Pune Metro : पुण्यातील एका व्यक्तीची ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल 7 कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप आणि ऑनलाईन ट्रेडिंगच्या माध्यमातून ही फसवणूक झाल्याचं समोर आलंय. सायबर गुन्हेगारांनी रचलेला हा 'हनी ट्रॅप' आणि फसवणुकीचा सापळा कसा होता? याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
हेही वाचा : सोलापूर : बायकोच्या अनैतिक संबंधांना वैतागला, 6 मिनीटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन्...
पुण्याच्या प्रसिद्ध व्यावसायिकाने ट्रेडिंगमध्ये 7 कोटी कसे गमावले?
संबंधित व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ऑक्टोबर 2025 मध्ये मोबाईलवर टिंडर डेटिंग ॲपची जाहिरात पाहिल्यानंतर त्याने ते ॲप डाउनलोड केले. त्यानंतर त्याची श्रेया मिश्रा नावाच्या एका तरुणीशी ओळख झाली. सुरुवातीला दोघांमध्ये टेलिग्राम आणि मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. नियमित संवाद सुरू असतानाच श्रेयाने त्याला करन्सी ट्रेडिंगबाबत माहिती दिली. या क्षेत्रात तिला मोठा फायदा झाल्याचा दावा करत तिने संबंधित व्यक्तीला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर तिने पीयू प्राईम नावाच्या प्लॅटफॉर्मची माहिती दिली आणि त्यावर खाते उघडण्यास सांगितले.
हेही वाचा : ‘भाजप शिवसेनेला संपवेल..’,शिंदेंचा आणखी एक आमदार भडकला; काय घडलं?
श्रेयाच्या सांगण्यानुसार संबंधित व्यक्तीने प्लॅटफॉर्मवर नाव, मोबाईल नंबर, पॅन कार्ड आणि ई-मेल यासह आवश्यक माहिती भरून खाते सुरू केले. खाते सुरू झाल्यानंतर त्याचा संपर्क पीयू प्राईम सीएस नावाच्या टेलिग्राम कस्टमर सपोर्ट आयडीशी झाला. त्यानंतर गुंतवणुकीसाठी विविध बँक खात्यांची माहिती देण्यात आली. सुरुवातीला त्याने 95 हजार रुपये गुगल पेद्वारे पाठवले. ही रक्कम प्लॅटफॉर्मवरील खात्यात दिसू लागली. पुढे करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यानंतर काही काळातच त्याला 18 हजार रुपयांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर पैसे काढण्याची विनंती केल्यावर त्याच्या खात्यात 17 हजार रुपये जमा झाले. त्यामुळे त्याचा या संपूर्ण यंत्रणेवर आणि श्रेयावर पूर्ण विश्वास बसला.
परताव्याच्या आमिषातून सात कोटींचा फटका
विश्वास वाढल्यानंतर संबंधित व्यक्तीने वेळोवेळी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. त्याच्या म्हणण्यानुसार, विविध बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करत असताना प्लॅटफॉर्मवर त्याची गुंतवणूक आणि परतावा सातत्याने वाढताना दिसत होता. काही काळानंतर त्याच्या खात्यात तब्बल 5 कोटी 68 लाख रुपयांची रक्कम असल्याचे दर्शवले जात होते. मात्र, ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला विविध कारणांखाली अतिरिक्त पैसे भरण्यास सांगण्यात आले. प्रथम 30 टक्के रक्कम आणि त्यावरील कर भरण्याची अट घालण्यात आली. त्यानुसार त्याने कोट्यवधी रुपयांची अतिरिक्त रक्कम जमा केली.
यानंतर एक्सचेंज फीच्या नावाखाली आणखी 1 कोटी 13 लाख रुपयांहून अधिक रक्कम मागण्यात आली. संबंधित व्यक्तीने तीही भरल्याचा दावा केला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या शुल्कांच्या नावाखाली पुन्हा पुन्हा पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. स्वतःकडील रक्कम संपल्यानंतर त्याने मित्राच्या खात्यातूनही पैसे पाठवले. अखेरीस गव्हर्नमेंट लेव्हीच्या नावाखाली आणखी 37 लाख रुपये भरण्याची मागणी करण्यात आली. मात्र, ते पैसे भरणे शक्य नसल्याचे त्याने श्रेयाला सांगितले. त्यानंतर श्रेयाने त्याच्याशी संवाद बंद केला. तेव्हाच आपली फसवणूक झाल्याची जाणीव त्याला झाली.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, गुंतवणूक, कर, एक्सचेंज फी आणि इतर विविध शुल्कांच्या नावाखाली त्याच्याकडून एकूण 7 कोटी 7 लाख 61 हजार रुपयांहून अधिक रक्कम उकळण्यात आली. यानंतर त्याने पोलीस ठाणे गाठून श्रेया मिश्रा आणि संबंधित व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणात टिंडरवरील ओळख, टेलिग्रामवरील संवाद आणि करन्सी ट्रेडिंगमधील मोठ्या परताव्याचे आमिष यांचा वापर करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











