नवी दिल्ली: दिल्लीसह देशातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी (22 जुलै) घेतलेल्या पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आपल्याला खेचून नेले, मात्र त्याचवेळी काही पोलिसांनी कानात "हे सरकार हटवा" असे सांगितल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.
ADVERTISEMENT
त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा आणि संपूर्ण विरोधी पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर करत आंदोलनाच्या मागण्यांवर कोणतीही तडजोड होणार नसल्याचे स्पष्ट केले.
'पोलिसांनी कानात काय सांगितलं?'
राहुल गांधी म्हणाले की, हे खरं आहे की, आधी पोलिसवाले मला खेचून घेऊन गेले. पण माझ्या कानात ते हेच म्हणत होते की, हे सरकार हटवा. खरंच.. मी राजस्थानचा आहे.. यांना हटवा. आम्ही फक्त वर्दी घातली आहे... दुसरा म्हणतोय.. मी हरियाणाचा आहे यांना हटवा.. तर पोलिसांच्या देखील अशाच भावना आहेत. सत्य काय आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. त्या बिचाऱ्यांना ऑर्डर ऐकाव्या लागतात. जे ते करत आहेत. पण खरं तर जे घडतंय त्या सगळ्याबाबत पोलीस देखील खुश नाहीत. म्हणजे जे संवेदनशील पोलीस आहेत ते. ही पहिली गोष्ट आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा
पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, दिल्ली असो किंवा देशातील कोणतेही राज्य, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांचा संपूर्ण पाठिंबा राहील.
हे ही वाचा>> धर्मेंद्र प्रधान अपयशी शिक्षणमंत्री, राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?
त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही आणि त्यांच्या मागण्यांसाठी विरोधी पक्ष एकत्रितपणे लढणार आहे.
विद्यार्थ्यांच्या तीन प्रमुख मागण्या
राहुल गांधी यांनी आंदोलनकर्त्यांच्या तीन प्रमुख मागण्या मांडल्या.
- केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.
- विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची सार्वजनिक माफी मागावी.
या तीन मागण्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही'
राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की, आंदोलनासंदर्भातील पुढील रणनीती आणि निर्णय हे सर्व विरोधी पक्ष एकत्र बसून घेतील. "हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. सर्व विरोधी पक्ष मिळून पुढील भूमिका निश्चित करतील," असे ते म्हणाले.
हे ही वाचा>> CJP आंदोलन : 'आमच्याकडे वेळ नाही...' तातडीच्या सुनावणीला सरन्यायाधीश सूर्यंकांत यांचा नकार
राजकीय वातावरण तापण्याची शक्यता
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर विद्यार्थी आंदोलनाला अधिक राजकीय स्वरूप मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांबाबत केलेला दावा, सरकारवर केलेले आरोप आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांना दिलेला उघड पाठिंबा यामुळे केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या पोलिसांबाबतच्या दाव्यांवर अधिकृत पुष्टी किंवा संबंधित यंत्रणांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या दाव्यांची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही.
ADVERTISEMENT












