नवी दिल्ली: देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाची धग आता सरकारला जाणवू लागली आहे. त्यामुळे देशातील तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचे महत्त्व सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना इंस्टाग्रामसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अधिक सक्रिय राहण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
सूत्रांच्या माहितीनुसार, कॅबिनेट बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित मंत्र्यांना थेट प्रश्न विचारला की, "तुमच्यापैकी किती जण प्रत्यक्षात इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत?"
यानंतर त्यांनी या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग सक्रिय असल्याचे सांगत, सरकार आणि जनतेमधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याची गरज अधोरेखित केली.
'फक्त पोस्ट करून थांबू नका, संवादही साधा'
पंतप्रधान मोदी यांनी मंत्र्यांना केवळ सरकारी योजना, निर्णय किंवा कार्यक्रमांची माहिती पोस्ट करण्यापुरते मर्यादित न राहण्याचा सल्ला दिला. त्याऐवजी तरुणांशी सातत्याने संवाद साधणारा, प्रश्नोत्तरांना वाव देणारा आणि लोकांचा सहभाग वाढवणारा कंटेंट तयार करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा>> धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत सर्वात मोठी अपडेट, पाहा सरकारने CJP ला नेमकं सांगितलं तरी काय
यासाठी प्रत्येक मंत्र्याने इंस्टाग्रामवर अधिक इंटरॅक्टिव्ह उपस्थिती ठेवावी, असेही त्यांनी सांगितल्याचे समजते.
Reels तयार करण्यावर भर
बैठकीत पंतप्रधानांनी विशेषतः Instagram Reels या फॉरमॅटचा उल्लेख केला. बदलत्या डिजिटल युगात छोट्या व्हिडिओंचा प्रभाव अधिक असल्याने प्रत्येक मंत्र्याने Reels तयार करून सरकारी कामकाज, योजनांची माहिती आणि जनतेशी संवाद साधावा, असा सल्ला त्यांनी दिला.
'युवा इंस्टाग्रामवर आहेत'
सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत स्पष्ट शब्दांत सांगितले की,
"आजचा युवा इंस्टाग्रामवर आहे. हा नागरिकांचा असा मोठा वर्ग आहे, ज्यांच्याशी आपण सर्वांनी सातत्याने जोडलेले राहण्याची गरज आहे."
यातून सरकारच्या डिजिटल कम्युनिकेशनमध्ये अधिक आधुनिक आणि संवादप्रधान दृष्टिकोन स्वीकारण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येते.
डिजिटल कम्युनिकेशनला नवे महत्त्व
गेल्या काही वर्षांत पंतप्रधान मोदी स्वतः सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अलीकडेच NEET पेपर लीक प्रकरणावर त्यांनी पारंपरिक भाषणाऐवजी सेल्फी व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. आता मंत्र्यांनाही इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहण्याचा सल्ला दिल्याने सरकार डिजिटल माध्यमातून नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हे ही वाचा>> Gen Z चा विषय लय हार्डए! आता 'या पोरांची' तर सरकारलाही धास्ती!
तज्ज्ञांच्या मते, सोशल मीडियावरील उपस्थिती केवळ माहिती देण्यासाठी नसून नागरिकांचा विश्वास, सहभाग आणि संवाद वाढवण्यासाठीही महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे आगामी काळात विविध केंद्रीय मंत्र्यांच्या सोशल मीडिया रणनीतीतही मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT












