ओमराजेंविरोधात लोकसभा लढणार? धाराशिवमध्ये दानवेंचा इंटरेस्ट का वाढला?

मुंबई तक

28 Sep 2026 (अपडेटेड: 28 Sep 2026, 08:46 AM)

dharashiv politics : धाराशिवच्या राजकारणात अंबादास दानवेंचा सक्रिय सहभाग वाढला असून ओमराजे निंबाळकर यांच्यावर ते सातत्याने टीका करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यास लोकसभा निवडणूक लढवू शकतो, या दानवेंच्या वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

dharashiv politics

dharashiv politics

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

ओमराजेंविरोधात लोकसभा लढणार?

point

धाराशिवमध्ये दानवेंचा इंटरेस्ट का वाढला ?

Dharashiv politics : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे गेल्या काही दिवसांपासून धाराशिवच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दानवेंनी धाराशिवमध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील, शिवसेना आमदार तानाजी सावंत आणि ओमराजे निंबाळकर यांच्यावर दानवे सातत्याने टीका करत आहेत. आमदार आदित्य ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्यावेळी पत्रकारांनी दानवेंना ओमराजेंविरोधात आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सांगितले तर आपण निवडणूक लढू शकतो, असे उत्तर दानवेंनी दिले. त्यामुळे धाराशिवच्या राजकारणात अंबादास दानवेंचा रस अचानक का वाढला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : मुंबई : सार्वजनिक शौचालयात घडलं भयंकर, दोन तरुणांचा मृत्यू, 'तो' वायू नेमका आला कुठून?

ओमराजेंनी पक्ष सोडल्यानंतर पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न 

अंबादास दानवे हे ठाकरे गटाच्या मराठवाडा विभागाची जबाबदारी सांभाळत असल्याचे या चर्चेत सांगितले जात आहे. ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेतृत्व कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी दानवेंकडून लक्ष दिले जात असल्याची चर्चा आहे. ओमराजेंच्या प्रवेशानंतर विरोधी गटामध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न दानवे करत असल्याचेही सांगितले जात आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे तीन आमदार आहेत. कैलास पाटील यांच्यासह उमरगा आणि बार्शीचे आमदार मशाल चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे पारंपरिक शिवसेना मतदारांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी दानवेंची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, अशी चर्चा आहे.

हेही वाचा : मद्यधुंद लेकाचा दारूवरून वाद, सपासप वार करून सावत्र वडिलांना संपवलं

ओमराजेंच्या बाजूने राहिलेला मतदार ठाकरे गटाशी जोडून ठेवण्याची रणनीती

धाराशिव लोकसभा मतदारसंघात ओमराजेंची जागा भरून काढण्यासाठी दानवेंना पुढे केले जात आहे का, हा देखील चर्चेचा विषय आहे. गेल्या काही महिन्यांपासून दानवे धाराशिवमधील स्थानिक प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जिल्ह्यातील राजकारणावर उघडपणे भूमिका घेत आहेत. ओमराजे, राणा जगजितसिंह पाटील आणि तानाजी सावंत यांच्यावर ते प्रखर टीका करत आहेत. त्यामुळे विरोधी चेहरा म्हणून दानवेंना पुढे आणण्याचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धाराशिवच्या राजकारणात निंबाळकर आणि पाटील या दोन कुटुंबांमधील राजकीय संघर्षाचा उल्लेखही या चर्चेत केला जात आहे. पाटील कुटुंबीयांच्या विरोधात मतदान करणारा आणि ओमराजेंच्या बाजूने राहिलेला मतदार ठाकरे गटाशी जोडून ठेवण्याची रणनीती दानवेंच्या माध्यमातून आखली जात आहे का, याबाबतही चर्चा सुरू आहे.

धाराशिवमध्ये ठाकरे गटाकडे लोकसभा निवडणुकीसाठी प्रभावी उमेदवार कोण, हा प्रश्नही या निमित्ताने पुढे आला आहे. अंबादास दानवे स्वतः लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असल्याचे सांगत आहेत. मात्र अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. त्यामुळे दानवेंना ओमराजे निंबाळकरांविरोधात मैदानात उतरवले जाणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. धाराशिवमध्ये तीन आमदारांना सोबत घेऊन दानवे राणा पाटील, तानाजी सावंत आणि ओमराजे यांच्याविरोधात आपली भूमिका मांडत आहेत. या माध्यमातून धाराशिवमध्ये स्वतःचे राजकीय स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणुकीला अद्याप वेळ असल्याने पुढील काळात या राजकीय समीकरणांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे दानवेंना ओमराजेंविरोधात मैदानात उतरवणार का, की अन्य उमेदवाराचा विचार करणार, याकडे लक्ष लागले आहे.