बीड जिल्ह्यात राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातील परळी आणि अंबाजोगाई तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी पाहणी केली. अंबाजोगाई तालुक्यातील राडी परिसरात तसेच परळी तालुक्यातील वाघबेट परिसरात त्यांनी शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. सोयाबीनसह विविध पिकांचे झालेले नुकसान पाहून त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला. यावेळी स्थानिक शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये नुकताच दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : अपक्ष आमदार सत्यजीत तांबेंच्या वाढदिवशी फडणवीसांची पोस्ट; राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण
पीएम किसान योजनेतील मदतीबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम एकरकमी मिळावी, अशी मागणी मुंडे यांच्याकडे केली. गेल्या वर्षीची पीक विम्याची रक्कमही काही शेतकऱ्यांची बाकी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावर पीक विम्याची रक्कम एकरकमी मिळावी, यासाठी आपला प्रयत्न असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. पीक विम्याची रक्कम आणि एनडीआरएफच्या निकषांनुसार मिळणारी मदत मिळण्यासाठी पंचनाम्याची प्रक्रिया आणि त्यानंतरचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे त्याआधी तात्काळ काही मदत करता येते का, याबाबत आपण मुख्यमंत्री यांच्याकडे विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पीएम किसान योजनेतील मदतीबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
पाण्याचा प्रश्न शहरांमध्येही निर्माण होऊ शकतो
यंदा खरीपाचे पीक पूर्णपणे गेले असून पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याचे मुंडे यांनी सांगितले. एक ते सव्वा महिन्यात जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. पाण्याचा प्रश्न केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित राहणार नसून शहरांमध्येही निर्माण होऊ शकतो. खरीपाचे पीक गेल्यानंतर रब्बीच्या पिकाचा विषय पुढे येईल, मात्र सध्या पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चारा या प्रश्नांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकावर अनेक गोष्टींचे नियोजन केले होते. एका शेतकऱ्याने सोयाबीनच्या उत्पन्नातून मुलीचे लग्न करण्याचे ठरवले होते, मात्र दुष्काळामुळे सोयाबीनचे पीक जळून गेले असल्याचे मुंडे यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि मदतीबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ता पक्षाचा आमदार असलो तरी शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी यासाठी सरकारच्या मागे लागून पाठपुरावा करणार असल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असून सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ADVERTISEMENT












