‘Friends हा काही मामूली विषय नाही..’, PM मोदींनी रात्री उशिरा शेअर केला VIDEO; पण…

मुंबई तक

• 01:19 AM • 24 Jul 2026

PM Modi Video on Neet Paper leak: NEET पेपर लीक प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच व्हिडिओ संदेशाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. दोषींना तुरुंगात टाकल्याचा दावा करत त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षेचा कायदा आणि संसदेत नवीन विधेयक आणण्याची माहिती दिली.

pm modi first reaction on neet paper leak comes via late night video skips remarks on hrd minister dharmendra pradhans resignation

PM मोदी

Google CTA

नवी दिल्लीः देशभरात गाजलेल्या NEET पेपर लीक प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच अधिकृतपणे प्रतिक्रिया दिली आहे. गुरुवारी (23 जुलै) रात्री उशिरा व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत सरकारने दोषींविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नवीन कायदेशीर चौकट तयार केली जात असल्याचीही माहिती त्यांनी दिली. मात्र यावेळी मोदींनी जंतरमंतरवरील आंदोलन किंवा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार का याविषयी कोणतंही भाष्य केलं नाही.

हे वाचलं का?

‘पेपर लीक करणाऱ्यांना पकडून तुरुंगात टाकले’

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात सांगितले की, पेपर लीक प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली असून अनेक आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

22 लाख विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ दिले नाही

मोदी यांनी सांगितले की, सरकारचे सर्वात मोठे प्राधान्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवणे हे होते. त्यामुळे जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांसाठी NEET परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात आली आणि नियोजित प्रक्रियेनुसार 19 तारखेला निकालही जाहीर करण्यात आला, असे त्यांनी नमूद केले.

फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तयारी

पंतप्रधानांच्या निर्देशानंतर संबंधित मंत्रालये आणि विभागांनी पेपर लीकसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेला कायद्याचा मसुदा तयार केला आहे. या प्रकरणांमध्ये जलद सुनावणी आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी, हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय

या कायद्याच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी उद्या होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव पुढील टप्प्यात संसदेत सादर केला जाईल.

संसदेत विधेयक आणण्याची तयारी

संसदेच्या चालू अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातच हे विधेयक शक्य तितक्या लवकर मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. पेपर लीकसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी कठोर कायदेशीर यंत्रणा उभी करण्यावर सरकारचा भर असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

मोदींच्या वक्तव्यातील महत्त्वाचे मुद्दे

* NEET पेपर लीक प्रकरणावर पंतप्रधान मोदींची पहिली अधिकृत प्रतिक्रिया.
* पेपर लीकमधील आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवल्याचा दावा.
* सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवण्यासाठी NEET परीक्षा आयोजित केल्याचे स्पष्टीकरण.
* 19 तारखेला निकाल जाहीर केल्याची माहिती.
* फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेसाठी नवीन कायद्याचा मसुदा तयार.
* केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मसुद्याला अंतिम मंजुरी अपेक्षित.
* संसदेच्या दुसऱ्या आठवड्यात विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न.

राजकीय आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची प्रतिक्रिया

NEET पेपर लीक प्रकरणामुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. लाखो विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. अशा पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच सार्वजनिकरित्या भूमिका मांडत सरकार विद्यार्थ्यांच्या हितासाठी कठोर पावले उचलत असल्याचा संदेश दिला आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आणि त्यानंतर संसदेत मांडले जाणारे विधेयक याकडे देशभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.