Raj Thackeray : नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले असून अनेक राजकीय पक्षांनी आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी सरकारच्या धोरणांवर आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. तसेच भव्य मोर्चाची घोषणाही केली.
ADVERTISEMENT
26 जुलैला भव्य मोर्चा
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत येत्या 26 जुलै रोजी रविवारी मुंबईत भव्य मोर्चा काढणार असल्याची मोठी घोषणा केली. हा मोर्चा शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत काढण्यात येणार असून या माध्यमातून मोठे शक्तीप्रदर्शन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात तरुण मुले आणि त्यांचे पालक एकत्र येऊन स्वतःचा राग व्यक्त करत आहेत, याची जाणीव केंद्र सरकारला झाली पाहिजे यासाठीच या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच या मोर्चाच्या सांगतेवेळी सरकारला सुबुद्धी मिळावी, यासाठी सिद्धिविनायकाला साकडं घातले जाईल, असेही राज ठाकरे यांनी आवर्जून सांगितले.
हे ही वाचा : 'काँग्रेसविरुध्द लढले ही चूक वाटते... काँग्रेस खरंच चांगली!' अंजली दमानियांची स्फोटक चावडी
'गेल्या काही वर्षांपासूनचा राग'
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सरकारसह न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवर टीका केली. देशातील तरुणांच्या मनात गेल्या काही वर्षांपासून साचलेला राग आता उफाळून वर आला असून हे सरकार निर्दयीपणे वागत आहे, असा आरोप त्यांनी केला. न्यायालयाच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त करताना ते म्हणाले की, न्यायमूर्तींना विद्यार्थ्यांच्या या संवेदनशील प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे देशाचे दुर्दैव आहे. न्यायालयाला कबुतरं आणि कुत्र्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला वेळ आहे, परंतु 'कॉक्रोच'च्या समस्यांकडे पाहायला वेळ नाही. सध्या न्यायालयाची परिस्थिती धृतराष्ट्रासारखी झाली आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा : पीएम मोदी अॅक्शन मोडमध्ये, नीट प्रकरणातील आरोपींविरोधात मोठी घोषणा
'सरकार नकोसे झाले आहे'
उद्धव ठाकरे यांनी पुढे नमूद केले की, आज देशातील कोणतेही क्षेत्र किंवा घटक या सरकारला आपले मानत नाही. 'अच्छे दिन'च्या आशेने याच विद्यार्थ्यांनी एकेकाळी या सरकारला निवडून दिले होते, परंतु आज त्यांना हे सरकार पूर्णपणे नकोसे झाले आहे. त्यामुळे आता हा प्रश्न केवळ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. जंतर-मंतरवरील घटनेनंतर आता ठाकरे बंधूंच्या या संयुक्त महामोर्चाच्या घोषणेने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
ADVERTISEMENT












