व्यक्त केला. पण पवारांनी नेहमीप्रमाणे कोणताही मोठा खुलासा केला नाही.
पवारांचा दुसरा डाव : आंदोलनस्थळी जात घेतली अभिजीत दिपकेंची भेट
राजधानी दिल्लीत CJP च्या नेतृत्वात जे आंदोलन झालं त्यामध्ये दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांना अमानुष मारहाण करण्यात आली. ज्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार थेट CJP च्या आंदोलनस्थळी पोहोचले.
हे ही वाचा>> पीएम मोदी अॅक्शन मोडमध्ये, नीट प्रकरणातील आरोपींविरोधात मोठी घोषणा
तेथे त्यांनी अभिजीत दिपकेंची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. हा क्षण महत्त्वाचा ठरला, कारण सरकारविरोधी आंदोलनात उपस्थिती लावत पवारांनी पुन्हा एकदा सगळ्यांनाच वेगळा संदेश दिला. म्हणजे, एका बाजूला सत्ताधाऱ्यांशी संवाद तर दुसऱ्या बाजूला आंदोलनकर्त्यांच्या बाजूने उभं राहणं. ही शैली शरद पवारांच्या राजकारणात काही नवीन नाही.
पवारांचा तिसरा डाव : दुसऱ्याच दिवशी घेतली PM मोदींची भेट
जंतरमंतरवर जाऊन 24 तासही उलटले नाहीत तोच शरद पवारांनी आज सकाळी त्यांचा तिसरा डाव टाकला. एक पत्र सोबत पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. बस्स, इतकंच पुरेसं होतं. राजकीय चर्चांचा स्फोट व्हायला. कारण एका बाजूला आंदोलन, दुसऱ्या बाजूला शिंदे आणि तिसऱ्या बाजूला मोदी. एका आठवड्यात पवारांकडून तीन वेगवेगळे संदेश. आणि म्हणूनच महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रश्न विचारला जातोय की पवार नेमका कोणता डाव खेळतायत?
पवारांचं राजकारण का मानलं जातं वेगळं?
शरद पवारांविषयी एक गोष्ट कायम सांगितली जाते की, ते कधीही सर्व पत्ते एकाच वेळी उघड करत नाहीत. त्यांची शैली म्हणजे सर्वांशी संवाद, कोणाशीही कायमचा दुरावा नाही आणि कोणत्याही दाराला पूर्णपणे कुलूप नाही. म्हणूनच ते विरोधकांनाही भेटतात, मित्रांनाही भेटतात आणि आवश्यकता वाटल्यास आंदोलनकर्त्यांनाही भेटतात. यातून प्रत्येकाला वेगळा संदेश जातो.
तेल लावलेला पैलवान
पवारांच्या याच शैलीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक वाक्य अनेकदा ऐकायला मिळतं. ते म्हणजे "तेल लावलेला पैलवान."
याचा अर्थ ज्याला कोंडीत पकडणं कठीण, ज्याचा अंदाज बांधणं अशक्य आणि जो प्रत्येक वेळी वेगळ्या डावाने समोरच्याला आश्चर्यचकित करतो असा. यामुळेच पवारांच्या राजकीय हालचाली या अनेकदा चर्चेचा विषय ठरतात.
आजच्या घडीला शरद पवारांच्या या सलग भेटींमागे नेमकं कोणतं राजकीय गणित आहे, याबाबत अधिकृतपणे कोणतीही स्पष्ट घोषणा झालेली नाही. म्हणून कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही.
मात्र, इतकं नक्की की, शरद पवार हे सातत्याने राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. त्यांच्या प्रत्येक राजकीय चालींवर मित्रांचंही लक्ष असतं, विरोधकांचंही आणि सामान्य जनतेचंही. कारण शरद पवारांच्या राजकारणात अनेकदा चाल आधी दिसते. पण तिचा खरा अर्थ काही काळानंतरच समोर येतो.
ADVERTISEMENT












