प्रेमाने बोलला, विश्वासात घेतलं आणि शेवटी गंडवलं, उच्च शिक्षित महिलेलं 3 कोटींना गंडवलं

पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांच्या विशेष पथकानं तांत्रिक तपास करत तिघांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र नाळे आणि सहाय्यक निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:48 PM • 12 Jun 2025

follow google news

Pune CrimeNews : प्रसिद्ध विवाह संकेतस्थळाचा गैरफायदा घेत एका उच्चशिक्षित महिलेची तब्बल 3 कोटी 16 लाख 78 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरात उघडकीस आला आहे. लग्नाचं आमिष दाखवून ही फसवणूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये रंजीत मुन्नालाल यादव, सिकंदर मुन्ना खान  आणि बबलू रघुवीर यादव यांना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी दिल्ली आणि हरियाणा सीमेवरून अटक केली आहे. या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Ahmedabad Air India Crash: अपघात झालेल्या विमानातील संपूर्ण प्रवाशांची यादी जशीच्या तशी...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विवाह संकेतस्थळावरून पीडित महिलेशी संपर्क साधला होता. आरोपींनी लग्नाचं आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर व्यवसायात तोटा, कच्चा माल खरेदीसाठी भांडवल किंवा विमानतळावर अधिकाऱ्यांनी अडवल्याचं खोटं कारण सांगून महिलेकडून तुफान पैसे उकळले. हे पैसे तब्बल 300 ते 400 बँक खात्यांमध्ये वळवण्यात आले. इंस्टाग्राम कॉलद्वारे मुख्य सूत्रधाराच्या संपर्कात असलेले हे तिघे पैसे काढायचे न मुख्य आरोपीला देत होते.

पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांच्या विशेष पथकानं तांत्रिक तपास करत तिघांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र नाळे आणि सहाय्यक निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असून, पोलिसांनी नागरिकांना ऑनलाइन व्यवहारात सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे.

हे ही वाचा >> वैमानिकाला अंदाज आला आणि MAYDAY मेसेज नियंत्रण कक्षाला दिला, घटनेचं कारण कळलं?

गेल्या काही दिवसांमध्ये विवाह संकेतस्थळांवर फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा अनेक टोळ्या नियोजनबद्धरित्या विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक करतात आणि नंतर लग्न मोडणं किंवा फरार होणं असे प्रकार करतात. पोलिसांनी नागरिकांना अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती देऊ नये आणि सायबर व्यवहारात सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेमुळे सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.


 

    follow whatsapp