CJP Jantar Mantar Protest : दिल्लीतील आंदोलनादरम्यान महाराष्ट्रातील अहिल्यानगरचा एक तरुण आपल्या इंग्रजी भाषणामुळे चर्चेत आला. स्वतः तीन वर्षे यूकेमध्ये मास्टर्स शिक्षण घेतल्याचा आणि स्कॉटिश सरकारमध्ये काम केल्याचा दावा करणाऱ्या या तरुणाने आंदोलनस्थळी केंद्र सरकार, शिक्षण व्यवस्था आणि आंदोलनावर झालेल्या कथित कारवाईवर तीव्र शब्दांत टीका केली. "मी यूकेमध्ये होतो, पण देशाची परिस्थिती पाहून परत आलो. इथं जे दिसत आहे त्याविरोधात आवाज उठवणं गरजेचं वाटलं," असं तो म्हणाला. त्याने सांगितलं की, तो अहिल्यानगरहून तीन दिवसांपासून दिल्लीत आंदोलनात सहभागी असून, आंदोलकांना पाणी, स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याचा आरोप त्याने केला. आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असताना विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा दावा करत त्याने याबद्दल संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Personal Finance: वयाच्या 30, 40 आणि 50 व्या वर्षी बँकेत किती असावी बचत?
अल्पवयीन मुलींवरही बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप
या तरुणाने आंदोलनादरम्यान सिव्हिल ड्रेसमधील काही लोकांकडून आंदोलकांवर मारहाण झाल्याचा आरोप केला. हे लोक पोलीस नसल्याचा दावा करत त्यांनी आंदोलकांवर हल्ला केल्याचं तो म्हणाला. अल्पवयीन मुलींवरही कथितपणे बळाचा वापर करण्यात आल्याचा उल्लेख करत, अशा प्रकरणांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्याने केली. लोकशाहीमध्ये शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार नागरिकांना आहे, मग आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज का करण्यात आला, असा सवालही त्याने उपस्थित केला. आंदोलन करणारे विद्यार्थी कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून आपल्या हक्कांसाठी लढत असल्याचं त्याने सांगितलं.
हेही वाचा : दिल्ली: जंतर मंतरजवळ रात्री अचानक दगडफेक, पोलीस आणि आंदोलक पुन्हा आमनेसामने
आपल्या भाषणात त्याने इंग्रजीतूनही भूमिका मांडली. यूकेमधील प्रशासनाचा संदर्भ देत, तिथे छोट्याशा आर्थिक गैरप्रकारावरही जबाबदारी निश्चित करून राजीनामे घेतले जातात, असा दावा त्याने केला. भारतात मात्र विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनांनंतरही नैतिक जबाबदारी स्वीकारली जात नसल्याचा आरोप त्याने केला. शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत त्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला. "This is not democracy", "Before becoming a good leader, become a good human being" अशा इंग्रजी वाक्यांतून त्याने आपली भूमिका स्पष्ट केली. स्वतः पॉलिसी रिसर्चर असल्याचं सांगत, गरज पडल्यास आंदोलनाला बौद्धिक मदत करण्याची तयारीही त्याने व्यक्त केली.
"ही देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे"
यावेळी महाराष्ट्रातील सर्व खासदार आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असं आवाहनही त्याने केलं. "ही देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे," असं म्हणत अधिकाधिक युवकांनी आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन त्याने केलं. आंदोलनातील नेतृत्व बदललं तरी आंदोलन थांबणार नसल्याचा विश्वास व्यक्त करत, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असं त्याने स्पष्ट केलं. आपण घरी परतण्याचा विचार केला होता, मात्र आंदोलनावर झालेल्या कथित लाठीचार्जनंतर आता न्याय मिळेपर्यंत दिल्लीतच ठामपणे उभे राहणार असल्याचाही निर्धार त्याने व्यक्त केला.
ADVERTISEMENT












