siya goyal family company fda action pune market : केतन अग्रवाल हत्याकांडाची चर्चा सुरू असतानाच या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या कुटुंबीयांच्या कंपनीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात असलेल्या एम/एस बीजी गोयल अँड कंपनी या आस्थापनाची एफडीएच्या पथकाने तपासणी केली. या तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्यात त्रुटी आढळल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर कंपनीला पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Weather Report: महाराष्ट्रात पावसाचा अचानक ब्रेक, वरूणराजा बरसणार की नाही? मान्सूनबाबत IMD चा मोठा अंदाज
8 लाख 14 हजार 630 रुपयांची खाद्यसामग्री जप्त
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत 'संत' आणि 'साधू' या ब्रँडअंतर्गत विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या हळद पावडरसह तीळ आणि सोयाबीन खळी यांसारख्या खाद्यपदार्थांची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान एकूण 4,172 किलो खाद्यसामग्री जप्त करण्यात आली असून तिची किंमत 8 लाख 14 हजार 630 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. लेबलिंगमधील संभाव्य त्रुटी आणि भेसळीची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे. तसेच संबंधित खाद्यपदार्थांचे चार नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
हेही वाचा : Maharashtra Weather : ये रे ये रे पावसा.., ऐन जुलै महिन्यात पाऊस गेला कुठे? 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट
सर्व व्यावसायिक कामकाज थांबविण्याचे निर्देश
एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार आवश्यक असलेल्या काही बंधनकारक तरतुदींचे पालन करण्यात आले नव्हते. तसेच परवान्याशी संबंधित आवश्यक दुरुस्त्याही करण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे संबंधित कंपनीला पुढील आदेशापर्यंत सर्व व्यावसायिक कामकाज थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल आल्यानंतर जप्त केलेले खाद्यपदार्थ निर्धारित मानकांनुसार आहेत की नाही, हे स्पष्ट होईल. अहवालात अनियमितता आढळल्यास कंपनीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएने म्हटले आहे.
दरम्यान, 20 वर्षीय सिया गोयल आणि तिचा 22 वर्षीय प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर केतन अग्रवाल याला 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान कड्यावरून ढकलून हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सिया गोयल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अशा परिस्थितीत तिच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपनीवर एफडीएने केलेल्या तपासणी, खाद्यसाठा जप्ती आणि व्यवसाय बंद ठेवण्याच्या नोटीसमुळे या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT












