Gokul Election : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले असून, काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील एकाकी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला बळ मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे नुकतीच पार पडलेली महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक होय. राज्याचे तीन मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला खासदार धनंजय महाडीक, आमदार अमल महाडीक, विनय कोरे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह जनसुराज्य आणि इतर मित्रपक्षांचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत सर्व नेत्यांनी एकत्र येत 'छत्रपती शेतकरी विकास आघाडी' या नव्या पॅनेलची स्थापना केली असून, कोणत्याही परिस्थितीत गोकुळची सत्ता काबीज करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
90 टक्के मतदार महायुतीच्या पाठीशी
या बैठकीत महायुतीच्या नेत्यांनी केवळ एकजूटच दाखवली नाही, तर निवडणुकीच्या सूक्ष्म नियोजनावरही सविस्तर चर्चा केली. गोकुळच्या संचालक मंडळाची सदस्य संख्या आता 21 वरून 25 झाली असल्याने, वाढलेल्या या चार जागांच्या वाटपाबाबत आणि शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या ठरावांच्या संख्याबळाची चाचपणी करण्यात आली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोकुळसाठी लागणाऱ्या एकूण मतांपैकी 90 टक्के मते महायुतीच्या पाठीशी असल्याचा दावा करत सतेज पाटील यांच्या गटाकडे केवळ 10 टक्के मते उरल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे, मंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटलांना टोला लगावताना, महायुतीकडे मोठे संख्याबळ असल्याने त्यांनी विनाकारण निवडणूक लढवून ताकद वाया घालवण्यापेक्षा शांत बसावे, असा उपहासात्मक सल्ला दिला आहे.
हे ही वाचा : मुश्रीफांची टीका जिव्हारी, सतेज पाटलांनी थेट दिलं ओपन चॅलेंज
सतेज पाटील एकाकी?
महायुतीचे सर्व सत्ताधारी नेते, मंत्री आणि आमदार एकत्र आले असताना, सतेज पाटील मात्र या निवडणुकीला स्वबळावर आणि एकाकी सामोरे जात असल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागांत, विशेषतः चंदगड आणि हातकणंगले तालुक्यांत जोरदार दौरे सुरू केले आहेत. सतेज पाटील गावोगावी जाऊन गोकुळ दूध संघाचे मतदार, ठरावधारक आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. स्वतःचे संख्याबळ जुळवण्यासोबतच, महायुतीमधील नाराज नेत्यांना आणि गटांना हेरून त्यांना आपल्याकडे वळवण्याचा रणनीतिक प्रयत्नही ते करत आहेत. हसन मुश्रीफ आणि महाडीक गटाने मोट बांधली असली तरी, त्यांना थेट आव्हान देत सतेज पाटलांनी आपला स्वतंत्र प्रचार आक्रमकपणे सुरू ठेवला आहे.
हे ही वाचा : चक्रीवादळ तयार होणार की नाही? पाऊस कुठले भाग झोडपणार?
एकाकी झुंज यशस्वी होणार का?
गेल्या गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ एकत्र होते, मात्र आता राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातून महाविकास आघाडीचा खासदार निवडून आणण्यात सतेज पाटलांना यश आले, मात्र विधानसभेतील पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ येऊ नये यासाठी त्यांनी गोकुळची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. राज्यात ज्याची सत्ता असते, गोकुळमध्येही साधारणतः त्यांचीच सत्ता येते, असे आजवरचे राजकीय समीकरण राहिले आहे. त्यामुळे आता तिन्ही मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे विजयाचे दावे खरे ठरणार, की सतेज पाटलांची एकाकी झुंज आणि तळागाळातील संपर्क गोकुळच्या आखाड्यात बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT












