anjali damania on congress : मुंबई तकच्या 'चावडी' कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नीट आंदोलन, आंदोलनातील राजकीय पक्षांचा सहभाग आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांनी काँग्रेसबाबत केलेलं वक्तव्य विशेष चर्चेचा विषय ठरलं. दमानिया म्हणाल्या की, या आंदोलनात विरोधी पक्षांनी उशिरा सहभाग घेतला. त्यांनी पहिल्या दिवसापासून आंदोलनाच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं. आंदोलनात राजकीय पक्ष सहभागी होण्यात काहीच गैर नसल्याचं सांगताना त्यांनी आंदोलनात पक्षांचे झेंडे आणि राजकारण बाजूला ठेवून देशासाठी नागरिक म्हणून सहभागी व्हावं, अशी अपेक्षा व्यक्त केली. संसदेत प्रश्न मांडण्याची जबाबदारी विरोधी पक्षांची असल्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पुणे हादरले, 23 वर्षांपूर्वीच्या वडिलांच्या खुनाचा घेतला सूड; 28 वार करून हत्या, धक्कादायक उलगडा
"आपण काँग्रेसविरुद्ध लढलो, ती चूक तर नव्हती ना?"
राहुल गांधींच्या प्रतिमेचा उल्लेख करताना दमानिया म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांत त्यांच्या प्रतिमेत सकारात्मक बदल झाला आहे. विविध उपक्रमांमुळे त्यांची सार्वजनिक प्रतिमा अधिक चांगली झाली होती. मात्र, नीट आंदोलनात त्यांनी सुरुवातीपासून उपस्थित राहायला हवं होतं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्याच वेळी त्यांनी काँग्रेसबाबत मोठं विधान करत, "ज्यांनी काँग्रेसविरुद्ध आंदोलन केलं, त्यांच्यापैकी मलाही आता असं वाटायला लागलं आहे की आपण काँग्रेसविरुद्ध लढलो, ती चूक तर नव्हती ना? काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेते शिक्षित होते आणि त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळत होतं," असं म्हटलं. भाजपच्या सध्याच्या नेतृत्वाशी तुलना करताना त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वात बौद्धिक पातळी अधिक चांगली असल्याचं मत व्यक्त केलं.
हेही वाचा : 'आईजवळ का झोपतोस..' लिव्ह-इन पार्टनरच्या चिमुरड्या मुलाची हत्या, 25 वर्षीय तरुण ताब्यात
आंदोलनकर्त्यांना देशद्रोही किंवा परदेशी निधीवर चालणारे ठरवण्याचा प्रयत्न
सरकारच्या आंदोलनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावरही दमानिया यांनी टीका केली. पूर्वी आंदोलनांदरम्यान सरकार चर्चा करण्यासाठी तयार असायचं, समित्या स्थापन केल्या जायच्या आणि आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला जायचा, असं त्यांनी सांगितलं. मात्र, सध्याच्या परिस्थितीत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याची तयारी दिसत नसल्याचं त्यांनी म्हटलं. आंदोलनकर्त्यांना देशद्रोही किंवा परदेशी निधीवर चालणारे ठरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. आंदोलनाला देशभरातून सामान्य नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याचा उल्लेख करत त्यांनी अनेकांनी स्वखर्चाने अन्न आणि पाण्याची व्यवस्था केल्याचं सांगितलं. आंदोलनाला मिळणारा वाढता पाठिंबा पाहता सरकारने या प्रश्नावर संवाद साधण्याची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराच्या घटनांबाबत बोलताना दमानिया भावूक झाल्या. महिलांवर आणि तरुणांवर झालेल्या कारवाईचे व्हिडिओ पाहून संताप आणि वेदना झाल्याचं त्यांनी सांगितलं. न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यायला हवी होती, असं मत व्यक्त करत त्यांनी लोकशाहीमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांशी सरकारने संवाद साधणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. सरकार कोणतंही असो, प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि आंदोलनाची दखल घेणं हीच खरी लोकशाही असल्याचं त्या म्हणाल्या. तसेच आंदोलन दीर्घकाळ सुरू राहू नये, सरकारने तातडीने चर्चा करून तोडगा काढावा आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT












