नवी दिल्लीः NEET पेपर लीक प्रकरणावर देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला मोठं वळण मिळालं आहे. तब्बल 26 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी अखेर उपोषण मागे घेतलं. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशाला उद्देशून व्हिडिओ संदेश जारी करत NEET पेपर लीक प्रकरणावर प्रथमच सार्वजनिक भूमिका मांडली. मात्र, या घडामोडींनंतरही आंदोलन पूर्णपणे थांबणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
ADVERTISEMENT
अभिजीत दिपके यांची ठाम भूमिका
Cockroach Janta Party (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केलं की, सोनम वांगचूक यांनी उपोषण संपवलं असलं तरी जंतर-मंतरवरील शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “सोनम सरांनी 26 दिवसांचं उपोषण संपवल्याबद्दल आम्हाला दिलासा वाटतो. त्यांच्या असामान्य धैर्याबद्दल आणि त्यागाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी संपूर्ण देशाचं लक्ष या प्रश्नाकडे वेधलं. त्यांचं आयुष्य देशासाठी अत्यंत मौल्यवान आहे.”
याचबरोबर त्यांनी स्पष्ट केलं की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य होईपर्यंत Cockroach Janta Party चे जंतर-मंतरवरील आंदोलन सुरूच राहणार आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम
अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर राजकीय आणि नैतिक जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. NEET पेपर लीक प्रकरणात जबाबदारी स्वीकारून त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी भूमिका CJP ने कायम ठेवली आहे.
यामुळे सोनम वांगचूक यांच्या उपोषणाची सांगता झाली असली तरी आंदोलनाचा पुढील टप्पा आता जंतर-मंतरवर सुरू राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
पुढे काय?
पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, सोनम वांगचूक यांचं उपोषण मागे घेणं आणि त्यानंतरही CJP कडून आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा या घडामोडींमुळे NEET पेपर लीक प्रकरण पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. आता केंद्र सरकार या आंदोलनावर आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कोणती भूमिका घेते, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT












