Air India Crash: 10 बाय 10 चं घर ते जग जिंकण्याचं स्वप्न, डोंबिवलीची रोशनी जे बोलली ते करून दाखवलं पण...

अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातात डोंबिवलीतील 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. रोशनी एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात फ्लाइट क्रू म्हणून काम करत होती.

डोंबिवलीतील रोशनीचा अहमदाबादमधील भीषण विमान अपघातात मृत्यू

डोंबिवलीतील रोशनीचा अहमदाबादमधील भीषण विमान अपघातात मृत्यू

मिथिलेश गुप्ता

13 Jun 2025 (अपडेटेड: 13 Jun 2025, 01:59 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अहमदाबादमधील विमान अपघातात डोंबिवलीच्या केबिन क्रूचा मृत्यू

point

Air India Crash: डोंबिवलीतील रोशनीच्या मृत्यूची दु:खद घटना

point

'कठोर परिश्रमाने केबिन क्रूचं स्वप्न...' रोशनीबद्दल मामाची प्रतिक्रिया

Air India Plane Crash Update: अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातात अनेकांनी आपला जीव गमावल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या भीषण अपघातात डोंबिवलीतील 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. रोशनी एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात फ्लाइट क्रू म्हणून काम करत होती. 

हे वाचलं का?

प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण

रोशनी तिच्या आईवडिलांसह डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमिया कृपा सोसायटीमध्ये राहत होती. तिचे वडील राजेंद्र, आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश एकत्र राहत होते. याआधी हे कुटुंब मुंबई ग्रँट रोड परिसरात राहत होतं आणि दोन वर्षांपूर्वीच ते डोंबिवलीत स्थायिक झाले होते. रोशनीचा भाऊ विघ्नेश एका खाजगी शिपिंग कंपनीत काम करतो आणि तिचे आईवडील घरीच असतात. रोशनीचं शिक्षण मुंबईत झालं. राजेंद्र सोनघरे आणि त्याची पत्नी राजश्री यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण दिलं. 

लहानपणापासून स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न

रोशनीला लहानपणापासूनच एअर क्रू सदस्य व्हायचे होते. तिने तिचे स्वप्न दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाने पूर्ण केले. मात्र, स्वप्न पाहणाऱ्या आणि ती पूर्ण करण्यासाठी झगडणाऱ्या मुलीचं आयुष्य इतक्यात संपेल, याची कुणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे या दु:खद घटनेने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे. 

हे ही वाचा: Ahmedabad Air India crash: अहमदाबाद विमान अपघातात हादरवून टाकणारा मृतांचा नेमका आकडा आला समोर

रोशनीच्या मामांची प्रतिक्रिया

रोशनीचे मामा प्रवीण सुखदरे यांनी सुद्धा या भीषण घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की छोट्याशा 10 बाय 10 खोलीत राहत असताना रोशनीने मोठं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णही केलं. अंगाखांद्यावर मोठी झालेली रोशनी लहानपणापासूनच खूप अभ्यासू आणि स्वप्नाळू होती. तिचं स्वप्न होतं एअर होस्टेस बनण्याचं. तिचे वडील टेक्निशियनचं काम करतात. घरच्यांनी मोठ्या कष्टाने तिला शिकवलं आणि तीचं स्वप्न सत्यात उतरलं. 

स्पाइस जेट ते एअर इंडिया

सुरुवातीला ती स्पाइस जेटमध्ये दोन वर्षे कामाला होती, त्यानंतर एअर इंडियामध्ये तिला नोकरी लागली. अवघ्या काही दिवसांपूर्वी ती गावी आली होती. त्यावेळी तिचे आजी-आजोबा तसेच काका-काकू यांना ती भेटून गेली होती. त्यांच्या कुलदैवताचंही दर्शन घेतलं होतं. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. गावी आल्यावर लगेचच लंडनची फ्लाइट मिळाली होती. तिचं लग्न ठरलेलं नव्हतं. आठवड्याभरापूर्वीच लग्नाची चर्चा सुरू होती, ती नेहमी आपल्या मनाप्रमाणे निर्णय घ्यायची, पण घरच्या सदस्यांच्या सल्ल्यांना सुद्धा तितकंच महत्त्व द्यायची. 

हे ही वाचा: Air India Plane Crash: अपघात झाला त्या विमानाचे 'ते' 2 पायलट्स नेमके कोण?

रोशनीच्या आईला सध्या लो बीपीचा त्रास असल्याने अजून रोशनीच्या मृत्यूची दु:खद बातमी पोहचवलेली नाही. तिचा लहान भाऊ शिपवर कामाला आहे. सध्या तिचे वडील, भाऊ आणि मोठी वहिनी अहमदाबादला पोहोचले आहेत. डोंबिवलीकरांनी मोठं सहकार्य केलं. मात्र एअर इंडियाकडून अद्याप अधिकृतपणे कोणताही फोन आला नाही. कंपनीतील काही सहकारी अहमदाबादला तिच्या कुटुंबासोबत आहेत. 

    follow whatsapp