riya ahir police van video protest : शिवाजी पार्क येथे बुधवारी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वाहनासमोर उभे राहून आंदोलकांना सोडण्याची मागणी करणारी 27 वर्षीय रिया अहिर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेल्या रियाने पोलिसांची गाडी अडवून आंदोलकांना सोडण्याचा आग्रह धरला. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तिच्या धाडसाचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. आंदोलनाला जाण्यापूर्वीच तिने एक व्हिडिओ शेअर करून नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मात्र, आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर घडलेली घटना तिच्यासाठीही अनपेक्षित ठरली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Sonam Wangchuk यांनी उपोषण सोडलं पण अभिजीत दिपकेंचा प्रचंड मोठा निर्णय, सगळं राजकारणच पलटलं!
पोलिसांच्या गाडीसमोर उभी ठाकली ती मुलगी आहे तरी कोण?
रिया अहिर ही 27 वर्षीय मॉडेल, कलाकार, होस्ट आणि उद्योजिका आहे. तिचा 'रियासत' नावाचा लक्झरी ब्रँड असून सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. शिवाजी पार्ककडे जात असताना दादरमधील कोहिनूर स्क्वेअर परिसरात तिला आंदोलकांनी भरलेली पोलिसांची व्हॅन दिसली. तिच्या म्हणण्यानुसार, वाहन पूर्णपणे भरलेले होते आणि त्यामध्ये उभे राहण्यासही जागा नव्हती. ही परिस्थिती पाहून ती अस्वस्थ झाली. पोलिस आंदोलकांना विनाकारण घेऊन जात असल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली आणि त्यानंतर तिने थेट पोलिसांच्या वाहनासमोर उभे राहण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा : मोठी बातमीः PM मोदींच्या मध्यरात्रीच्या VIDEO नंतर काही मिनिटांतच सोनम वांगचूक यांनी सोडलं आमरण उपोषण
"जर त्यांना सोडणारच असाल तर आत्ताच सोडा"
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत रियाने सांगितले की, आंदोलकांच्या घोषणांनी तिचे लक्ष वेधून घेतले आणि आपण आंदोलनासाठी आलो आहोत तर त्याची सुरुवात इथूनच व्हायला हवी, असे तिला वाटले. पोलिसांनी आंदोलकांना काही अंतरावर जाऊन सोडून दिले जाईल, असे सांगितले. मात्र, हे स्पष्टीकरण तिला मान्य झाले नाही. "जर त्यांना सोडणारच असाल तर आत्ताच सोडा," अशी भूमिका तिने घेतली. पोलिसांशी बोलताना ती बाहेरून शांत दिसत असली तरी आतून प्रचंड घाबरलेली होती, असेही तिने सांगितले. तरीही आपण जे करत आहोत ते योग्य आहे, याची खात्री असल्याने ती वाहनासमोरून हटली नाही.
रिया अहीरच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला पोलिसांनी वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती जागेवर ठाम उभी राहिली. अखेर आंदोलकांना सोडून देण्यात आल्यानंतरच ती वाहनासमोरून बाजूला झाली. वाहनातून बाहेर पडलेल्या आंदोलकांनी तिचे आभार मानल्याचेही तिने सांगितले. जर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले असते तर त्यांच्यावर एफआयआर दाखल झाले असते, अशी भीती तिला वाटत होती. त्यामुळे एक नागरिक म्हणून हस्तक्षेप करणे आवश्यक असल्याची भावना तिच्या मनात होती. जर आपण काहीच केले नसते तर आपण अपयशी ठरलो असतो आणि तिथे उपस्थित राहण्याचा उद्देशच व्यर्थ ठरला असता, असेही रियाने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले.
ADVERTISEMENT












